#कादंबरी संधिकाल -43

Written by

#कादंबरी संधिकाल -42

 

संध्याकाळी सदू, संतोष आणि मी देवळात पोहोचलो. गावातली लोकंही जमली होती. जुन्या बकुळीच्या झाडाच्या जागी उभ्या असलेल्या स्टेज वर आमदार आणि इतर लोकांसाठी खुर्च्या लावलेल्या होत्या. त्यासमोर लोकांची बसायची व्यवस्था होती. आम्हीही एके ठीकाणी बसलो. थोड्याच वेळात आमदारसाहेबांच्या गाड्यांचा ताफा आला. जवळपास चे तरुण आणि इतर मंडळी तिकडे धावली. पोलिस आणि कार्यकर्ते गर्दीला बाजूला करत, आमदार साहेबांना घेऊन येत होते. 

पांढरेशुभ्र कपडे, गळ्यात सोन्याची जाड साखळी, एका हातात जाड सोनेरी ब्रेसलेट. आणि लाल-काळे गंडे दोरे बांधलेल्या दुसऱ्या हातात मोबाईल फोन. दोन्ही हातांच्या बोटात अंगठ्या. अश्या पेहरावातले आमदार साहेब. लोकांना अभिवादन करत स्टेजकडे चालले होते. 

आमदार स्टेजवर पोहोचले. गावाच्या सरपंचांकडून स्वागत आणि सत्कार झाला. सरपंच बोलायला लागले. आमदार साहेबांवर स्तुतीसुमनं उधळून झाली. आता जुनं देऊळ पाडून, त्या ठीकाणी नविन देऊळ बांधायचे आहे. त्यासाठी आमदारसाहेब निधी देणार आहेत वेगैरे बरंच काही बोलून झालं. आणि सगळं बोलून शेवटी सरपंच म्हणाले, “…तर अश्या पद्धतीने समस्त गावकऱ्यांना हे मान्य आहे काय….?”

“…होsss..” असा एकसुरात गावकऱ्यांचा आवाज आला.

 

मी उठून उभा राहिलो आणि म्हटलं, “थांबा. मला हे मान्य नाही..”

    सगळीकडे एकच शांतता पसरली आणि सगळ्यांचे चेहरे माझ्या दिशेने वळले. 

मी म्हटलं, “मला थोडं बोलण्याची परवानगी द्यावी..” सगळे माझ्याकडेच बघत होते. शांतपणे. कोणी काहीही बोललं नाही. शेवटी त्यांची परवानगी आहे. असं गृहीत धरून, मी बोलायला सुरुवात केली. 

म्हटलं, ” नमस्कार. मी सुहास सामंत. अहो, कीती पुरातन देऊळ आहे आपलं. सुंदर दगडी बांधकाम असलेलं. अशी देवळं आजकाल फार बघायलाही मिळत नाहीत..! तंत्रज्ञान कितीही पुढारलं तरी असं बांधकाम शक्य नाही आता. देऊळ पाडून नविन बांधकामाला निधी देण्यापेक्षा, पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या डागडुजीसाठी निधी घ्यावा..”

“बरोबर आहे. बरोबर आहे…” असा मागून पाचसहा जणांचा आवाज आला.. 

    गावकऱ्यांतला एक जण उठून उभा राहीला, म्हणाला, “काय हो…? तुम्ही अजून, आपल्या पणजोबांनी बांधलेल्या घरात रहाताय की त्यात पुढे काही सुधारणा केली…? नविन घरं बांधली ना आपणही…? मग देवाच्या बाबतीत भेदभाव का….? काळाबरोबर पुढे सरकायला नको..? 

    मी म्हटलं, “हे बघा. मला काय म्हणायचं आहे ते नीट लक्षात घ्या. ही वास्तुकला, शिल्पकला, आपल्या पुरातन वैभवशाली संस्कृतीची साक्ष आहे. जी हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती..” 

“अगदी बरोबर….” पुन्हा मागून आवाज आला. हा आवाज मगाचपेक्षा थोडा वाढला होता. 

   पुन्हा समोरून एक जण बोलायला उभा राहीला. मला आता लक्षात येत होतं की, मागून येणारा आवाज आणि पुढची माणसं हे गावातील विरोधी गट होते. 

   तो उभा राहिलेला माणूस म्हणाला, “अहो हजार वर्षापूर्वीचं काय कुरवाळत बसायचं…!? जग चंद्रावर पोहोचलं आणि आपण अजूनही त्या हजार वर्ष जुन्या संस्कृतीत खितपत पडायचं….? काळाबरोबर पुढे नको सरकायला…? 

   मी म्हटलं, “अहो तुमच्या कोणाच्याच कसं लक्षात येत नाहीये मला काय म्हणायचं आहे ते.. आता नविन आर.सी.सी. बांधकामातलं देऊळ उभं करणार. त्यात वेगळेपण काय…? हे जुनं देऊळ बघा. असं कुठेच नाहीये..! कीती सुंदर दगडी बांधकाम आहे. तुमच्या मुला-बाळांना, नातवंडाना पुरातन कला म्हणून काय दाखवणार तुम्ही उद्या….?” 

  अजून एक जण समोरून बोलता झाला. म्हणाला, “आमच्या पोरा-बाळांना काय दाखवायचं ते आम्ही बघू. पण तुम्ही देवाच्या वाईटावर का उठलात..?

   म्हटलं, “वाईटावर….!!? अहो काळजीपोटीच बोलतोय मी हे सगळं….!! 

मागच्या बाजूचा आवाज आता जोर धरायला लागला. एक २०-२५ वर्षाचा तरुण उठून उभा राहिला. म्हणाला, “काका तुमचं बरोबर आहे. गेले कित्येक दिवस मी लोकांना हेच समजावयचा प्रयत्न करतोय. पण, कोणी ऐकतच नाहीये..! त्यांना वाटतंय मी राजकीय विरोध म्हणून हे करतोय..”

      आता मात्र सगळीकडे गडबड सुरू झाली. कुजबुज सुरू झाली आणि एकच गोंधळ उडाला. गावचे सरपंच आणि आमदारसाहेब आपापसात काहीतरी कानात बोलत होते. बहुतेक माझ्याविषयी काहीतरी बोलत असावेत असं वाटलं मला. 

इतकावेळ शांत असलेले आमदारसाहेब उठले आणि लोकांना शांत रहाण्याची खूण म्हणून त्यांनी दोन्ही हात वर केले. सगळीकडे शांतता पसरली. आमदार साहेब पुन्हा जागेवर बसले. मी अजूनही उभाच होतो. त्यांनी माझ्या दिशेने खूण केली आणि म्हणाले, “नमस्कार..श्रीमान, अं…. काय नाव म्हणालेत तुम्ही..?” 

  मला ते थोडं अपमानास्पद वाटलं. मी म्हटलं, “नमस्कार. मी सुहास सामंत.” 

“हां.. तर सामंत साहेब. तुम्ही ह्या गावचे सुपुत्र आहात असं कळलं. अख्खं जग फिरलात, मोठे झालात. आनंद आहे.. तुम्हाला देवाची काळजी आहे असं म्हणालात आत्ता.”

“बरं एकच सांगा, ह्या देवाच्या काळजीपोटी, इतक्या वर्षात कीती वेळा गावात आलात…? कीती वेळा देवाच्या उत्सवात सामील झालात….?”

   मी म्हटलं, “अहो आमदार साहेब, त्याचा ह्या गोष्टीशी काय संबंध…!?”

   आमदार म्हणाले, “काय संबंध…! म्हणजे…? संबंध आहेच. तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.. काय गावकऱ्यांनो…?”

  “होय..होय..होय..” म्हणून एकच गलका झाला. 

  काही वेळ तसाच शांत गेला. कारण ह्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. सगळ्यांनाच माहिती होतं की मी खूप वर्षांनी गावात आलो होतो.. 

हळूहळू कुजबुज वाढली. आमदार साहेबांनी मला खिंडीत पकडल्याचा भाव लोकांच्या चेहऱ्यावर होता. काही जण मिश्किलपणे हसत होते. मला वाईट वाटलं. मी तसाच मान खाली करून उभा राहिलो. 

   सरपंच उभे राहीले. म्हणाले, “ते काही नाही. जो निर्णय झाला तो झाला. गावातल्या पाच-दहा लोकांसाठी आणि उपऱ्यांसाठी आम्ही त्यात बदल करू देणार नाही. काय गावकऱ्यांनो….?”

  ‘होय..होय…होय…’ म्हणून पुन्हा एकदा गोंधळ उडाला. 

   “उपऱ्यांसाठी…..” हा शब्द माझ्या कानात गरम तेल ओतल्यागत वाटला..

  ‘येत्या सोमवारी आमदार साहेबांच्या हस्ते नारळ वाढवून देवळाच्या कामाला सुरुवात होईल’ अशी घोषणा झाली… 

टाळ्यांचा कडकडाट झाला.. 

फटाक्यांच्या आवाजाने कान बधीर होऊन गेले.. 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.