#कादंबरी संधिकाल -44

Written by

#कादंबरी संधिकाल -43

 

    मला फार वाईट वाटलं. अपमानास्पदही. मी, उपरा…?

थोडं अपराधीही वाटलं. विचार केला, कुठे चुकलं नेमकं..? आपण ह्या गावाशी स्वतःला जोडून ठेवण्यात अयशस्वी ठरलो..? जुनी-जाणती विचार करून घेणारी माणसं कुठे गेली..? कामधंद्यासाठी गावातून बाहेर गेलेली माणसं ह्या गावात परत आली नाही म्हणून असं झालं..? की, ह्या लोकांनी चुकीच्या नेतृत्वाला पाठींबा दिला म्हणून असं झालं..!? 

एके काळी गावात लोकांकडे पैसा नव्हता. पण चांगल्या माणसांकडून चार चांगल्या गोष्टी ऐकून घ्यायची मानसिकता होती. नम्रपणे ते स्वीकारायची वृत्ती होती. ‘ती चांगली माणसं’ आता गावात राहीलीच नाहीत…? की, ह्यांची ‘चांगलेपणा’ची व्याख्या बदललेय…!? 

काहीच कळत नव्हतं. एक मात्र नक्की की, गावात पैसा आलाय, सुबत्ता आलेय. पण माझा हा गाव आता ‘वैचारिक दारीद्र्यात गेलाय.’

काय होणार आहे भविष्यात, कुणास ठाऊक..! 

मनातून रवळनाथाला नमस्कार केला आणि म्हटलं, ‘सांभाळ बाबा. शेवटी तुझी ईच्छा..’

रात्री बिछान्यावर पडलो खरा. पण झोप काही येईना. ह्या सगळ्या ‘कालबाह्य’ होत असलेल्या गोष्टी डोळ्यासमोरून जात नव्हत्या.. मी ही आता ‘कालबाह्यच’ झालो होतो. ‘उपरा’ झालो होतो.. 

    सकाळी उठलो. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. डोकं जड झालं. दुखायलाही लागलं होतं.. आता मला इथे थांबायची ईच्छा होईना. सदूला म्हटलं, “सदू. मी संध्याकाळच्या गाडीने निघतो आज..”

   सदू दचकलाच….! त्याला काय बोलावं कळेना. म्हणाला, “भाऊ. कालचा विषय इतका मनाला लाऊन घेऊ नका. चालायचंच. तिकडे लक्ष देऊ नका…

    म्हटलं, “नाही रे सदू. मनाला नाही लाऊन घेतलेलं मी. कदाचित त्यांचं म्हणणं खरंही असेल. पण अरे, हे तळं, बंदर आपल्या गावाचं वैभव. काय अवस्था झालेय त्याची..! आणि आता तर खुद्द रवळनाथाचं देऊळ पण…!! नाही सदू. मी नाही बघू शकत हे. 

     अरे माझे अनुभव सांगतो. परदेशात भारतीय संस्कृतीला खूप मानतात. आता मला सांग, ऍनासारखी एखादी मुलगी जर आलीच भारतात, भारतीय संस्कृतीच्या ओढीने, भारतीय गाव अनुभवायला, तर काय बघणार आहे ती भारताचं असं विशेष म्हणून..? अर्धवट बूजवलेलं तळं..? की आर.सी.सी. बांधकामातलं देऊळ..? लोकांनी कालानुरूप बदलू नये असं माझं म्हणणं नाही. पण, ‘आपलं’ म्हणून जे विशेष आहे, ते तरी जपायला हवं की नाही..!? 

अरे तिकडे मुलांना शिकवलं जातं की, भारतात अनेक प्रकारच्या जाती, धर्म, पंथाचे लोकं मिळून-मिसळून, गुण्यागोविंदाने रहातात. ती मुलं इकडे आली तर त्यांना काय दाखवणार…? आपापलं वर्चस्व सिद्ध करायला आसुसलेले चौका-चौकातले जाती-धर्माचे झेंडे आणि स्तंभ…!? 

   अरे भारतीय संस्कृती आणि परंपरा ह्याबद्दल शिक्षण देताना तिथे असं सांगतात की, भारतीय संस्कृती ही ‘निसर्ग केंद्रित’ आहे. भारतात निसर्गातील प्रत्येक घटकाला परमेश्वराचा अंश मानून त्याची पूजा केली जाते. त्यांना काय दाखवायचं..? तोडलेली झाडं..? की कचराकुंडी झालेलं बंदर..? 

भारतीय जीवनशैलीत, सण, व्रत-वैकल्य, ह्यातून विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, अर्थकारण, समाजकारण, आणि अध्यात्म ह्याची सुंदर गुंफण दिसून येते. असं शिकवलं जातं. ते काय बघणार इथे येऊन…? रस्त्यावर पचापचा थुंकणारी पोरं..? की समाजहीत सोडून, मतांच्या राजकारणाभोवती फिरणारे इथले लोकप्रतिनिधी…? 

   काहीतरी चुकतय सदू.. कुठेतरी चुकतय.. आणि मला हे सहन होत नाहीये.. 

थोडा वेळ तसाच गेला. मी जरा शांत झालो. सदूला म्हटलं, “अरे मी खूप वर्षांनी इथे आलोय ना त्यामुळे मला हा बदल सहन होत नाहीये. असो. मी निघतो संध्याकाळी.. 

मी थोडा हसलो आणि म्हटलं, ‘जायच्या आधी सुनबाईला मस्तपैकी बांगड्याचं कालवण आणि भाकरी, भात करायला सांग.’ सदूने होकारार्थी मान हलवली आणि न हसताच आत निघून गेला. 

   संतोष तिथेच होता. म्हणाला, ‘भाऊ काका. जाऊ नका ना. तुम्ही आल्यापासुन बाबाच्या अंगात वेगळाच हुरूप आला होता.. भरपूर हसायला लागला होता. भरपूर बोलायला लागला होता.. तुम्ही गेलात तर पुन्हा बसून राहील फणसाखाली.. शांत, गप्प गप्प..” 

 मला वाईट वाटलं. म्हटलं, ‘अरे, संतोष. कायमचा का रहाणार होतो मी इथे..? आज-उद्या जाणारच होतो. आता सदूची काळजी घेणं ही तुझी जबाबदारी. जरा बोलत जा त्याच्याशी. अधून-मधून विचारत जा त्याला चार गोष्टी. तब्येतीची काळजी घे त्याच्या..’

   संतोष मान खाली करून उभा होतो. मी त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि घरात गेलो. 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.