काय या आजकालच्या मुली.. !!!

Written by

ती लग्नकार्यांना जाते.. आहेर बिहेर करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
पाठ फिरता फिरता असेच कोणी बोलून जाते..
“काय या आजकालच्या मुली.. एक दागिना नको अंगावर यांना..”
ती थोडीशी मिटते..
दसऱ्याच्या वेळचे तिचेच दागिन्यांनी मढलेले रूप आठवते..
नंतर दिवाळी मध्ये book केलेले स्वतःचे घरही आठवते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते.. !!
ती पाहुणेरावळे करते.. स्वयंपाक बिवपाक करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
पाठ फिरता फिरता असेच कोणी बोलून जाते..
“काय या आजकालच्या मुली.. पसारा सुद्धा आवरता येत नाही यांना..”
ती थोडीशी मिटते..
उरलंसुरलं अन्न काढून फ्रिज मध्ये ठेवते.. आणि मागे वळून बघते..
पाहुणचार करून तृप्त घर तिच्याकडे प्रसन्न नजरेने बघत असते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते.. !!
ती जॉबबिब करते.. काम करते.. काम करून घेते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
केबिन च्या बाहेर पडता पडता असेच कोणी बोलून जाते..
“काय या आजकालच्या मुली.. घरचे कारण सांगून मस्त कल्टी मारता येते यांना.. ”
ती परत थोडीशी मिटते..
डेस्कवरच डबा खाते.. पटकन काम संपवते..
लायनिंग च्या ड्रेस मध्ये गळणारे दूध सावरते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते.. !!
ती बस ट्रेन पकडते किंवा गाडीला किक मारते.. धक्केबिक्के पचवते..
रस्त्यानी जाता जाता असेच कोणी बोलून जाते..
“काय या आजकालच्या मुली.. नोकरी चे कारण सांगून मस्त फिरता येते यांना..”
ती परत थोडीशी मिटते..
घरी जाऊन फ्रेशबिश होते.. पोरीला दूध पाजते..
हातात आलेला आयता वाफाळता चहा बघून सुखावते.. !!
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते.. !!!

Follow my momspresso blog for regular updates

Follow posts on FaceBook also –
https://www.facebook.com/goavanee

Follow on blogger also –
https://avanigokhale.blogspot.com/

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा