कुरियर

Written by

स्थळ-इस्लामपूर

दिनांक-१२-०२-२०१७

 

“हा मी इस्लामपूर कुरियर डेपो मधून बोलतोय,तुम्ही मिस.साठे ना ? हा तुमचं कुरियर आलंय तेवढं घेऊन जा….

हो स्टॅन्डजवळ आहे ऑफिस,हो आहे मी, या दिवसभरात”

 

 

“हो निघतीये मी,येता येता कुरियरपण घेऊन येईन,

हो मगाशी आलेला फोन मला कुरियरवल्याचा आणि तू जेवून घे हा,एकदा काम सुरु झालं कि भान राहत नाही तुला.

असूदेत,काळजी आहे म्हणून सांगतीये दहा वेळा.

हो मोपेड घेऊन जातीये..

आता मला कसं कळणार काय आहे कुरियर ते ? बघितल्यावर करते कि फोन.

बरं ठेवतीये मी आता आवरायचंय मलापण ….तू जेवून…ठेवलापण यान फोन”

 

“इथं सही करा,हो मुंबईचा पत्ता दिसतोय”

“मी तर नव्हतं मागवलं काही”

“काल दुपारी आलंय खरंतरं पण व्यापच इतका आहे कि तुम्हाला contact करायला उशीर झाला”

“ठीके”

“मॅडम मी ऑटो ची सोय करू का ?”

“हो प्लिज,हेवी दिसतंय हे खूपच”

 

 

“हां,तिथे त्या कपाटाशेजारी ठेवलं तरी चालेल ,एक मिनिट हा मी पाणी घेऊन येते”

 

 

“अरे ओव्हन आलंय !”

“माहितीये मला”

” म्हणजे ?”

“मीच बुक केलेलं…हवं होतं ना तुला ?”

“सांगायचं नाही होय मग ?”

“अगं आई सर्प्राईस सांगतात का ?”

“अरे पण मी घरात असतेच असं नाही,बाहेर गेले असले…”

“बरं आलंय ना आता घरी…आता कर तुझे सगळे पदार्थ.मी येतोच पुढच्या आठवड्यात खायला”

 

 

 

“हॅलो,आई काय ग..अडीच वाजलेत..आत्ता का फोन केलायस ? बरी आहेस ना ?”

“मी बरी आहे पण ते केक करायला temperature किती ठेवावं लागतं रे ?”

“अगं ए…ऑफिस आहे मला उद्या…आणि आत्ता काय केक करतीयेस तू उजाडल्यासारखं ?”

“अरे घरात सामान होतं सगळं आणि झोपपण नाही येते मग म्हणलं करून बघू…सांग ना तेवढंच राहिलंय बाकी सगळं तयार करून ठेवलंय मी”

 

 

“काय ग आई,झोपूदे ना मला…सकाळी उठायचंय लवकर..”

“ऐक जरा..”

“काय ऐकू आता,अशी दहा दहा मिनिटांनी फोन केल्यावर कसा झोपू मी..हॅलो…हॅलो आई…चिडली वाटत..हि आई पण ना”

 

 

“सुबोध घरात आहे कुणीतरी…”

“काय ? दारं बंद केलेलीस ना सगळी ? कितीवेळा सांगितलंय कि..”

“आज राहतिये का मी एकटी ? सगळं व्यवस्थित बंद केलेलं..तू म्हणालास म्ह्णून ओव्हन ठेवून झोपायला आले.कसलातरी आवाज येतोय ”

“कसला आवाज ? शेजारी काकूंना फोन लाव,बोलवून घे कुणालातरी,नाहीतर मीच सोन्याला सांगतो तिथं यायला”

“नको कुणाला उठवत बसू…मला कळूदे नक्की काय होतंय ते…”

“काय होतंय ? कसला आवाज येतोय ? लाईट लावून बघ ना सगळीकडं”

“श्वास घेतंय कुणीतरी..खूप जोरात..मला काहीच कळत नाहीये…स्वयंपाकघरातून येतोय आवाज बहुतेक…”

“काय ?? काहीतरी confusion होतंय तुझं…तू जाऊन बघ आत…काही काय सांगतीयेस ?”

“वेड लागलंय का मला काहीही सांगायला ? आलीये स्वयंपाकघरात इथंच येतोय आवाज…”

“लाईट लावून बघ..’

“लाईट सुरुये,कुणी नाहीये इथं..”

“हा मग,काय कारण आहे घाबरायचं ?”

“अरे मूर्खां इथं कुणी नाहीये म्हणूनच भीती वाटतीये…आवाज येतोय कुठून ?”

“सुबोध…”

“हा बोल…हॅलो…आई…आई बोल ना…आई…हॅलो…”

“अरे भीती वाटतीये मला खूप…तो आवाज ओव्हन मधून येतोय… ”

“ओव्हन…ओव्हन मधून ? अरे काय करतीयेस तू ? सोन्याचापण फोन नाही लागते..तू एक काम कर बाहेर जा घरातून…शेजारी काकूंना उठाव…तिथं…”

“हॅलो…हॅलो…आई…आई…ओरडू नको..काय झालं सांग मला…हॅलो आई..अगं रडतीयेस कशाला…काय झालंय …हॅलो आई बोल कि…तू बाहेर आलीयेस का…”

“सुबो…त्या..त्या…ओव्हन मध्ये मुंडक आहे माणसाचं…सुबो….चक्क..चक्कर येतीये…हाल..हॅलो..सुबो..सुबोध…”

“आई तू बाहेर जा तिथून..मी सोन्याला उठवलंय तो येतोय तिकडं…तू तिथं नको थांबू…हॅलो..हॅलो आई ऐकतियेस का ? हॅलो…सोन्या येतोय…बेल वाजतीये बघ..सोन्या असेल दारं उघड…आई ऐकतियेस का ?”

 

“हॅलो सुभ्या…”

“हॅलो सोन्या…आईकडं दे…. बरी आहे ना ती ? काय म्हणतीये बघ ती..”

“हॅलो सुभ्या….अरे काकू…काकू गेल्यात…”

“निघतोय ..निघतोय मी”

——————————————————————————————————————

स्थळ-सातारा

दिनांक-१६-०२-२०१७

 

“हॅलो अगं बाळा,तू काही मागवलेलंस का ?”

“हो, का ग ? आलं पण इतक्यात घरी ?”

“आत्ता तो कुरियरवाला घेऊन आलाय..तुमच्या नावे आहे म्हणतोय कुरियर”

“हो ठेवून घे,मीच मागवलंय”

“शहाणीचेस…काय आहे ?”

“मी का सांगू ?..Its Surprise…!!”

 

 

Article Tags:
Article Categories:
भयपट

प्रतिक्रिया व्यक्त करा