काळ्याकुट्ट अंधारानंतरची एक सोनेरी पहाट

Written by

काळोख वाढत होता तरी चिंधीच्या डोळ्यांवर अजिबात झोप नव्हती ती एकटक तीच्या फुटपाथवरच्या संसाराला बघत होती. चार पाच फुटकी भांडी अन् प्लास्टिकच्या पिशवीने अन् पालापाचोळ्यानं बनवलेल्या झोपडीतला तिचा संसार होता. चिंधीचं वय पण फार नव्हतं फारतर एकोणीस  वीस  ……अन् तिचा अंगाखाद्याने धिप्पाड , थोराड असलेला तिचा नवरा शंक-या……ह्या दोघांचा होता तो संसार …..एका विशिष्ट समाजातली ही जागोजागी भटकणारी जमात खरतर अजूनही प्रवाहात आलेली नाहीये हेच मोठं दुर्दैव ……….

आईबापाने वयानं मोठया असलेल्या शंक-याशी चिंधीची गाठ बांधली आणि ते एका मोठ्या बंधनातून सुटले. आई- बाप तर तेंव्हाच त्यांच्या वाटेला निघून गेले आणि शंक-या चिंधीला घेऊन शहराच्या ठीकाणी भटकत फुटपाथवर राहू लागला. जिथं कुत्री घाण करायची तिथं ती दोघं रहात होती. तिथच घाणीत रहायचं अन् तिथच खायचं.

कधी सफाईचं काम, कच-याचं काम तर कधी छोटी- मोठी चोरी करत रोजचं अर्धपोट खायला मिळायचं अन् तो रोज चपटी मारून यायचा. अन् मग चिंधीच्या शरीराची चिंधी- चिंधी करणं हे रोज सुरू व्हायचं. तीच्या कुठल्याच मर्जीला तिथं स्थान नव्हतं.

“अव् धनी लय दुखायलय, आता बास करा….मला ह्या कळा सोसवेना ना वो”  म्हणत ती रडायची पण तरीही, मनासारखं सुख मिळालं नाही की,परत-परत तो तीच्या शरीराला ओरबडायचा अन् त्याच्या मनासारखं झालं की, तीला झुरळ झटकल्यासारखं झटकायचा.

चिंधीला ह्या सगळ्या गोष्टींचा वीट आला होता. जिथे प्रेमाचे दोन शब्द नाही अन् सुखाचा एक क्षण नाही….. तिथे ती गुदमरत होती. फार मोठं सुख नाही पण निदान अर्धी भाकरच ह्या घाणीपासून दुर जरा स्वच्छ जागी खावं अन् मानानं जगावं असं तीला वाटायचं. पण शंक-या ला तिचं काहीच वाटत नव्हतं.

एक दिवस ती शंक-याला म्हणाली

“म्या बी काम करते व् धनी म्हंजी जरा चार पैकं मिळत्याली अन् मंग चार घास बी खायाला व्हईल”

त्या दिवशी शंक-यानं तीला कामासाठी होकार दिला म्हणून चिंधी दुस-या दिवशी फुटपाथच्या पलीकडे बांधकामाच्या ठेकेदाराकडे काम मागायला गेली अन् त्याच्याशी बोलताना हसली. तिनं हसायला अन् शंक-यानं तीला पहायला एकच वेळ झाली. तो जोरात ओरडला.

“चिंधे …..आय घाले ह्ये काम करायली व्हय ग् भोसडीचे” म्हणत तिथंच तीला शिव्या घालत लाथाबुक्क्यांनी मारू लागला. अन् मारत मारतच फरफटत तिला घेऊन त्याच्या फुटपाथच्या झोपडीत शिरला अन् परत मारायला लागला.

“म्या कमी पडलो हुतो व्हय ग् की तू इकडं तिकडं तोंड मारत व्हतीस” ….? चिंधीला बोलायची एक संधी न देता तो तीला मारतच सुटला आणि आता मारत मारत तो तिच्यावर बलात्कार करत होता…….

कुठल्या गोष्टीची शिक्षा ह्या जन्मात मिळतीये म्हणून चिंधी आक्रोश करत होती. 

ब-याच वेळानं चिंधीची सुटका झाली. अन् शंक-या चपटी मारायला निघून गेला.

रात्र झाली होती आता शंक-या यायची वेळ झाली होती आणि चिंधी मात्र शुन्यात नजर लाऊन होती अन् अचानक तीला गलबलून आलं. कारण तीची पाळी चुकली होती आणि त्यासाठीच तिचा कामासाठी अट्टाहास होता. येणाऱ्या जीवाला चार घास तरी मिळावे एवढीच तीची अपेक्षा होती पण शंक-या हे सगळं समजून घेणा-यातला नव्हता. जो बायकोला फक्त एक भोग वस्तू समजतो त्याला एका आईची व्यथा कशी कळणार होती?

चिंधी आता खुप थकली होती आणि तीला एक नवीन भविष्य हवं होतं. स्वतः साठीही आणि तीच्या येणाऱ्या जीवासाठीही …..

आता आपण गप्प बसलो आणि असाच मार खात राहीलो तर आपण आपल्या बाळालाही गमावून बसू म्हणून ती तेवढ्या रात्रीही उठली अन् पायाला हिसके देत, फरफटत ती मोठया निर्धाराने चालू लागली. रक्तबंबाळ असलेल्या तिच्या शरीरातून रक्तही गळत होतं पण त्याकडेही तिनं दुर्लक्ष केलं अन् चालतच राहिली……. ब-याच वेळाने ती एका पोलिस चौकीसमोर थांबली अन् दुस-याच क्षणी ती मोठ्या आत्मविश्र्वासाने आतही पोहोचली.

समोरच्या मोठया खुर्चित एक मोठ्या पोलीस बाई फोनवर बोलत बसल्या होत्या, पण हिला पाहताच त्यांनी आधी फोन ठेवला आणि चिंधीला मदतीसाठी हात देत तिला खुर्चिवर बसवलं. मोठ्या पोलीस बाईंना तिच्याकडे पाहत जराही वेळ लागला नाही तिची परिस्थिती समजायला …….त्यांनी तरीही चिंधीकडून सगळी माहिती घेतली आणि लगेच सगळी सूत्र हलली. पुढे काय झालं हे चिंधीला समजलचं नाही.

काळ्याकुट्ट अंधारानंतरची एक नवीन सोनेरी पहाट झाली होती……

चिंधी रात्री ग्लानीने तिथेच झोपून गेली होती आणि शंक-या त्या जेल मधे होता. पण अजूनही तो तीला शिव्या देतच होता त्याने जे आजपर्यंत केलं होतं, त्यासाठी त्याला जराही दु: ख नव्हतं. पण एवढीशी चिंधी इथवर कशी पोचली ह्याची कळ त्याला चांगलीच झोंबली होती.

जे झालं ते मी कसं काय करू शकले याचा विचार करत ती तीच्या पोटावर मायेनं हात फिरवत होती.

“बाई ! म्या तुमचे कितीबी उपकार मानले तरीबी त्ये कमीच हाय ….तुम्ही माज्यासाटी ज्ये केलं ते म्या कदीबी इसरनार न्हाय अन् माझ्या पोटचं अजून न जनमलेलं लेकरूबी तुमच्यामुळंच जितं हाय” म्हणत पोलीस बाईंसमोर ती रडू लागली…….

चिंधी गरोदर आहे हे कळताच पोलीस बाईंना गलबलून आलं. कारण लग्नाला दहा वर्ष होऊनही त्यांना मूलबाळ न्हवतं. म्हणून आई होण्याचं काय सुख असेल हे त्यांना चांगलच समजत होतं……

आता चिंधीच्या आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी त्यांनी एका समाजसेवीकेच्या मदतीने चिंधीची रवानगी एका संस्थेत केली जिथे तिच्यासारख्याच अनेक पिडीतांचं पुनर्वसन केलं जात होतं. मानानं, सन्मानानं जगायला शिकवलं जात होतं.

चिंधी आता एका गोड मुलीची आई आहे. आणि कष्ट करत ती तिच्या मुलीचं आणि स्वतः चं आयुष्य सावरत आहे आणि थोड्यातच का होईना ती ताठ मानेने जगत आहे.

समाजात अशा खुप चिंधी आहेत. काही फुटपाथवर तर काही गडगंज संपत्ती च्या मधे एकट्याच आहेत. काही अशिक्षित, गरीब म्हणून चिरडल्या जातात तर काही स्टेटसच्या नावाखाली भरडल्या जातात. पण अाता कुठेतरी बदल हवाय आणि थोडीशी हिंमतही हवी आहे. आत्मविश्र्वास हवा मगच बदल घडेल. आणि एका अंधारानंतर सोनेरी पहाट पहायला मिळेल …….

©Sunita Choudhari. 

(नमस्कार मित्र-मैत्रीणिंनो, आजची कथा एका सत्यघटनेवर आधारीत रचलेली कथा आहे. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. मग अाता वाट कसली बघताय ? सुरू करा तुमची लाईक, कमेंट, शेअर आणि हो चुकाही आवर्जुन सांगाल…… आणि मला फाॅलो करायलाही विसरू नका बरं का ….. )

 

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा