#कादंबरी संधिकाल -36

Written by

#कादंबरी संधिकाल -35

 

आम्ही एकमेकांना काही भेटवस्तू दिल्या आणि अजोड मैत्रीच्या रम्य आठवणी हृदयात साठवून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. 

 

   गीता आणि मी पहाटे मुंबई विमानतळावर उतरलो. गीताला घेण्यासाठी तिच्या घरची गाडी आली होती. त्याच गाडीतून मी माझ्या flat वर जायचं ठरवलं. 

आज खूप दिवसानी मुंबईदर्शन होत होतं. गाडीतून जाता-जाता मुंबई न्याहाळत होतो. आजही मुंबई तशीच होती. नेहमीप्रमाणे. घड्याळाच्या काट्यावर धावणारी भरपूर माणसं. फेरीवाले, चहाच्या आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या, सायकलवर भोंगा वाजवत फिरणारे इडली आणि सामोसावाले. 

इतकी वर्ष मुंबईतली माणसं बघतोय मी, अतिशय धावपळीचं आणि धकाधकीचं आयुष्य जगणारी इथली लोकं. पण, इतका त्रास सोसून सुद्धा इथे कोणाच्या चेहऱ्यावर नैराश्य नसतं. कधीच. प्रत्येक जण आपापल्या धुंदीत जगत असतो. पण कठीण प्रसंगी तितकाच एकत्रही येतो इथला माणूस..! 

इतक्या वर्षानंतरही मुंबईने आपलं वेगळेपण टिकवून ठेवलंय. आजही मुंबई तशीच होती. चिरतरूण, स्वप्नांची नगरी, प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी. 

   सगळं बघता बघता, माझ्या flat पर्यंत गाडी आली. मी गीताचे आभार मानले आणि निरोप घेतला. 

आमच्या ह्या flat मधे कोणी रहात नव्हतं. पण काही दिवसांपूर्वीच तुषार इथे येऊन गेला होता. त्यामुळे साफसफाई करून, आवराआवर करून ठेवलेली होती. आणि स्वयंपाकघरात आवश्यक तेवढी साधनसामुग्री होती. खालून येतानाच दूध घेऊन आलो. आत आल्यावर आधी हातपाय धुवून आंघोळीसाठी  गीझर सुरू केला आणि मस्तपैकी कॉफी केली. 

सगळं आटोपून थोडावेळ आराम केला आणि तिथून जवळच असलेल्या आमच्या FRIENDSला गेलो. तिथली व्यवस्था बघितली, कर्मचाऱ्यांजवळ बोललो. तिथेच जेऊन पुन्हा flatवर आलो आणि थोडा आराम केला. 

संध्याकाळी मोकळा वेळ होता. म्हटलं चला जरा फेरफटका मारून येऊ. चालत फिरू आज. कित्येक वर्षात ‘ती’ मुंबई अनुभवली नाहीये. रिक्षा करून तिथल्या एका जवळच्या बाजार रस्त्यावर गेलो. रस्त्याच्या कडेने चालत निरीक्षण करत निघालो. 

काहीही बदललं नव्हतं. सगळं अगदी तसंच होतं. रस्त्याच्या दुतर्फा हरप्रकारच्या वस्तूंची दुकानं. चालताचालता एका कपड्यांच्या दुकानासमोर आलो. तो कपडे विक्रेता माझ्याकडे बघून म्हणाला, “या साहेब. टी-शर्ट दाखवू…? हा निळा टी-शर्ट तुम्हाला छान दिसेल. या बघा.”

मी हसलो. म्हटलं, “नको.” 

तसंच पुढे चालत निघालो. समोर एक गजरेवाला दिसला. पोटासमोर लटकवलेली गोल पाटी ज्यात भरपूर मोगरऱ्याचे आणि अबोलीचे गजरे होते.  ‘गजरे घ्या गजरे…’ म्हणत तो उभा होता. 

फुलांचा मंद सुवास दरवळत होता. म्हटलं, “कसे रे गजरे..?” 

म्हणाला, “घ्या साहेब. १० ला एक ३०ला चार. 

मी म्हटलं, “एक दे मोगऱ्याचा.” 

म्हणाला, “काय साहेब.. अहो दोन मोगरा आणि दोन अबोली घ्या. खूप आवडतील काकूंना..”

“बरं..” म्हटलं आणि मी चार गजरे घेतले. 

इथलं वेगळेपण म्हणजे, विक्री करणारा प्रत्येकजण, फक्त वस्तू विकणे एवढाच भाव ठेऊन नसतो. तर त्याच्या बोलण्यात एक आपलेपणा जाणवतो. हा अनुभव मला जगातल्या कुठल्याच बाजारपेठेत मिळाला नाही. ‘फक्त मुंबईत.’ 

एक गजरा वरच्या खिशात ठेवला आणि मी तसाच पुढे चालत निघालो. कोळश्याच्या शेगडीवर किटली घेऊन फिरणारा चहावाला दिसला. 

‘आहाहा..!’ म्हटलं, कित्येक वर्षात हा चहा प्यायलो नाहीये..! चिनीमातीच्या पांढऱ्या कपबशीत चहा घेतला. आणि पहिला घोट घेताक्षणी अगदी कॉलेजचे दिवस आठवले. अगदी अश्याच कपबशीतून, असाच चहा प्यायचो मी कॉलेजच्या बाहेर..! 

चालतचालत बाजाराच्या अगदी शेवटच्या टोकाला आलो. दुकानांची गर्दी कमी झाली. आता खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि पानाच्या टपऱ्या दिसायला लागल्या. एके ठीकाणी गर्दी दिसली म्हणून जवळ गेलो. एक ‘लाल-काळा’ करणारा पत्ते मांडून बसला होता. म्हणाला, “आओ साहब.. खेलोगे…?”

मी मोठ्याने हसून त्याला कोपरापासून हात जोडले आणि घराकडे जाण्यासाठी मागे फिरलो. 

घराकडे जाताजाता वाटेत गरमागरम वडापाव आणि ‘भैया’ची पाणीपुरी खायचा मोह काही आवरता आला नाहीच..

  रात्री मुगाची खिचडी केली आणि जेऊन, सतराव्या मजल्यावरच्या माझ्या flatच्या ग्यालरीत खुर्ची टाकून बसलो. मस्त थंडगार वारे वहात होते. इतक्या वरून मुंबईची चेहेल-पेहेल खूपच सुंदर भासत होती. 

आज मी एकटाच होतो. गप्पा मारायलाही कोणी नव्हतं. ते जुने दिवसच माझ्याशी गप्पा मारायला आले होते. इथे बसून मुंबईत घालवलेला क्षण अन क्षण आठवला. चाळ आठवली, तिथलं रहाणीमान आठवलं, कॉलेज जीवन आठवलं, ती धावपळ आठवली, अगदी सगळं सगळं आठवलं.. 

  थोडा वेळ गेल्यावर मालतीला फोन केला. माझी खुशाली कळवली. थोडावेळ बोललो आणि पुन्हा ग्यालरीत येऊन लेपटॉप उघडून बसलो. 

 

लेपटॉप मधे ऍनाने दिलेले ते फोटो. पुन्हा पुन्हा निरखून बघितले. पुन्हा ते गावचे दिवस आठवले.. गाव आठवला…. 

आता मात्र गावाला जायची ईच्छा चांगलीच जोर धरायला लागली आणि मला धीर निघेनासा झाला.. 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.