#कादंबरी संधिकाल -42

Written by

#कादंबरी संधिकाल -41

 

पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आटोपलं. मन बेचैन होतं. सगळंच विचित्र वाटत होतं. मी झोपाळ्यावर बसलो. 

अश्यातच सदू तिथे आला. गप्पा चालू झाल्या. बोलताबोलता, म्हातारीच्या आंब्याचा विषय निघाला. एकंदर बाकी ठिकाणांची स्थिती पाहता, ‘ते आंब्याचं झाड’ असेल की नाही ही शंकाच होती. 

सदूला म्हटलं, “आहे का रे अजून म्हातारीचा आंबा..?”

सदू म्हणाला, “आहे तर…! पण आता म्हातारीने धरलंय त्याला.” 

म्हटलं, “धरलंय…!? म्हणजे..?” 

म्हणाला, ‘भाऊ आता काय सांगू तुम्हाला….’

आमच्या कोकणी माणसाला भुतं-खेतं आणि त्यांच्या सुरस कथा ऐकवण्यात भारी रस. अगदी रंगवून रंगवून, वाढवून सांगणार. 

सदुने पवित्रा घेतला..म्हणाला, “काय सांगू भाऊ… म्हातारी गेली त्या वर्षी, अख्या पंचक्रोशीत, एका पण आंब्याच्या झाडाचं पान दिसत नव्हतं एवढा मोहोर आला होता..! पण त्या आंब्याला..? मोहोराचं एक फुल नाही…! अहो असणार कसं…. तो आंबा म्हणजे म्हातारीचा जीव..! धरलंन त्याला मेल्यावर. अख्या गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली.. त्या वर्षी आंबा खाऊन गावातली गुरं पण कंटाळली. एवढा आंबा आला.. पण ह्या आंब्याला, एक कैरी पण नाही….! 

पुढच्या वर्षी आंबा आला. पण तिकडे कोणीही फीरकत नव्हतं. आधीच म्हातारी खाश्ट, त्यात आता झाडावरच… कोण जाईल तिकडे…!? 

तरी पण परबाचा दत्त्या, धीर करून गेला. लोणच्याला कैऱ्या काढायला. झाडावर चढला खरा पण,  टिपरी वरून जो उलटला तो थेट बुंध्यात. खुब्यातच मोडला.. मरेपर्यंत जाग्यावर होता..! आता सांगा मला. नाही, म्हणावं तर इतक्या वर्षात कोणी पडला नव्हता..! आताच कसा….? कारण लक्षात आलं की नाही…? हं… 

सदूची कथा संपली. 

म्हटलं,  ‘असं नसतं रे, मी वाचलं होतं एके ठीकाणी. की,  झाडांनाही भावना असतात. म्हातारी गेल्यावर कदाचित त्या झाडालाही वाईट वाटलं असेल. म्हणून नसेल आला मोहोर त्या वर्षी…! 

सदू म्हणाला, “बर, दत्त्याचं काय मग…?”

म्हटलं, “अरे तो एक अपघात होता..”

    मी जाऊन येतो तिकडे. असं म्हणून मी उठलो. 

सदू म्हणाला, ‘भाऊ जा. पण जरा लांबूनच बघा. आंबे लागलेत झाडावर. म्हातारी गारूड घालील. जवळ बोलवील. आंबे काढायचा मोह होईल. पण तसं काही करू नका. रवळनाथाचं नाव घेत रहा..”

मी हसलो, “बरं..” म्हटलं आणि निघालो. 

सदू म्हणाला होता, म्हातारीचा मुलगा आता मुंबईत असतो. बायको-पोरांसहीत शिमग्यात तेवढा येतो. म्हातारीचं जुनं घर पाडून चाळीसारख्या खोल्या बांधल्या आहेत. तिथे काही कुटुंब भाड्याने रहातात.

मी तिथे पोहोचलो. त्या चाळीच्या पायऱ्यावर काही बायका मशेरी लावत बसल्या होत्या. मी पुढे होऊन त्यांना ओळख सांगितली आणि आंब्याकडे जाण्याची परवानगी मागितली. त्या चमत्कारिक नजरेने माझ्याकडे बघायला लागल्या आणि ‘जा’ म्हणाल्या. 

मी चालत घरामागे गेलो. झाड आता खूप मोठं झालं होतं. तुरळक ठीकाणी आंबे लागलेले दिसत होते.. पण निस्तेज दिसत होतं ते. झाडाच्या अर्ध्याअधिक फांद्या सुकल्या होत्या, त्यांना वाळवी लागली होती. राहिलेल्या फांद्या बांडगुळानी भरून गेल्या होत्या. खाली बुंध्याखाली मोठी वारूळ झाली होती. प्रचंड पालापाचोळा पडलेला होता. कित्येक दिवसांत तिकडे कोणी फिरकलेलं नाही हे लक्षात येत होतं. सगळा परिसर एखाद्या स्मशानासारखा वीराण दिसत होता. 

वाईट वाटलं. झाडाजवळ गेलो. खोडावर हात फिरवून झाडाला कुरवाळल्यागत केलं. कीती वर्षात ह्या झाडाचा आंबा खाल्ला नव्हता. मनात आलं बघूया का चढून..? एखादा आंबा काढू.. 

पण विचार तसाच सोडला. कारण आता सवयही नव्हती आणि बुंध्याला लागून खूप वारूळही होती. 

म्हटलं, ‘चला. आंबा खाणे आपल्या नशिबात नसावं.’ हात जोडले आणि डोळे मिटून म्हटलं, ‘परमेश्वरा.. सुखी ठेव सगळ्यांना..’ 

असं म्हणून, मी मागे वळणार. तोच, एक पिकलेला आंबा माझ्या खांद्याला घासून खाली पडला. मी तो आंबा उचलला आणि वर झाडाकडे बघितलं. वाऱ्याने झाडाची पान सळसळत होती. मनात आलं मी आल्याचा आनंद झालाय की काय ह्याला..! म्हणून पानं हलवून आनंद व्यक्त करतोय…! 

हातातला आंबा किंचित पीळला आणि चोखला… आहाहाss…! कीती दिवसानी आज ही चव अनुभवतोय.. कृतार्थ भावनेने झाडाच्या खोडावरून हात फिरवला. म्हटलं, ‘येईन पुन्हा कधीतरी. काळजी घे..’

    झाडाची अवस्था बघता ते आजारी स्थितीत होतं. अश्याच स्थितीत अजून कीती दिवस रहाणार होतं परमेश्वरास ठाऊक. पण त्याही परिस्थितीत जे आंबे लागले होते, त्याला अमृतासमान चव होती. 

खरंच.. कीती भरभरून निर्व्याज प्रेम, निर्व्याज दान देत असतात ही झाडं आपल्याला. आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत ती आपल्यातलं उत्कृष्ट तेच देत रहातात.. कुणाकडे काहीही अपेक्षा न करता….. 

आंबा खात खात मी तसाच घराकडे वळलो. मगाचच्या बायका आणि आणखी काही लोकं जमा झाली होती. ती लांबूनच माझ्याकडे बघत होती. पण, मला कशाचंच भान नव्हतं. मी आंबा चोखत तसाच त्यांच्या बाजूने निघून आलो. 

 

        संध्याकाळी झोपाळ्यावर रामरक्षा म्हणत बसलो होतो. इतक्यात एक मुलगा आला घरी. म्हणाला, ‘रात्री नऊ वाजता देवळात मीटिंग आहे.’  गावच्या पद्धतीप्रमाणे तो घराघरात आमंत्रण देण्यासाठी फिरत होता. 

        सदूला म्हटलं, ‘कसली मीटिंग रे….?’

म्हणाला, “भाऊ, आता आपलं रवळनाथाचं देऊळ पाडून नविन बांधणार आहेत. त्यासाठी इथले आमदार साहेब मोठी देणगी पण देणार आहेत. त्यासंबंधी मीटिंग आहे. आमदार साहेब येणार आहेत मीटिंगला..”

   हे ऐउन माझ्या पायाखालची जमीन सरकल्यागत झालं..! मी ओरडून म्हटलं, “काय….!! देऊळ पाडून नविन बांधणार..!? अरे काय वेड बीड लागलंय की काय….!!? 

        चिडून म्हटलं, “मूर्खपणा चाललाय सगळा. सदू, आज मी येतो मीटिंगला…” मला प्रचंड राग आला होता.. 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.