कुठे नेऊन ठेवलाय देश माझा ?

Written by

” आम आदमी सस्ता झाला , बकरा महाग झाला

अरे जिंदगी मध्ये पोरा , पुरा अंधार झाला ..

कोण जागेल शब्दाला असा कोण आहे दिलवाला

सबको पैसे ने खा डाला ,सबको पैसेने खा डाला … ”

आठवत नाही किती वर्षांपूर्वी नारायण सुर्वे यांच्या या काव्यपंक्ती वाचल्या होत्या . देशातील एकूणच परिस्थिती बघता दुर्दैवाने आजही त्या तितक्याच चपखलपणे लागू पडतात हे सत्य आहे .सामाजिक , राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे . विचार करण्याची क्षमता हळू हळू नष्ट करण्यात येतेय . जे थोपवले जाईल तेच सत्य आहे हे मानणारी पिलावळ मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे . जाब , प्रश्न विचारण्यास मनाई करण्यात येते  . ज्या ठिकाणी देश आज नेऊन सोडण्यात आला आहे ते एकाएकी झालेलं नाहीये  . आजही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जातीय , धर्मीय तेढ निर्माण होत आहे . केवळ संशयावरून यमसदनी पाठवणारी विकृत जमात निर्माण झाली . पानसरे गेले , दाभोलकर गेले , गौरी लंकेश  संपवल्या गेल्या , अहो एवढच काय गांधीजींना इतक्या वर्षानंतरदेखील गोळ्या मारणारी ” गोडसे” वृत्ती पोसली जातीये. आम्ही शांत होऊन गंमत बघत आहोत , हो तशीच जी आम्ही १९८४ मध्ये , १९९२ मध्ये आणि २००२ मध्ये पाहिलीय. प्रश्न माहिती आहेत , उत्तर माहिती आहेत पण आम्ही शांत आहोत . आवाज उठवण्याची हिम्मत अजूनही झालेली नाही . कुणीतरी खूप छान लिहिले आहे

” आज कुणीतरी मस्ती केली म्हणे ,

माणसाने माणुसकी सस्ती केली म्हणे …

सावध व्हा रे गव्हा-ज्वारीच्या दाण्यानो ,

आज बुजगावण्यानेच पाखरांशी दोस्ती केली म्हणे …”

एकूणच राजकारणाबद्दल आमच्या देशात उदासीन वातावरण तयार झाले आहे.  ‘समाजकारण’ हा एके काळी असलेला राजकारणाचा चेहरा आता गुंडागर्दीच्या आधिपत्याखाली आला .  देश नको तिथे पोहोचवण्यामध्ये सत्ताधारी  , प्रशासन जेवढे जबाबदार आहेत त्याहून जास्त जबाबदार जनता आहे हे सत्य आहे .   सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आमची संपूर्ण तरुण पिढी नासवली जातेय. कोवळ्या वयात आमच्या पोरांच्या छात्या सिगारेटच्या धुराने फुगून जात आहेत .”स्वच्छ भारत अभियान  ” च्या पाटीखालीच गुटखा थुकून कोण देशद्रोही , कोण देशभक्त यावर चर्चा रंगतात  . तर दुसरीकडे देशाच्या एखाद्या कोपऱ्यात केवळ बसचे पास काढायला पैसे नाही म्हणून शाळकरी मुलींवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे . यावर आमच्या समस्यांचा डोंगर येऊन थांबत नाही . पर्यावरनाचा ह्रास त्याच शिताफीने चालू राहतो . देशातील एकूणच  पर्यावरणाची  स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत आहे . यापेक्षा मोठे दुर्दैव हे आहे कि   या अश्या समस्या आहेत ज्याकडे कुणाला लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये . मंदिर , जाती-पाती , सैनिक , पाकिस्तान , देशभक्त , देशद्रोही या मुद्द्यांवर जाणूनबुजून ” फोकस ” केला जातो .

लोकशाहीत जेवढे सरकार आणि विरोधक   महत्त्वाचे  आहे त्याहून जास्त सर्वसामान्य जनतेची भूमिका निर्णायक आहे; पण ही भूमिका कुठे तरी कमी पडत आहे. घटनेचा बळी दिला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये .  समाजातील लोकांनी याकडे लक्ष द्यायला हवे. जिथे लोकप्रतिनिधी , सरकार , प्रशासन समाज उद्धाराचा  नवा अध्याय लिहील तिथे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाका आणि जिथे ते  लोकशाहीच्या मुळावर आघात करत असेल तिथे त्याच्या पाठीत धपाटा टाकायला मागेपुढे पाहू नका. जागी झालेली जनता नोकरशहा वर्गाला, लोकप्रतिनिधी वर्गाला बळकटी देणार आहे, पर्यायाने लोकशाहीला बळकटी मिळणार आहे. घटनेचा भंग कुणीही करत असेल तर तिथे आवाज उठवला गेलाच पाहिजे. हा आवाज उठवायचे काम फक्त आणि फक्त तुम्ही, आम्ही, आपण करू शकतो. फक्त गरज आहे ती झोपेतून जागे होण्याची !! देश कुठेही नेऊन ठेवला असला तरी देशाची मुळ अजूनही घट्ट आहेत . परंतु तरीही चिंता कमी होत नाही . स्वातंत्र्याच्या इतक्या ” गौरवशाली ” वर्षानंतरदेखील  या देशात दोन भारत राहतात . एक तो भारत जो स्वतःभोवतीचे साखळदंड  तोडून प्रगतीकडे गरुडझेप घेण्यास सज्ज झाला आहे आणि एक तो भारत जो स्वतःच एक साखळदंड होऊन बसला आहे .एक भारत म्हणतोय कि मला स्वतःला सिद्ध करण्याची  एक संधी द्या तर दुसरा भारत म्हणतो स्वतःला आधी स्वतःला सिद्ध करा  मग संधीची मागणी करा . एक भारत आमच्या हृदयाच्या कोपऱ्यात बसतोय तर दुसरा भारत आमच्या मेंदूला ”  शॉक ” देण्याचं काम करतोय . एक भारत ‘ करून ‘ दाखवतोय तर एक भारत अजूनही ‘ विचार ‘ करतोय . पण असे असूनही आशावादाचे बाळकडू आम्ही  स्वतःला पाजायला हवंय !! परिवर्तनाचा सूर्य उगवण्याच्या मार्गावर आहे . प्रत्येक क्षणाला अनेक लोकांमुळे एका  भारतातील लोक  दुसऱ्या भारतात गौरवाने प्रवेश करत आहे .असे म्हणतात कि इतिहास हवेची अशी लहर आहे जी वेळ सांगून आपला मार्ग बदलत नाही . हीच ती वेळ आहे जेव्हा इतिहास आपला मार्ग बदलत आहे .खाली पडून पुन्हा उभं राहून आम्ही एका नव्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत हेही सत्य आहे ..

Article Tags:
· ·
Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा