कुठे आहेस तू देवा…

Written by

 

    कुठे आहेस तू देवा…. जय हरी विठ्ठल
                      ©जयश्री कन्हेरे -सातपुते

सरिता काकूंना फिरायची भारीच आवड होती पण मूल लहान आहेत मग ती मोठी झाली.. घर कस सोडून जायचं या सर्व संसाररुपी चक्रात त्या इतक्या अडकल्या की त्यांना फिरायला कुठे जाण जमलंच नाही.. इतकंच काय तर काकांनी पण त्यांना कधी आग्रह करून फिरायला किंवा देव दर्शनाला नेलं नाही.. 

    मुलांचे शिक्षण झाले.. लग्न झाली तरीही  काकूंचा घरातील मोह सुटला नाही व त्यांच देवदर्शन काही झालं नाही .  काकूंना विठ्ठल दर्शनाची खूप आवड होती. नातवंड झाल्यावर त्या म्हणाल्या की आपण जाऊया पंढरपूरला.. पण कुणी त्यांना सिरियसली घेतलं नाही व नेलं देखील नाही. वयोमानानुसार त्यांच्या पायानी साथ सोडली होती.. गुढघे दुःखी इतकी वाढली आणि हळूहळू त्यांना चालनेही जड होऊ लागले..

  इतकं काय कमी होत काकूंच दुखणं.. जे त्यात भर म्हणून अचानक त्यांना हार्ट अट्याक आला.. लगेच दवाखान्यात हलवलं त्यांना.. तो महिना होता आषाढीचा.. काकूंना वाटत होत आता पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन न घेता मी जाते की काय वैकुंठास?  नशिबाला देवाची साथ असली तर माणूस कितीही मोठी लढाई जिंकू शकतो.. तसंच झालं बायपास सर्जरी झाली काकूंची.. त्यांना जपावं तर लागणार होतच..दवाखान्यातून सुट्टी घेऊन त्या घरी आल्या..

     सगळे त्यांची खूप काळजी घेत होते.. काय हवं नको ते सगळ बघायचे.. काकांच्या लक्षात एव्हाना आल होत.. की “आपण सरिताच्या काही इच्छा पूर्ण केल्या नाही.. आता या प्रसंगात तिला काही झालं असत तर?  ती तशीच अतृप्त मनाने गेली असती नाही का? “

    काकूंना छान आराम करू दिला व दिवाळीत म्हणजे कार्तिकच्या यात्रेला काकांनी व मुलं, मुली मिळून आईला पंढरीच दर्शन घडवून आणायचं ठरवलं.. त्यानुसार गाडी ठरवली.. काकूंना चालणं आधीच जमायचं नाही.. त्यामुळे व्हीलचेअर घेतली.. आणि आणलं काकूंना एकदाच पंढरपूरला..

      दर्शनासाठी लाईन मधे लागण शक्य नव्हतं… विनंती करूनही मंदिरातील विश्वस्थ मंडळ मानायला तयार नव्हते.. इतक्या लांब येऊनही विठू माउलीला स्पर्श नाही करू शकत… काय करावं याच विचारात सगळे होते..मुख दर्शन हाच एक पर्याय होता.. आणि तो काकूंना सांगितला…

          तेंव्हा सरीता काकू म्हणाल्या… “तुम्ही मला इथे पर्यंत आणलं.. माझी इच्छा पूर्ण केली.. तसं बघितलं ते विठू माऊली कणाकणात आहे.. मीच वेडी आहे जी इथे येण्याच्या अट्टाहास करत होते.. जिथे माणसाची मजबुरी ओळखल्या नाही जातं.. भक्तांना देवापासून दूर ठेवतात.  असे नियम काय देवाने घातले आहेत का?  माझी माऊली तर भक्तांना त्यांच्या घरी जाऊन दर्शन द्यायची.. मग आता चरणस्पर्श नाही झाला तरी चालेल.. देव अशा माणसात कसा राहू शकतो?  माझी माऊली इथे नाहीच.. फक्त मूर्तीरुपी प्रतिमा आहे तिला स्पर्श केला काय किंवा मुख दर्शन घेतलं काय सगळं सारखंच आहे मला.. “

    “अग आई.. तिथे पण चरण स्पर्श नाही करू देत.. लगेच समोर पाठवतात.. आणि मुखदर्शनात तरी माऊलीची मूर्ती नजरेत साठवता येते,असं ऐकलं आहे मी.” सुधा म्हणाली

     “चला लवकर मुख दर्शन घेऊया व समोरच्या प्रवासाला निघूया..” काकू म्हणाल्या

    आयुष्यभर.. विठ्ठल दर्शनाची ओढ मनात असणाऱ्या काकूंना.. अचानक कसा काय साक्षात्कार झाला.. “देव हा कणाकणात आहे..?” 

     त्यांच्या ऑपरेशनच्या वेळी होणारी सगळ्यांची धावपळ… मुलांचे केविलवाणे चेहरे, नवऱ्याच काळजी रुपी प्रेम,  आणि ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरमधे असणारा देव (आपण पैसे देतो.. ऑपरेशनचे पण कधी कधी तेही कामी येत नाही व जीव जातो . म्हणूनच डॉक्टर रुपी देव म्हणाले मी )हे सगळं क्षणात त्यांच्या नजरेसमोरून गेलं…. व त्या म्हणाल्या “मला आषाढ महिन्यातच विठ्ठलाचं दर्शन झालं.. माझ्या केविलवाण्या मुलांच्या चेहऱ्यात, इतक्या वर्षाच्या संसारात नाही दिसलं ते प्रेम दिसलं यांच्या चेहऱ्यावर त्यातही विठूमाऊली होती.. डॉक्टरनी मला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात विठूमाऊली होती.. इतक्या सगळ्यांचे दर्शन झाले चला आता मुख दर्शन घेऊया व हवा पालट म्हणून मस्त फिरून येऊया. देव बघणाऱ्यांच्या नजरेत असतो.. काम करणाऱ्यांना साथ देतो  जय हरी विठ्ठल “

   काकूंच्या या बोलण्याकडे सगळे आश्चर्याने बघत होते.. काका म्हणाले “इतकी वर्ष मी हे सांगितलं तर तुला पटलं नाही.. आत काय माऊलीने साक्षात्कार देऊन सांगितलं की काय तुला? “

“हो.. माऊलीचा साक्षात्कार झाला.. की मी अवती भवती आहे… मला मंदिरात शोधू नको..जय हरी विठ्ठल  “…. काकू म्हणाल्या

विठू माउलीचे मुख दर्शन घेऊन सगळे पुढील प्रवासाला लागले… पण यावेळी मनात भावना देवदर्शनाची नाही तर फक्त हवापालट म्हणून फिरण्याची होती.. अशा प्रवासात कुणी गरजू दिसलें तर त्यांना जेवण तर कुणाला शॉल, ब्लॅंकेट, स्वेटर, असं वाटप केल काकूंच्या हाताने.. कोणत्याही मंदिरात दक्षिणा नाही दिली व पूजेचे सामानही नाही घेतले… त्या गरजूंच्या तृप्त चेहऱ्यात पुन्हा पुन्हा काकूंना विठ्ठल दर्शन घडत होते… आणि ते दान करताना काकू “जय हरी विठ्ठल ” म्हणतं त्यांच्या पाया पडायची….

       आज खऱ्या अर्थाने देवदर्शन झालं त्यांना.. म्हणून म्हणते “देवा तू कुठे आहेस?… मंदिरात की गरजवंतांच्या केविलवाण्या चेहऱ्यात? “

तुम्हाला काय वाटत नक्की सांगा.. या प्रश्नाचं उत्तर..

समाप्त…... ?जयश्री कन्हेरे -सातपुते

      कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी…

        कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी

   हे गाणं बरंच जून आहे.. पण अर्थ पूर्ण आहे.. नक्की ऐका सगळ्यांनी व मग सांगा… “कुठे आहेस देवा तू ? “

  कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत.. कोणत्याही मंदिरावर आक्षेप घायचा नाही…. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असेल तर क्षमस्व ???

ही काल्पनिक कथा नाही सत्य घटना आहे..खरंच विनंती करूनही त्यांना एकटीला आतून दर्शन करू दिल नाही.. या घटनेला आता चार वर्ष पूर्ण झालीत… आणि हो  मी स्वतः देवाला मानते… शेगावला दर वर्षी जाते… पण पूजेच्या सामना ऐवजी गरजूना वास्तूचे वाटप करते.. मनातून देवाला प्रार्थना करते की मला अशीच सदबुद्धी दे व गरजुंना मदत करू शकेल इतकी सक्षम बनव.. ?जयश्री कन्हेरे सातपुते ?

जय हरी विठ्ठल.. 

जय गजानन |श्री गजानन |स्वामी गजानन |नमो नमः.. |

प्रतिक्रिया व्यक्त करा