कायपण येड्यावानी

Written by

काल घरात खेळता खेळता मुलीच्या डोक्याला डोकं लागून टक्कर झाली आणि मग मुलीने लगेच हाताचे बोट कपाळ, गाल, हनुवटी यावरून फिरवून सुरू केले, 

गा….ई म….ला शिं….गे दे….ऊ नssकोssस मी….तु….ला चा….रा पा…..णी देssईssन….

शेवटचा ‘न’ नेमका कपाळावर आला आणि ती ओरडली, मम्मी …..मला शिंगं येणार, थांब परत करते…….आणि तिची गाडी पुन्हा सुरु झाली.मग जेव्हा तो ‘न’ गालावर आला तेव्हाच ती थांबली.

खरतरं ती लहान असताना मीच तिला हा उदयोग शिकवला होता, माझ्या यडछाप लहानपणची गंम्मत टिकवून ठेवण्यासाठी!!!

माझं बालपण साताऱ्यातलं, जन्मापासून पाचवीपर्यंत मी तिथेच वाढले. तिथेच या साऱ्या धम्माल यडछाप गोष्टी केल्या, ज्याच्या सुखद आठवणी अजूनही मनातून जात नाहीयेत.

त्यावेळी शाळेतल्या, आजूबाजूच्या, आम्हा साऱ्या मैत्रिणीमध्ये बऱ्याच भ्रामक कल्पना पसरल्या गेल्या होत्या आणि आम्ही त्या अतिशय भाबडेपणाने फॉलो करत होतो.

जसं की………..

दोन साळुंख्यांची जोडी दिसली की हाताची दोन बोटं ओठावर ठेऊन दोनदा पप्पी दिल्याची ऍक्टिंग करायची, का तर गोड खायला मिळेल. (तेव्हा आता सारखं ऊठसूठ गोड तोंडात पडायचं नाही, त्यामुळे ते हवंहवसं वाटायचं)

एक,तीन,पाच अशा विषम संख्येत साळुंख्या दिसल्या तर दिवस खराब जाणार, मग त्यांची संख्या सम झाल्यावरच तिथुन हलायचं.

अजूनही साळुंख्यांची जोडी दिसली की हमखास माझी दोन बोटं ओठावर जातातच. 

झाडावरून कावळ्याने अंगावर शी शी केली तर त्याचा राग मानून न घेता नाचत नाचत जाऊन घरी सांगायचं का तर लवकरच धनलाभ होणार असतो. खरं सांगते एवढ्या वेळेला कावळयाने माझ्या अंगावर मलवित्सर्जन केलंय, पण आतापर्यंत एकदाही धनाची बरसात ती काय झाली नाही, पण प्रत्येक वेळेला बिनकामाची आशा मात्र वाढवली.

काळी टोपी घातलेला माणूस दिसला की तीन टाळ्या तीन वेळा वाजवायच्या, का ते आठवत नाही आता. पण भर रस्त्यात ही येडेगिरी आम्ही करायचोच.

दुसऱ्याच्या टाचेला पाय लागला की त्या माणसाशी भांडण होतं, म्हणून परत दोनदा त्याच्याच टाचेला पाय लावायचा म्हणजे होणारं भांडण मिटतं. हे असं करताना कित्ती वेळा दुसऱ्याच्या पायात कडमडून आपटलीये ते माझं मलाच माहीत!!!

जीप दिसली की दोन बोटांची कट्टी करून दोनदा सोडायची, हे पण गोडासाठीच!!! 

हे प्रकरण माझ्या अंगात इतकं मुरलय की अजूनही जीप टाईप कोणती गाडी दिसली की नकळत कट्टी होतेच होते.

मग मुलगी किंवा नवरा विचारतात, हा काय येडेपणा???

काही गोष्टी घरातल्यांनीही मनावर ठसवलेल्या. 
Roca

मांजर आडवं गेलं तर समोर तोंड ठेऊन पाच पाऊलं मागे जायचं, मग आमचा सर्वांसोबत लवाजमा चालला असला तरी भर रस्त्यात आमच्या बरोबरचा एखादा मोठा माणूस आणि आम्ही बच्चे कंपनी (आम्हाला मज्जा यायची म्हणून) पाच पावलं मागे जायचोच जायचो, मग भले कुठल्या कामाला चाललो नसलो तरी…. अगदी शाळेत जाताना सुद्धा!!! आणि त्या वेळी तर मांजरांचा खूपच सुळसुळाट होता. 

चिंचेच्या झाडाखाली अजिबात जायचं नाही, का तर भूतं झपाटतात. लहानपणी तर मी या झाडाचा एवढा धसका घेतला होता की सारखी माझ्या स्वप्नात ती चिंचेची झाडं आणि भूतं येत.

आणखी दुसरा सर्वात मोठा मानसिक छळ म्हणजे छप्पथ प्रकरण!!! आईची शप्पथ, देवाची शप्पथ, कुलदेवतेची शप्पथ, गणपतीची शप्पथ आणि सर्वात महान तुझ्या, माझ्या रक्ताची शप्पथ नाहीतर आईच्या रक्ताची शप्पथ!!! 

रक्ताच्या शपतथेची 100% हमी, ती घेतली म्हणजे समोरचा अगदी म्हणजे अगदी खरचं बोलला.

आणि नंतर ज्या मैत्रिणीने आपल्याला अशी थोर शप्पथ घातली आहे, तिने ती सुटली असं बोले पर्यंत जिवात जीव उरायचा नाही, गळाला लावलेला माणूस टपकण्याची भयंकर भीती वाटायची…. त्यात काही आगाव मैत्रिणी मुद्दाम लटकवून ठेवायच्या!!!

अरे आजूनपन नाय का आपण त्या बिचाऱ्या डी जे वाल्याला आयची शपथ घालून ब्लॅकमेल करतो. हे शप्पथ प्रकरण जाम चिवट आहे, ते जन्मोजन्मी असच चालणार वाटतं!!!!

अजून अशा emotional अत्याचारवाल्या बऱ्याच गोष्टी होत्या, आठवण काढावी तेवढी कमीच.

कालच माझी मुलगी तिला ग्लास समोर दिसला नाही, म्हणून वाटीतून पाणी पित होती; तर आई म्हणाली अगं वाटीतून पाणी प्यायचं नसतं, मामाला दारिद्रय येतं. 

त्या एवढ्याश्या वाटीनं कोणाचं काय बिघडवलं होत देव जाणे, उगाच बिचारीवर ठपका आणला गेला.

हा आणखीन एक आठवलं, आमच्या घरातल्या बायकांना कुणीतरी नवरा मुठीत ठेवायचा मंत्र दिलेला. रोज रात्री झोपताना दहा वेळा बोलायचा होता.

 तो चुकून माझ्या कानावर पडला, तुम्हाला सांगते…… तेंव्हापासून आजपर्यंत मी रोज त्याचा जप करतेय, पण अजूनपर्यंत तरी म्हणावा तसा काsही परिणाम जाणवला नाही!!! त्या बायकांना तरी जाणवला होता की नाही कोण जाणे!!!!

 इथे पण आम्ही आशेवरच…….आयेंगे मेरे भी दिन आयेंगे 

बरं ते जाऊदे, मी काय म्हणते तुम्हाला आठवतात का तुमच्या यडछापगिरीचे किस्से??? असतील तर सांगा की , मला बी लय मजा यील वाचाय.

©स्नेहलअखिलाअन्वित

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा