#कोरडी नाती#

Written by

#लघुकथा#
#कोरडी नाती#
✍️©स्नेहा किरण नवाळे (पाटील)
पियुष आणि रोहन आज योगायोगाने कॅन्टीनमध्ये दुपारच्या जेवणासाठी भेटले. चार वर्षांपूर्वी दोघांनी जवळपास एकाच वेळी ऑफिस जॉईन केले होते. पियुषचा दूरचा भाऊ अभय, रोहनच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहत असे. पियुषचे अभयच्या घरी लहानपणापासून जाणे येणे असायचे. शाळा- कॉलेजच्या सुट्टीमध्ये तर पियुष अभयच्या घरीच येऊन राहत असे. त्यामुळे रोहन आणि पियुष एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते.
पियुष आणि अभय एकाच वयाचे होते. कॉलेज संपल्यावर दोघंही आपापल्या क्षेत्रात काम करू लागले. तरीही त्यांच्यातली मैत्री कायम होती. कालांतराने दोघही संसारात गुंतले. दोघांची मैत्री पाहून त्यांच्या पत्नीही मैत्रिणी झाल्या. गेटटुगेदर, पिकनिक चालूच असायचं. एकमेकांच्या सुख दुःखात सगळे हजर असायचे. नात्याने जरी ते दूरचे भाऊ असले तरी मनाने एक होते. अचानक एक दिवस पियुषला मोठा ब्रेक मिळाला आणि तो कुटुंबीयांसह दोन वर्षांनी परदेशवारी करून मायदेशी परतला. आता त्याचे दिवस पालटले होते, राहणीमान सुधारले. कुठेतरी अनामिक गर्व डोके काढत होता. थोडक्यात काय तर सामाजिक प्रतिमा उजळली होती. या सर्वाची परिणीती म्हणून की काय, पियुष अभयला टाळू लागला होता.
रोहन ही सगळी पार्श्‍वभूमी आणि आताची परिस्थिती जाणून होता. त्यामुळे न राहवून “पियुष अरे काय झालं हल्ली बरेच दिवसांत तुझं अभय येणंही झालं नाही?” असं जेवण झाल्यावर त्याने पियुषला विचारले. “अरे खूप बिझी आहे रे. तुला तर माहीत असेलच”. ऑफिसमध्ये काय परिस्थिती आहे. मध्यंतरी एक दोन वेळा अभयचा फोन आला होता, अरे पण मी नेमका मीटिंगमध्ये होतो, आणि मग फोन करायचं राहून गेलं.” इति पियुष. “अभयच्या मुलांच्या वाढदिवसालाही दिसला नाहीस, जंगी कार्यक्रम केला होता., रोहनने परत विचारले. “अरे हो, नेमकं त्याचवेळी आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये एका जोडप्याच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही सगळेच रिसॉर्टला गेलो होतो.” रोहनच्या प्रश्नावर पियुष उत्तरला.
तेव्हढ्यात रोहनला फोन आला, “बरं जेवढ्या लवकर जमेल तसं निघतो” असं म्हणून त्याने फोन ठेवला. “रोहन, is everything okay?” रोहनच्या चेहर्‍यावरचे बदललेले हावभाव पाहून पियुषने विचारले. “पियुष, नानांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.” रोहनने पियुषला सांगितले. ‘मागील आठवड्यापासून नाना म्हणजे अभयचे बाबा इस्पितळात दाखल आहेत. अभय आणि वहिनी आलटून पालटून त्यांच्यासोबत असतात. मुलांना तर वहिनींच्या माहेरी ठेवले आहे. रोज दुपारी शिफ्टला निघताना माझी पत्नी इस्पितळात जेवणाचा डबा देऊन जाते. इतर नातेवाईकही येऊन जाऊन असतात. जमेल तस मीही जातो ‘. घटनेशी पुर्णपणे अनभिज्ञ असलेल्या पियुषला रोहनने माहिती दिली. क्षणार्धात पियुषचा चेहरा निर्विकार झाला. “आता माझ्या पत्नीचा फोन होता की प्रकृती खालावल्याने नानांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. इथून लवकर निघायचं बघतो आता.” जेवणाचा डबा बॅगमध्ये भरत रोहन म्हणाला आणि निघू लागला. “रोहन” पाठमोर्‍या रोहनला पियुषने हाक दिली. “तसं काही गंभीर असेल तरचं मला कळवं” रोहनच्या नजरेस नजर न देता पियुष उत्तरला. मान डोलावून, मनावर शक्य तेवढ नियंत्रण ठेऊन रोहन तिथून निघाला. परवानगी घेऊन रोहन इस्पितळात जाण्यासाठी ऑफिसमधून लवकर निघाला. रिक्षेत बसल्यावर तो, ‘तसं काही गंभीर असेल तरचं मला कळवं’ या पियुषच्या वाक्यातल्या ‘तरचं’ या शब्दाचा विचार करू लागला. म्हणजे काही झालंच तर तो अभयला भेटायला येणार होता. नानांची तब्येत कशी आहे, किंवा अभयला आपल्या मदतीची गरज असेल हे त्याच्या गावीही नव्हतं. फक्त आणि फक्त सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी तो येणार होता. खरंच पैसा, प्रसिद्धी माणसाला इतकं व्यावहारिक बनवते की, प्रेम, नाती जिव्हाळा याला काहीच अर्थ नसतो. उरतो तो निव्वळ औपचारिक व्यवहार; तोही इतरांना दाखवण्यासाठी. म्हणजे, पैसा है तो मिलेगा मान, जिनके पास पैसा नही वह हो जाते है अंजान.
नात्यातलं हे कोरडेपण याची देही याचि डोळा पाहून आज रोहनचे डोळे मात्र पाणावले होते.
✍️©स्नेहा किरण नवाळे (पाटील)
तळटीप: संपूर्ण कथा काल्पनिक आहे. कथेचा कोणाच्या जीवनातील घडामोडींशी संबंध नाही. तरीही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
कथा आवडल्यास नावासहित शेअर अथवा कॉपी पेस्ट करावी ही विनंती.

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा