कितीही कर..त्यांना कुठे ना कुठे चूक दिसणारच

Written by

कितीही कर..त्यांना कुठे ना कुठे चूक दिसणारच…

शुभदा,माझी मैत्रीण खूप दिवसातून भेटली काल. खूपच बारीक झाली होती ती, एरवी कॉलेजला टापटीप राहणारी, नवीन नवीन फॅशनचे कपडे परिधान करायची, केस नेहमी मोकळे, गालावर तीळ, तिचे ते खळखळून हसणं सगळं हरवलेलं होतं…तिला विचारलं मी “ही काय अवस्था करून घेतलीयेस स्वतःची, काळजी घेत नाहीस का?? तुझ्याकडे बघून असं वाटायचं की किती बघावं आणि किती नाही आणि आता अगदी हडकुळी झालीस, चेहरा काळवंडला, डोळे खोल गेलेत,सगळं व्यवस्थित आहे ना?”

तर सांगायला लागली सगळं व्यवस्थित आहे पण बाळ सांभाळायला, मदत करायला कुणी सोबत नाही, एकटीच असते त्यामुळे स्वतःसाठी वेळ मिळत नाही म्हणून.. तसं तिचा प्रेम विवाह आणि नवराही अगदी सोज्वळ, तिच्यावर जीवापाड प्रेम करतो , तो होईल तेवढी मदत करतो पण ऑफिस करून त्यालाही फार वेळ मिळत नव्हता.

गप्पा मारता मारता मला जाणवले ही वेगळ्याच धुंदीत आहे, कसलातरी विचार तिला आतल्या आत खातोय. मी फार आग्रह नाही केला पण विचारलं तिला काही बिनसलय का? घरी सगळं ठीक ना?तेव्हा अचानकच खूप रडायला लागली, एरवी इतकी खुशमिजास राहणारी शुभदा एवढी रडते हे मी पहिल्यांदाच बघत होते. तिला मनमोकळं रडू दिल मी, खूप रडू साठवून ठेवलं होतं मनाच्या कोपऱ्यात सगळं बाहेर येऊ दिल… कधी कधी अश्रूंना वाट मोकळी करून दिल्यानेही बरच ओझं हलकं होतं… तिला म्हंटल सांग आता का रडतेस एवढी???

शुभदा सांगू लागली, “अंग तुला तर माहितीये ना आम्ही नवरा बायको नोकरीमुळे घरापासून बाहेरच राहतो वेगळे आधीपासून, सासू सासरे सगळे अगदी समंजस, कसलं बंधन नाही, व्यक्तिस्वातंत्र्य जपतात सगळे घरात एकमेकांचं.. मग मीही तेवढ्याच प्रेमाने सगळ्यांच भरभरून करते, मोठं कुटुंब आहे, जरी दुर राहत असलो तरी एकमेकांच्या घरी नेहमीच येत जात असतो आम्ही सगळेच,मी सगळ्यात लहान असल्यामुळे कुठेही जा काम काही चुकत नाही, मदत करतात सगळे तशी पण आपल्या घरी आल्यावर तर शेवटपर्यंत पुरून उरावे लागतेच ना… माझ्या घरी नेहमीच पाहुण्यांची खूप रेलचेल असते, सासू सासारे जरी चांगल्या विचारांचे असले तरी काही नातेवाईक आहेत ज्यांच्यामुळे आनंदात नेहमी विरजण पडते.तरीही माझ्या घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे मी मनापासून करते, नोकरी करून घर सांभाळत सगळ्यांची मनही जपते, सासूबाईनि खूप केलय सगळ्यांच मग त्यांना असं वाटतं माझ्या सुनेनीही करावा ,तिचं नाव निघावं चारचौघात.. मी खूप प्रयत्नही करते पण कुणाला ना कुणाला काहीतरी चूक दिसतेच.. आणि मग ते पटकन बोलूनही दाखवतात मग खूप वाईट वाटते की एवढं करूनही मी कमीच पडतेय का??

आताच वीस पंचवीस दिवसापूर्वीची गोष्ट आहे, एक जवळचे नातेवाईक ऍडमिट होते दवाखान्यात, मोठं ऑपरेशन होतं सगळ्या सुविधा वेळेवर उपलब्ध व्हाव्या म्हणून इथे शहरात आणलेलं..मग इथे दुसरं कुणी नातेवाईक नसल्यामुळे, माझ्याकडेच थांबले त्यांचे मुलगा,सून आणि पत्नी.. त्या काकांचा मुलगा विनोद आणि सून विशाखाही उच्चशिक्षित आणि समंजस, नोकरी करणारे आणि दुसऱ्याचा जीव जाणणारे आहेत, मी खूप मनापासून सगळ्यांची सेवा करत होते, अगदी चहा,नाश्ता, डब्बा सगळ्यांची काम करत होते.. माझं बाळ तर तुला माहितीये ना किती ऍक्टिव्ह आहे, खूपच चपळ आणि मी आणि त्याचे बाबा दोघेच राहतो म्हंटल्यावर तिसऱ्या माणसाकडे जातच नाही..त्यात कुणी पाहुणे आले की मला चिटकूनच राहणार..मग त्याच्या बाबांकडेही राहत नाही.. त्याला कडेवर घेऊन सगळी काम केली मी, त्यांची सून विशाखा खुप मदत करत असे, पण तिलाही दवाखान्यात जावं लागतं असे. या सगळ्या धावपळीत विनोदभाऊ आणि विशाखा ताईही आजारी झाले म्हणजे मी एकदम एकटी पडले आणि घरात आणखी दोन पेशंट..सगळ्यांच करत करत जीव मेटाकुटीला आला तरीही हसत खेळत सगळं करत होते कारण त्यांचा मुलगा आणि सून खूपच प्रेमळ आहेत.. दवाखानाही घरापासून दूर मग जाण्यायेण्यात त्यांचा खूप वेळ जात असे.. रात्री अकरा साडे अकराला सगळे घरी येत, मग जेवण त्यानंतर भांडी घासत, ओटा आवरत साडे बारा एक वाजून जाई.. त्यात बऱ्याचदा बाळ मधे मधे त्रास देई, त्याला झोपवून परत कामाला लागले की तो पुन्हा जागा होत असे.. अशातच त्याला खूप सर्दी, खोकला ताप आला मग तर तो मला सोडायलाही तयार नव्हता. दुसऱ्या दिवशी गणपती बसणार होते, म्हणून सासु सासरेही आले होते.. रात्रीच बरीच तयारी केली, झोपत झोपत दोन वाजून गेले.. ती रात्र कशीतरी काढली पुन्हा सकाळी पाच वाजेला उठुन कामाला लागले…सकाळी सगळ्यांना आंघोळीला पाणी काढून देण्यापासून टॉवेल हातात देण्यापर्यंत सगळं करावं लागायचं…स्वतःचं आवरून मी सगळी स्वयंपाकाची तयारी केली, पुरणावरणाचा नैवेद्य करायचं ठरलं होतं, रांगोळी काढली, दाराला तोरण बांधले, सगळ्यांना चहा नाश्ता दिला..बाळालाही आवरलं, त्याला दवाखान्यात घेऊन जायचं होतं म्हणून डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली अकरा वाजेची..गणपती स्थापनेची सगळी तयारी केली..सकाळचे दहा वाजत आले होते.. त्या काकू खूप धार्मिक आहेत, त्यांच्या हातून गणपती स्थापना करून घ्यावी असा विचार आला मनात, दरवेळी मी आपल साधभोळ जमेल तसं बसवते गणपती पण त्या अगदी साग्रसंगीत पद्धतीने पूजापाठ करतात असं मला माहित होतं..त्याही आनंदाने तयार झाल्या..पण सकाळी लवकर सगळं करावं लागणार होतं कारण त्यांना दवाखान्यात जायची घाई होती आणि मलाही पिल्लुला डॉक्टर कडे घेऊन जायचं होतं, रात्रीतून खूपच ताप चढला होता त्याला.. खरंतर कशातच मन लागत नव्हतं पिल्लुला अस बघून पण नाईलाज होता.. आठ दिवसाची थकलेली मी, मलाच खूप अशक्तपणा जाणवू लागला.. मदत होती सासूची,विशाखा ताईंची पण तरीही दिवसभर काम पुरत होतं.. मग हाताला लागेल तो ड्रेस घातला आणि गणपतीची स्थापना केली.. आरतीसाठी ताट हातात होते, डोक्यावर पदर म्हणून ओढणीचा घेतला तेवढ्यात त्या काकू एकदमच तिरसट नजर करून म्हणाल्या,’सणवार, पूजापाठच्या दिवशी सुद्धा साडी नेसायला नको या पोरींना..इकडे फॅशन नाही वाटते साड्यांची’.. ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी आले माझ्या.. जरी मी रोज साडी नेसत नसले तरी प्रत्येक सणवाराला हमखास साडी नेसतेच, अगदी बांगड्या,नथ पासून सगळा साजशृंगार करते…कुणाचाही बंधन नाही बरं नवराही अगदी साधाभोळा.. मला त्रास नको एवढ्या स्वयंपाकाचा तर कोण खाणार आहे म्हणून पुरणपोळी ऐवजी श्रीखंड आणतो विकत म्हणणारा..पण माझीच आपली हौस म्हणून मी करते सगळं.. कार्यक्रम, लग्न सोहळे,कुणाच्या घरी येणंजाणं, कंपनीचे कार्यक्रम सगळीकडे नेसतेच गं मी साडी पण वेळ लागतो मला साडी नेसायला आणि खुप घाई झाली म्हणून त्या दिवशी नाही जमली साडी नेसायला आणि सगळ्यात मंहत्वाचं माझं पिल्लू तापाने फणफणतय माझ्यासमोर तर काय इच्छा होईल नटण्याची..मनात विचार आला यांना उशीर होऊ नये म्हणून मी घाईघाईत एवढं आवरलं, आठ दिवसापासून राब राब राबतेय, पेशंटला भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती घरी आली की चहा पाणी, जेवण सगळं बघतेय त्यांचं, रात्री उशिरा झोपुन सकाळी सगळ्यांच्या आधी उठून पुन्हा सगळं आवरतेय, सगळ्यांची काळजी घेतेय, बाळाला हातात घेऊन सगळ्यांचा स्वयंपाक करतेय ही धावपळ न दिसता त्यांना फक्त मी साडी नाही नेसली एवढंच का दिसलं असेल?? आणि साडी नाही नेसली म्हणजे मी काहीच करत नाही असा नाही ना? तरीही मी सगळं सोडून परत कामाला जुंपले, सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढले.. पण माझी एवढीच अपेक्षा होती की नवरा, सासू किंवा सासरे कुणीतरी त्यांना म्हणायला पाहिजे होते लगेच की किती धावपळ आहे तिच्यामागे म्हणून नसेल नेसली पण कुणाच्या तोंडातून ब्र पण नाही निघालं.. मग त्या प्रसंगापासून आजवर घडलेले असे अनेक प्रसंग आठवले मला… बऱ्याच वेळा सगळ्यांसाठी खूप काही करूनही कौतुक तर नाहीच पण काहीतरी चूक शोधलीच जाते माझी.. आणि आपण मात्र का मनाला लावून घ्यायचं असा विचार करून सोडून देत होतो.. सगळे गेल्यावर घरात विषय घेतला मी या बाबतीत तर नवरा सासू सासरे सगळ्यांचं एकच मत की सोडून द्यायचं.. ते लोक बोलतच राहणार..आम्हीही खूप ऐकलंय.. ते कधीच नाही सुधारणार..

मग विचार आला की का नाही सुधारणार, आपण फक्त करत राहायचं आणि यांनी सतत आपल्याला दुखवत राहायचं का?…तुम्ही ऐकलं म्हणून मीही ऐकू, सहन करू का? मुळात साडी नेसणे हा एकच मुद्दा नाही अशे नांनाविध मुद्दे आजपर्यंत उचलले गेले आणि मी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा विसर पडला सगळ्यांना मग खूपच वाईट वाटते गं.. लोकांना वरकरणी सगळं छान वाटतं पण माझी होणारी फरफट कुणी बघत नाही.. ”

एवढं बोलून ती पुन्हा रडू लागली.. तिला समजावलं “बाई तुझी खरोखर चूक आहेच मोठी, मुळात तूच तुझं प्राधान्य काय असावे हे विसारलीये, सध्या तुझी टॉप प्रायोरिटी तुझं पिल्लू पाहिजे, तू सगळं सोडून आधी बाळाला दवाखान्यात घेऊन जायला हवं होतं आणि पाहुण्यांना सगळं हातात दिलं पाहिजे असं काही गरजेचं नाही, मदत घ्यायची सगळ्यांची.. परफेक्ट सासूची परफेक्ट सून होताना तू imperfect आई होतेय हे विसरलीस.. आणि एक वर्ष पुरणपोळी ऐवजी साखर तूप पोळीचा नैवेद्य ठेवला असता तरी देवाने चालवून घेतलं असतंच..आणि सगळ्यात महत्वाचं तू नवरा सासू सासर्याकडून का अपेक्षा ठेवतेस की त्यांनी तुझ्यासाठी लढावं.. त्या काकूंना तुही उत्तर देऊ शकत होतीच की..मी भांडायला किंवा उद्धट बोलायला नाही सांगतंये पण तुझी बाजू तू नक्कीच मांडू शकली असतीस.. आणि मागचं सगळं आठवून आतापर्यंत तू मनात स्वतःला खात आहेस, आतल्या आत स्वतःला पोखरतेय.. तुला आज एक कानमंत्र देते…Don’t try to be perfect..कितना भी करो किसीं ना किसीं को कूछ ना कुछ काम पड ही जाता है..मुळात परफेक्ट असं काही नसतंच.. जे आहे तेच परफेक्ट मानून घ्यावं लागतं.. तू जशी आहेस तशीच परफेक्ट आहेस आधी हे तू मान्य कर तेव्हा इतर लोक मान्य करतील आणि स्वतःची फरफट बंद कर..काही गोष्टींना नाही म्हणायची सवय कर नाहीतर शारीरिक आणि मानसिक दोन्हीही स्वास्थ्य बिघडवून घेशील”…तिला पटलं माझं म्हणणं.. स्वतःसाठी थोडं जगते आता असं म्हणून निरोप घेतला तिने माझा..

मैत्रिणींनो अशे एक ना अनेक अनुभव तुम्हालाही आले असतील..सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि आपल्या तब्येतीकडे, आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतो पण त्याची काडीमात्र किंमत नसणारे काही लोक असतात त्या शुभदाच्या काकू सारखे.. तेव्हा अशा लोकांचा खूप विचार न करता आपल्याला जे शक्य आहे ते करा प्रसंगी नाही म्हणायलाही शिका.. कारण कुणासाठी कितीही करा त्यांना आपली काही न काही चूक दिसणारच…

लेख आवडल्यास लाइक आणि कंमेंट जरूर करा…
©® सुवर्णा राहुल बागुल
फोटो साभार- गुगल

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा