कोकण खाद्यश्रीमंती

Written by

कोकण खाद्यश्रीमंती

कोकणात गणेशोत्सव फार उत्साहाने,भक्तिभावाने साजरा करतात.उत्साहाने म्हणजे मोठ्यातमोठी मुर्ती,भरपूर फटाके वाजवणे असा नव्हे .

श्रावणापासूनच सर्वांना बाप्पाचे वेध लागू लागतात.कोकणची धरती हिरवा शालू ल्यालेली असते.त्यावर जांभळा,लाल तेरडा,शेंदरी झेंडू,विविध रंगांच्या गवतफुलांची छान नक्षी उमटलेली असते.निळशार आकाश वाकून धरित्रीचं हे आरसपानी सौंदर्य कौतुकाने न्याहाळत असतं.हिरव्यागार डोंगरकडांतून निर्झर खळाळत असतात.शेतांमधून पाटाचं नितळ पाणी वहात असतं.पांढरे बगळे या हिरवळीवर डौलाने फिरत असतात.गुरे चरत असतात.घराघरांतून भक्तिगीते लावली जातात..
भक्तिभावाने भारलेल्या अशा या वातावरणात बाप्पाचे आगमन होते.त्याच्या स्वागतासाठी पोटापाण्यासाठी मुंबई पुण्याला रहाणारे चाकरमानी गाडीला कितीही गर्दी असली तरी मधल्या पेसेजमध्ये,टोयलेटच्या समोर उभं राहून का होईना आवर्जून येतात.

बाप्पासमोर भजनीमंडळे भजन करतात तेंव्हा त्यांना देण्यासाठी तसंच पाहुणेमंडळी जी बाप्पाच्या दर्शनाला येतात त्याना देण्यासाठी नेवर्या(करंज्या) व लाडू केले जातात.

ह्या नेवर्या करण्यासाठी गावठी चणे आणतात.ते साफ करतात व मंद आचेवर भाजून घेतात.एका पातळ दुपदरी फडक्यावर जाते ठेवून हे भाजलेले चणे भरडून घेतात. म्हणजे त्याच्या डाळी तयार करतात.आत्ता या डाळी सुपात घेऊन पाखडतात.साल निघून गेली की अशी नितळ डाळ परत जात्यावर दळतात.(जातं नसलं तर आपण हे घरघंटीवर करु शकतो पण सालं काढता येत नाही.)
वेलची,जायफळ,सुंठ जरा गरम करुन पाट्यावर त्याची पूड करुन घेतात.ही पूड चाळून जेवढ्या करंज्या करायच्या आहेत त्या अंदाजानै पीठ घेऊन त्यात थोडी मिक्स करतात.बाकीची लाडवांसाठी ठेवून देतात.पीठात चिरलेला गुळ घालून पाट्यावर जरा वाटून घेतात म्हणजे गुळपीठ एकजीव होते.पुर्वी उखळात घालून गुळपीठ एक करीत. खसखस,तीळ, चारोळी,किसलेले सुके खोबरे मंद आचेवर जरा भाजून घेतात ते गुळपीठात मिसळतात.साधारण पाव किलो पीठाला त्याच्या तीन चतुर्थांश एवढे गुळ वापरतात.

पारी करण्यासाठी मैदा दोन तीनदा चाळून घेतात.चाळल्याने मैदा हलका होतो. त्यात अर्धी वाटी गरम केलेले तुप घालून गरम असतानाच चांगले दोन्ही तळहाताने मैद्यात मिसळतात.मग साधे पाणी घेऊन पीठ मळतात.व पाट्यावर चेचतात.नंतर अर्धा तासभर ओल्या पिळलेल्या कापडाने झाकून ठेवतात.
करंज्या करताना सारण भरपूर भरुन मग चिरणीने काततात व तळून घेतात.या नेवर्या साच्यांतल्या करंज्यांपेक्षा आकारमानाने मोठ्या असतात व फारच चविष्ठ लागतात.भरपूर प्रमाणात नेवर्या करत असल्याने घरातली बायका,पुरुष,लहान मुलं सगळी नेवर्या करायला बसतात.

चण्याच्या पीठाचे लाडू तर जाम भारी लागतात.चण्याचं पीठ व गुळ पाट्यावर वाटून एकजीव करतात.त्यात भाजलेले शेंगादाणे(साल काढून) घालतात.भाजलेल्या सुक्या खोबर्याचा कीस,वेलची,सुंठ व जायफळ यांची पावडर भाजलेल्या काजुगरांचे बारीक तुकडे घालतात.लाडू वळण्यास आवश्यक एवढे तुप यात मिक्स करतात .हे सर्व चांगले एकजीव करुन लाडू वळतात.पुर्वी हे गुळपीठ व्हायनात करत.त्यात तुप घालायची गरज नसै.एवढे ते एकजीव होई.

मोदकांचा मान तर पहिला असतो.गावचे तांदूळ धुवून सावलीला वाळवतात.जात्यावर याचे पीठ करतात.मोदक करतेवेळी चांगला ताजा माडावरचा ताजा नारळ किसतात.भरपूर मोदक करावयाचे लागत असल्याने दोन तीन तरी नारळांचा चव लागतो.त्यात किसलेला गुळ घालून ,टोपात हे एकत्र करतात व जरा गरम करतात जेणेकरून गुळ वितळून गुळ खोबरे मिक्स होते.यात वेलची,जायफळची पुड घालतात.
गेसवर पाणी तापत ठेवून त्यात थोडं तुप घालतात.मग दळलेलं तांदळाचं पीठ घालून भागवतात(मिक्स करतात).व झाकण ठेवून पीठाला वाफ येऊ देतात.मग गरमगरमचं जरा पाण्याचा हात लावून मळतात. मोदक बोटांनी पाकळ्या करुन वळतात.टोपात पाणी गरम करत ठेवतात.हे मोदक हळदीची पाने चाळणीत घालून त्यांवर ठेवतात व चाळण त्या गरम टोपावर ठेवतात.सात आठ मिनटात मोदक तयार होतात.मोदकांप्रमाणेच ओल्या नारळाच्या करंज्या बनवतात.

पातोळ्या करण्यासाठी हळदीची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतात व त्यावर वाफवलेले तांदळाचे पीठ पातळ पसरवून त्यावर एका बाजूला गुळखोबर्याचे सारण भरतात व दुसरी बाजू त्यावर ठेवून पानाच्या कडा दाबून घेतात.मग ह्या पातोळ्या मोदकाप्रमाणेच वाफवायला ठेवतात.

बिरडी फारच खमंग लागतात.यासाठी गावचे सुरय तांदूळ(आपण आंबेमोहर घेऊ शकतो)अर्धा किलो धुवून सावलीत वाळवतात व मंद आचेवर भाजून घेतात.त्यात चार चमचे जिरं व चार चमचे धणे ,चार लवंगा,चार मिरे भाजून घालतात व जात्यावर किंवा मिक्सरला बारीक दळतात.पाण्यात गुळ विरघळवतात .त्यात सुंठ,वेलची,जायफळपूड स्वादानुसार घालतात.यात तांदुळाचं खास भाजून तयार केलेलं पीठ घालून चांगलं मळतात व तासभर झाकून ठेवून देतात.मग पेढ्याएवढा पीठाचा गोळा हातात घेऊन त्याची गोल नळी तयार करतात व तिची दोन्ही टोकं बोटाने दाबतात.चकलीसारखी ही बिरडी मध्यम आचेवर तळतात गेस मोठा ठेवला तर बाहेरून करपतात व आत मऊ रहातात.

——-गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा