काळानुसार बदललेली विचारसरणी

Written by

कॉलनीतल्या महिला मंडळाची कुजबुज सुरु होती. एकमेकींना मोठ्या उत्साहाने सांगत होत्या, “काय हो कळालं की नाही..लिमये काकू म्हणे सुनेला आयता चहा हातात देतात ऑफिसमधून आल्यावर..तिला त्रास नको म्हणून रात्रीचा स्वयंपाक स्वतःच करतात..आता सूनबाई आल्यावर आराम नको करायला का ह्यांनी..पण ह्यांना मोठी काळजी सुनेची..अगदी डोक्यावर चढवून ठेवलय काकूंनी तिला..”
त्यावर दुसरी म्हणते, “हो ना…सुनेलाही काही वाटत नाही बाई… तिने तरी म्हणायचं ना मी करते म्हणून नाही तर बाई लावायची स्वयंपाकाला…”
तिसरी लगेच, “अहो करतील काही दिवस मग सून डोक्यावर बसली की आपल्याजवळ तिचेच गार्‍हाने करतील..”

लिमये काकू आणि त्यांचं कुटुंब म्हणजे इतक्यात कॉलनीतल्या महिला मंडळाचा आवडता विषय झालेला. अशीच कुजबुज काकूंच्या कानावर आली, आता ह्याविषयी काय ते एकदा ह्या कुजबुज मंडळाशी जाऊन बोलायला हवे म्हणून काकू मुद्दाम एक दिवस त्यांच्यात जाऊन बसल्या. लगेच त्यातली एकजण म्हणाली, “काय काकू आज स्वयंपाक करायचा नाही वाटतं….कशी काय आठवण झाली आमची.. नाही..हल्ली तुम्ही मॉर्निंग वॉक ला तेवढ्या भेटता.. सायंकाळी घाईतच असता म्हणून विचारलं हो….”
दुसरी लगेच त्यावर म्हणाली, “हो ना.. काकू आम्हाला वाटलं सुनबाई आल्यावर तुम्ही निवांत आयुष्य जगणार..आराम करणार..पण तुम्ही अजूनही पूर्वीप्रमाणेच घरात गुंतलेल्या आहात…”

लिमये काकू गोड स्माइल करत म्हणाल्या, “अगं, सूनबाई आली म्हणून सगळी जबाबदारी तिच्यावर सोडून द्यायची आणि मी नुसतंच बसून रहायचं मला नाही पटत बाई..माझा मुलगा नोकरी करतो, दिवसभर काम करून दमून घरी येतो तेव्हा त्याच्या हातात पाण्याचा ग्लास, चहा देतेच की मी…तशीच माझी सुनबाई, तिही नोकरी करते ते घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी, तितकीच तिही थकते, मग तिला चहा पाणी दिले तर त्यात काय वावगे.. बरं माझी मुलगी असती तर तिलाही असं थकून भागून आल्यावर चहा पाणी हातात दिलेच असते ना मी..मग सून आहे म्हणून उगाच सासूचा तोरा मिरवत तिच्याशी का म्हणून वेगळं वागायचं म्हणते मी…राहिला प्रश्न रात्रीच्या स्वयंपाकाचा तर सकाळी धावपळ करत ती आम्हा चौघांचा स्वयंपाक, नाश्ता बनवून जाते. बाकी घरकामाला बाई आहे मग मी दिवसभर नुसतीच बसून राहिल्या पेक्षा स्वयंपाक बनविला तर काय चुकीचं नि त्यात. जसं मला माझ्या हातचं जेवण खाऊन कंटाळा येतो, दुसऱ्या हाताची चव चाखावी वाटते तसं तिलाही वाटत असेलच ना..मला आवड आहे पूर्वीपासूनच स्वयंपाकाची, ती येत पर्यंत तर दोन्ही वेळा मी करायचे आता तरी एकच वेळ करते..आणि राहिला प्रश्न बाई लावण्याचा तर‌ तिने खूपदा म्हंटलं मला बाई लावण्या विषयी पण मीच नको म्हणाले. माझा तितकाच वेळ जातो, समाधान मिळत आपल्या नवर्‍याला , मुलगा सुनेला आपल्या हातच आवडीनें खाताना बघून..काही चुकीचं आहे का सांगा त्यात…माझ्या सासूने मला सासूचा तोरा दाखविला पण त्याने झाले काय की माझं त्यांच्याविषयीचं मत , मनात त्यांचा मान हा उलट कमीच झाला. त्यांनी मला सासुरवास केला म्हणून मी माझ्या सुनेला करावा आणि स्वतःचा मान स्वतः कमी करून घेत मुलगा सुनेच्या संसारात विष पसरविणे मला नाही पटत..काळ बदलला तसच आपणही बदलायला नको का..तुम्हीच सांगा बरं..उलट सुनेशी हसतखेळत, गोड्या गुलाबी ने राहीलो तर घरात आनंद टिकून राहतो..पटकयं का…”

लिमये काकूंच्या बोलण्यात खरंच तथ्य आहे हे प्रत्येकीला कळत होते. काळानुसार बदल हा खरंच खूप गरजेचा आहे हे बर्‍यापैकी महिला मंडळाला पटले होते. त्यांच्या या बोलण्यावर कुणाकडे आज उत्तर नव्हते. आपण उगाच सासू सून यांच्या नात्याला वेगळ्या नजरेने बघतो आणि तेच मुळात चुकतं हेही लक्षात आले होते.

लिमये काकू इतकं बोलून घरी निघून गेल्या पण काल पर्यंत त्यांना नावं ठेवणारी तिथली प्रत्येक महिला आज काकूंच्या विचारांचा आदर करत त्यांची वाहवा करीत होत्या. त्या दिवसापासून काकू म्हणजे एक आदर्श सासूबाई ठरल्या होत्या.

खरंच विचार करण्याजोगे आहे ना. काही नात्यांना आपणच वेगळ्या नजरेने, अपेक्षांच्या ओझ्याने बघतो आणि दुरावा निर्माण करून घेतो. मी लहान तो मोठा, माझा मान मोठा त्याचा कमी अशा संकल्पना आपणच निर्माण केलेल्या आहेत पण वेळेनुसार त्या बदलणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. काळ बदलला तसच आपणही विचार बदलून आयुष्य जगलो तर आनंदच आहे. लिमये काकू सारखा विचार करून प्रत्येकीने वागले तर नाते तुटण्या ऐवजी अजूनच घट्ट होतील.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत