कोरडी नाती

Written by

काल 1 पोस्ट फिरत होती फेसबुक वर” we get together” आणि त्यासोबत मित्रांचे,परिवाराचे फोटो. ते बघून एक लक्षात आलं की फेसबुक व्हाट्सएप मुळे मित्र परिवार, आपले घरचे जवळ आल्यासारखं वाटत. यामुळे आपले शाळेपासूनचे मित्र,मैत्रिणी पण आणि कदाचित कधी न भेटलेले पण माहीत असलेले असे लोकही आपल्या फेसबुक च्या लिस्ट मध्ये आहेत. एकमेकांपासून लांब असलो तरी फोटो, विडिओ मार्फत कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हेही कळत.
या फेसबुक व्हाट्सएपने जग जवळ आणलं खर पण खरच डोळ्यांना दिसण्यासाठी ते जवळ आहे की, मनापासून जवळ आहे याचा विचार करायला लावणार मनही आज यांत्रिकच झालंय.
थोडं मागे म्हणजे हे सोशल मीडियाच्या अगोदरच्या जगात डोकावून पाहिलं तर लक्षात येत तेव्हा रोज नाही पण महिन्यातून एकतरी फोन आपल्या जवळच्या व्यक्तींना व्हायचा. आवाजातूनच ख्याली खुशाली कळायची. मग भेटायच नियोजन व्हायचं. छान मनसोक्त गप्पा व्हायच्या.
नंतर या सगळ्याची जागा या ऑनलाईन दुनियेन घेतली. आता रोज एकमेकांना बघतो पण बोलत नाही, ख्याली खुशाली आता प्रोफाइल फोटो आणि स्टेटस बघून कळते. भेट होते फक्त वाढदिवस किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छाचे फोटो पाठवून (कॉल नाहीच). गप्पा तर होतच नाहीत. सध्या एखादया समारंभात सुद्धा गप्पा मारायला वेळ नसतो, तिथेही ऑनलाईन असायचं, फोटो काढायचे आणि ते अपडेट करायचे यातच व्यस्त असतात सगळे. आता आयुष्य आधी फोटोमय आणि मग ते ऑनलाईन अपडेट केले की आनंदमय होत. सध्या लग्न समारंभाचे आमंत्रणही ऑनलाईन,भावाला राखी पण ऑनलाईन आणि कोणी आजारी असेल तर सदिच्छा पण फुले पाठवून ऑनलाईनच. इतकंच काय कुणी व्यक्ती गेली तरी सांत्वन पण ऑनलाईनच (RIP लिहून). इथे प्रेमही ऑनलाईन होत आणि भांडण पण ऑनलाईन,आपला फोटो पाहून प्रतिक्रिया दिली नाही म्हणून सुद्धा अबोला होतो आणि विनाकारणच नात्यात दुरावा येतो. राग रुसवा मात्र ऑनलाईन निघत नाही तर इथे थेट नाती ब्लॉकच होतात.
या सोशल मीडिया मुळे जग जवळ आलं, माणूस सतत सोशल राहू लागला पण एकटाच झाला. ऑनलाईन मित्र अगणितही असतील पण गरज भासेल तेव्हा एक तरी सोबत असतो का याचा विचार करायला हवा. ऑनलाईन राहण्याच्या धडपडीत नात्यातील ओलावा हळूहळू कमी होत चाललाय, नाती मनाने कोरडी होत चालीयेत. सोशल असूनही मनाने एकटाच असतो माणूस.
कधीतरी ऑफलाईन राहून आपल्या प्रिय माणसांना मनापासून भेटुया, एकमेकांचे हितगुज समोर बसून शेअर करूया,सदिच्छा व्यक्त करूया आणि पुन्हा नक्की भेटू या अटीवर या क्षणाच्या गोड आठवणी मनात जपुन ठेवूया(फोटोच्या स्वरूपात).
बघा ऑनलाईन जग खरा आनंद देऊन जात की ऑफलाईन जग सुखद क्षण देऊन जात.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा