कुणीतरी ऎकणारं हवं असतं

Written by

किती भयाण असतो ना एकटेपणा?  …आणि त्याहून भयाण असतं सगळे असूनही आपल्याला कोणी समजून घेणारं नसतं तेंव्हा….रडावसं वाटतं, कुणाच्या तरी कुशीत शिरून सारं काही ओकावसं वाटतं आणि मन हलकं करू वाटतं.पण नेमकं त्याचवेळी आपल्यासाठी कोणालाही वेळ नसतो. सगळे बिझी असतात. खरंतर ह्या सगळ्यात त्यांचं काहीच चुकलेलं नसतं, इतके दिवस अापण जसं जगत असतो तसंच तेही जगत असतात पण आता अचानक आलेल्या आपल्या ह्या एकटेपणामुळे आपण सगळ्यांना एकाच तराजूत मोजतो आणि सगळेच बिझी झाले आहेत, आता ‘आपलं कोणीच नाही’ असा बिनधोक शिक्का त्यांच्यावर मारतो.

कधी असा विचार केलाय का हो…. की, अशीच वेळ आपल्यावरच नाही तर प्रत्येकावर येत असते तेंव्हा दुस-यांच्या दु:खात सहभागी होण्याच्या वेळेत आपणही असच बिझी असतो. वेळ प्रत्येकावर येते आणि हीच ती वेळ असते जेंव्हा समोरच्यालाही आपल्यासारखंच किंबहुना आपल्याहुनही अधीक बेचैन झालेलं असतं. प्रत्येक वेळी “मी आहे तुझ्यासोबत ” ह्या वाक्याची किंमत आपल्याला समजत नाही पण जेंव्हा समजते तेंव्हा अचानक लक्षात येतं की “मी आहे तुझ्यासोबत” ही वाक्य कुठेतरी हरवलेली असतात आणि त्याला जबाबदारही आपणच असतो. आपणही कधीतरी कुणाला तरी अशीच कमीटमेंट केलेली असते पण खरच आपल्याकडून ती निभावली गेली का ? ह्या सारखे अनेक प्रश्न आपल्या मनाला घेरतात जेंव्हा आपण एकटे असतो…. आणि आपलं ऎकणारं जवळपास कोणीही नसतं.

किती असहाय असतो ना आपण त्यावेळी …..आपलं मन भरलेलं असतं पण ते भरलेलं मन ज्याच्या जवळ मोकळं करता येईल अशी एकही व्यक्ती न भेटणं हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल ना …..अशा स्थीतीतच अगदी सगळे समोर असूनही आपण एकटे पडलेले असतो. कारण कानाने ऎकणारे तर सगळे असतात पण आपल्या मनाला समजणारं, आपल्या मनाची, ह्रदयाची हाक लोकांच्या त्या गर्दीतही मनापासून ऎकणारं असं कोणीच नसतं.

मग अखेर आपल्याला समजून चुकतं की, आपण नक्की काय कमावलं आजपर्यंत ….अन् नक्की काय गमावलं. आपली वाटणारी आपली माणसं आणि सगळं जग एक आभासी वाटू लागतं आणि मग परिस्थीतीनुसार त्याच आभासी दुनियेचा आपणही एक भाग होऊन जातो नाही का?  ह्या आभासी दुनियेत आपणही हरवतो आपल्याच दु:खात ….आपलं कोणी काहिही ऎकणारं नसतं म्हणूनच,

लेखक वपु अगदी आपल्या मनातलं म्हणतात,

सगळ्यांना काही ना काही सांगायचं असतं …..सगळ्यांना कुणीतरी त्यांचं ऎकणारं हवं असतं.

एखादा शाररीक आजार झाला तर तो आज ना उद्या बरा होणारच हे आपल्याला पक्कं माहीत असतं. पण ही मनाची व्यथा कमी करायला आपलं हक्काचं एखादं कोणीतरी असावच लागतं नाही का?…..

हा मनाचा खेळ आपल्या सगळ्यांसोबतच घडत असतो बरोबर ना?

©Sunita Choudhari. 

(मित्र-मैत्रीणींनो मनाच्या ह्या व्यथेचा लेख तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून सांगाल … मग आता वाट कशाची बघताय? …… होऊन जाऊ द्या लाईक, कमेंट अगदी तुमच्या भावना आणि हो मला फाॅलोही करा)

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा