#कादंबरी संधिकाल -45(अंतिम भाग)

Written by

#कादंबरी संधिकाल -44

 

  पुन्हा एकदा घर, बाग, गुरं, अंगण, झोपाळा सगळं सगळं डोळे भरून बघून घेतलं. 

देवळात गेलो. गाभाऱ्यात कोणी नव्हतं. दरवाजा उघडाच होता. आत प्रवेश केला. 

रवळनाथासमोर बसलो. हात जोडले. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या आपोआप. म्हटलं, “शेवटी तुझी ईच्छा बाबा.” 

“तुला सांगितलेली माझी शेवटची ईच्छा तेवढी पूर्ण कर.” असं म्हटलं आणि मी मूर्तीसमोर डोकं टेकून अक्षरशः अक्साबोक्षि रडायला लागलो. 

थोडा वेळ तसाच गेला. मग मी उठून नारळ दिला आणि स्वतःला सावरत, डोळे पुसत गाभाऱ्याच्या बाहेर आलो. 

देऊळ पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहून घेतलं. कारण येत्या काही दिवसांतच तुटणार होतं ते.. 

    बाहेर आलो. देवळाच्या सभामंडपात नाडकर्णी सर आणि त्यांच्यासमोर काही मुलं आणि माणसं बसलेली होती. मागे एकदा त्यांनी सांगितलं होतं की, छंद म्हणून आणि समाजप्रबोधन म्हणून, ते दर रविवारी देवळात प्रवचनासारखा छोटासा कार्यक्रम करतात. बहुदा तेच सुरू असावं. त्यांचं लक्ष विचलित व्हायला नको म्हणून, मी त्यांच्या समोर न जाता बाजूच्या कट्ट्यावर बसलो. नाडकर्णी सर बोलत होते. हास्यविनोद सुरू होते. 

    समोर बसलेल्या मुलांना उद्देशून नाडकर्णी सर म्हणाले, “पोरानो, हल्ली सगळी तरुण मुलं-मुली म्हणतात, ‘जरा maturity येऊदे. मग लग्न करू.’ जरा सांगा रे, maturity म्हणजे काय..? आणि ती केव्हा येते…?”

मुलं एकमेकांकडे बघायला लागली. म्हणाली, ‘सर तुम्हीच सांगा..’

नाडकर्णी म्हणाले, “बरं… ऐका तर.” 

“जोपर्यंत आपण आपल्या पालकांच्या जीवावर अवलंबून असतो, तोपर्यंत निश्चिंत असतो. जेव्हा आपण कमवायला लागतो आणि कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर यायला लागते, तेव्हा आपला maturity च्या बालवाडीत प्रवेश होतो.” सगळी मुलं हसायला लागली. नाडकर्णी सर पुढे बोलायला लागले. 

म्हणाले, “जेव्हा लग्न होतं, मुल होतं तेव्हा ह्या शाळेची पहिली, दुसरी चालू होते. आणि पुढे प्रपंचाच्या रामरगाड्यात माणूस तावलुन-सुलाखून निघतो ना, तेव्हा वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्तीच्या काळात माणूस maturity ची  ssc पास होतो. 

पुढे हळूहळू तो ‘बिनकामाचा’ होतो…! सगळ्यांनाच नकोसा वाटायला लागतो. मग अश्यावेळी त्याला, आपल्या आयुष्यातले सगळे प्रसंग, धावपळ, संघर्ष, सगळं आठवतं. आपण काय केलं काय नाही ह्याचा तो जमा-खर्च मांडायला लागतो. आणि ह्या सगळ्या बेरीज-वजाबाकीतून त्याला जे आपल्या ‘आयुष्याचं सार’ गवसतं. 

त्याला म्हणतात, “maturity” 

‘वाह….!! ‘ फारच छान. मनुष्य जन्माचे सार कीती सहज-सोप्या पद्धतीने सांगितलं नाडकर्णी सरांनी. आवडलं मला. आता मी जरा अधिकच लक्ष देऊन ऐकायला लागलो. 

नाडकर्णीनी आता आपला मोर्चा वयस्क लोकांकडे वळवला. म्हणाले, “आजकाल निवृत्त लोकांची सगळ्यात मोठी तक्रार कोणती माहितेय..?   ‘मुलं विचारत नाहीत हो.’ हगल्या-पादल्या, आई-आई, बाबा-बाबा करणारी पोरं हल्ली परस्पर निर्णय घेतात..!” प्रत्येक सासूचं तर असं म्हणणं असतं, “माझं पोर असं नव्हतं हो.. ही कार्टी आली आणि बिघडला.” 

‘काय खरं की नाही काकी..?’ असं म्हणून त्यांनी मान खाली केली आणि समोर बसलेल्या म्हाताऱ्या काकींकडे चष्म्याच्या वरून बघितलं.  

डोक्यावरून पदर घेतलेल्या काकी लाजल्या. त्यांनी पदर तोंडावर धरला आणि हळूच हसायला लागल्या. बाकी लोकंही हसायला लागले. 

नाडकर्णी सरांचं बोलणं खूपच विनोदी आणि समोरच्याला आपलंसं करणारं होतं. ते पुढे बोलते झाले. 

एका निवृत्त काकांकडे बघून म्हणाले, “काका. मला सांगा, तुम्ही एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापन सल्लागार होता. खरं की नाही..? 

ते काका ‘हो’ म्हणाले. 

“मग मला सांगा, तुम्ही निवृत्त झालात. तुमचा सेंटऑफ झाला. तुम्हाला ‘घरी जाणार’ म्हणून शाल, नारळ दिला. त्यानंतर कंपनीतले कीती लोकं तुमच्याकडे सल्ला मागायला आले…?”

‘एकही नाही..!’ ते काका म्हणाले. 

नाडकर्णी सरांनी आता मांडी बदलली आणि म्हणाले, ” ‘हां…. असंच आहे बघा..’ आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यावर, प्रपंचातूनही निवृत्ती घ्यायची असते हो. निवृत्ती म्हणजे पूर्ण निवृत्ती. त्या कंपनी सारखं,  पोरं काय हवा तो गोंधळ घालूदेत. आपल्याला देणं ना घेणं. आपण आणि आपली पेन्शन. आपल्या आयुष्यात आपण पोरांना जे संस्कार दिले असतील, ज्याप्रकारे आपण समाजात वागलो असू त्याचा सगळा परतावा आपल्याला ह्या काळात मिळतो. तोच आपला ‘फंड’ आणि तीच आपली ‘पेन्शन’ 

ह्यावर सगळे लोकं खळखळून हसायला लागले. 

सर एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे म्हणाले, “अहो, चतुर्थीला आणलेला गणपती, देवांचा देव. अहो त्यालाही सात दिवस झाले की आठव्या दिवशी ठेवत नाहीत..! नदीत नेऊन बुडवतात. खरं की नाही…? ‘निवृत्ती म्हणजे निवृत्ती, “

ह्यावर समोर बसलेल्या माणसांच्या आणि पोरांच्या डोळ्यातून हसून हसून पाणी यायला लागलं..  

थोडा वेळ तसाच गेला. आता नाडकर्णी सरांचा आवाज जरा सौम्य झाला. म्हणाले, “अहो कशाला अडकवायचा आपला जीव प्रपंचात.. झालं आता सगळं.. झालो आपण आता ‘निवृत्त’.. हे सगळ्यांनी समजून घ्यायला नको..?                 अहो, पुढे जायचंय ना अजून..? मग.. प्रपंचात जीव अडकला तर कसं जाणार…? पुढे म्हणजे कुठे….? समजलं का…? 

पुन्हा शांतता आणि समोरच्या लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. 

पुन्हा नाडकर्णी सरांनी लय पकडली आणि बोलायला लागले. म्हणाले, “एक गोष्ट सांगतो ह्यावर..” मी सुद्धा सावरून बसलो आणि लक्ष देऊन गोष्ट ऐकायला लागलो. 

तर गोष्ट अशी. की,  “एका गुरुच्या आश्रमात दोन शिष्य शिकत होते. ‘आत्मज्ञानाचे शिक्षण’ काही वर्षानंतर तिथलं शिक्षण झाल्यावर एके दिवशी त्या गुरुने दोघांना बोलावलं. म्हणाला, ‘तुम्हा दोघांचं इथलं शिक्षण पूर्ण झालं. आता तुम्ही काशीला जा. तुमचं अंतिम लक्ष काशीचा विश्वेश्वर. तिथे विश्वेश्वराच्या देवळात पोहोचल्यावर तुम्हाला ‘आत्मज्ञान’ होईल.’ असं म्हणून त्याने दोघांना झोळी दिली. अर्धी भरलेली. त्यात काही वस्तू होत्या. ते दोघं आपल्या गुरूंचा आशिर्वाद घेऊन निघाले. अनेक महिने ते चालत होते. त्यातला एक शिष्य वाटेत जे जे काही मिळेल ते जमा करत होता. एखादा रंगीत खडा, एखादी छोटी मूर्ती. जे आवडेल ते. पण दुसरा, तसं काही करत नव्हता. उलट गुरूंनी दिलेल्या वस्तू संपल्यावर त्याची झोळी रिकामी होत चालली होती. 

काही दिवसानी काशी जवळ आली. फक्त एकच डोंगर चढून उतरायचा होता. उभी चढण होती डोंगराची. दोघं चढायला लागले. ज्याची झोळी भरलेली होती त्याला दम लागला. तो मागे पडायला लागला. शेवटी रिकामी झोळीवाला त्याला म्हणाला, “अरे त्या झोळीतल्या वस्तू टाकून दे. म्हणजे पटापट चढता येईल. पण इतके दिवस जपून ठेवलेल्या वस्तू त्याला टाकणं जीवावर आलं. तो दुसऱ्याला म्हणाला. तू माझी काळजी करू नको. तू हो पुढे. मी येतो हळूहळू. 

शेवटी तो रिकामी झोळीवाला पटापट चालत डोंगर चढून उतरून काशीला देवळात पोहोचला..! इकडे, त्या भरलेल्या झोळीवाल्याला रस्त्यात लुटारुनी गाठलं..! त्यांना वाटलं ह्याच्याकडे काही मौल्यवान खडे आणि वस्तू आहेत. त्यामुळे त्यांच्यात झटापट झाली. आणि त्यात त्या बिचाऱ्याचा जीव गेला. इतकं करून, शेवटी काही गोष्टींच्या मोहापायी तो त्याच्या अंतिम लक्षापर्यंत पोहचू शकला नाही..” 

   तर ह्यातून काय बोध घ्यायचा मंडळी….? नाडकर्णी सरांच्या ह्या प्रश्नावर, मी कथेतून वास्तवात आलो. नाडकर्णी सरांचा आवाज पुन्हा सौम्य झाला. आता ते थोडे मायेने बोलायला लागले.. 

    तर ह्यातून असा बोध घ्यायचा मंडळी की, आपण सगळेच अर्धी भरलेली झोळी घेऊन आलेलो असतो. ती पूर्ण भरण्याचा आपला प्रयत्न असतो. पण, आयुष्याच्या ठराविक टप्प्यावर आल्यानंतर राग-द्वेष, हेवे-दावे, मी-माझं हे सगळं मनातून उतरवत जायचं असतं.. भरलेल्या झोळीत जीव अडकला, की मोह-माया रुपी लुटारु वाटेत भेटलेच समजा. जे तुम्हाला अंतिम ध्येयापर्यंत जाण्यापासून रोखतील. अंतिम लक्ष गाठायचे असेल तर, झोळी रिकामी करत जायचं. झोळी जेवढी रिकामी तेवढे अंतिम लक्ष लवकर..” 

 

ही शेवटची काही वाक्य ऐकल्यावर, माझ्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं..! पुन्हा पुन्हा नाडकर्णी सरांची वाक्य कानात घुमायला लागली.. 

“….भरलेल्या झोळीत जीव अडकला, की मोह-माया रुपी लुटारु वाटेत भेटलेच समजा. जे तुम्हाला अंतिम ध्येयापर्यंत जाण्यापासून रोखतील. अंतिम लक्ष गाठायचे असेल तर, झोळी रिकामी करत जायचं. झोळी जेवढी रिकामी तेवढे अंतिम लक्ष लवकर….” 

 

    झोपेतून खाडकन जागं झाल्यासारखं झालं.

खरंच की, विचारांचं कीती ओझं तयार करून घेतलं होतं मी माझ्या मनावर..! कशाला….!? इथे कशाला आलो होतो मी आणि कशात अडकून पडलोय…! 

    डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मनावरचं सगळं मळभ दूर झालं. अगदी श्रावणाच्या दिवसांत सूर्यासमोरचा ढग बाजूला व्हावा आणि चकचकीत ऊन पडावं तसं…! अगदी तसंच..! 

सगळ्या ईच्छा-आकांक्षा, रुसवे-फूगवे सगळं सगळं एका क्षणात हवेत विरून गेल्यागत झालं…! 

 

देवळाच्या घंटेचा टोला पडला आणि मी लांबूनच रवळनाथाच्या मूर्तीकडे बघितलं. आज ती मूर्ती माझ्याकडे बघून गालात हसतेय असं वाटलं. 

मी ही हसलो. नकळत हात जोडले गेले. डोळ्यात पाणी आलं. म्हटलं, ‘तुझा खेळ कुणालाच नाही कळला बाबा.. प्रश्न निर्माण करणाराही तूच, आणि उत्तरं देणाराही तुच..! 

 

मी मागे वळलो. नाडकर्णी सरांचं व्याख्यान उरकलं होतं. मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. त्यांचे दोन्ही खांदे घट्ट पकडले आणि म्हटलं, ‘खूप छान नाडकर्णी. खूप छान… खूप मोठं कार्य करताय. असंच समाजप्रबोधन करत रहा..’ माझे डोळे पाण्याने भरले होते. नाडकर्णीनाही मला काय झालंय ते कळत नव्हतं.. तश्याच प्रश्नार्थक भावाने त्यांनी हात जोडून मला ‘धन्यवाद’ म्हटलं.

    मी झपाझप पावलं टाकत, घराकडे निघालो. 

घरी आलो. सदूच्या सुनेला जेवण वाढायची विनंती केली. 

मनसोक्त जेवलो.. आणि आराम करायला घरात आलो. 

आराम झाल्यावर उठलो. हात-पाय तोंड धुतलं. माझी ब्याग भरली. आता संध्याकाळ होत आली होती. 

निघायची वेळ झाली.. 

घरातल्या देवांना नमस्कार करून निघालो. दरवाज्यातून बाहेर आल्यावर उंबऱ्याला नमस्कार केला आणि दरवाजा बंद केला. कुलूप लाऊन किल्ली सदूच्या हातावर ठेवली. 

सदूने माझा हात हातात घेतला. म्हणाला, “येत रहा…” त्याच्या त्या सुरकुतलेल्या हातांचा स्पर्श, गहीवरुन आलेला उच्चार आणि खोल गेलेल्या घाऱ्या डोळ्यातील भाव,  काळीज चिरून गेला.. 

माझ्याही डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो. बेड्याशी गेल्यावर पुन्हा एकदा मागे वळून घराला हात जोडून नमस्कार केला. 

रिक्षाने स्टेशनवर आलो. गाडी लागली. खिडकीजवळच्या सीट वर जाऊन बसलो.. भोंगा वाजला आणि गाडी हळूहळू पुढे निघाली.. 

 

   आयुष्यातील सगळी धडपड संपल्यावर, आयुष्याच्या संधिकाली, पैलतीराची आस लागलेला मी.. गावाकडचे जुने दिवस अनुभवायला आलो होतो. पण इथे आल्यावर परमेश्वराने, प्रकृतीची एक सत्य बाजू मला दाखवून दिली. 

‘परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे.’ इथे सजीव-निर्जीव जे जे काही आहे त्याला अंत हा आहेच. इथे काहीही शाश्वत नाही. जो आलाय त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. जे निर्माण झालंय त्याला नष्ट होणेच आहे. जिथे आपण ओळख निर्माण केलेय तिथून एक ना एक दिवस निरोप घेणेच आहे. 

फक्त हे जाणं, हे नष्ट होणं, हे निरोप घेणं… इतकं क्लेशदायक नसावं. नकळतपणे बंदर, नारायण तळं, म्हातारीचा आंबा, काकांचं घर, सदू माझ्या डोळ्यासमोरून गेले.. खिडकीतून येणारा मंद वारा, आयुष्यातील सोनेरी दिवसांचा आभास देऊन गेला.. 

डोळ्यातील अश्रूंचे दोन थेंब गालावरुन ओघळून गेले. आता सगळ्या सगळ्या ईच्छा संपल्या होत्या.. ओढ होती ती फक्त त्या कृपाळु परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याची… 

     मी खिडकीबाहेर बघायला लागलो. 

नदीच्या कडेने पुढे जात गाडीने वेग धरला.. 

समोर अस्ताला जाणारा सूर्य दिसत होता.. 

माझाही परतीचा प्रवास सुरू झाला होता.. कदाचित, कधीच परत न येण्यासाठी…..

 

समाप्त… 

 

(धन्यवाद वाचकहो) 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.