“क्षण एक सांगाती…. !”

Written by

“क्षण एक सांगाती…. !”

राज आणि रश्मी यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस. नकळत अल्बम पहाताना रश्मीची नजर या फोटोवर खिळली आणि सारे द्रुष्य तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. आज बरोबर एक वर्षांपूर्वीची गोष्ट…

राज नुकताच काही महिन्यांपूर्वी एअर इंडिया मध्ये पायलट म्हणून रुजू झाला होता आणि रश्मीने नुकतेच एमएससी कंप्लीट केले होते. राज आणि रश्मी खूप आनंदात होते, आज ते विवाहबंधनात अडकणार होते आणि अचानक इमर्जन्सी कॉल आल्याने राजला जावं लागलं परंतु मुहूर्ताची वेळ संध्याकाळची असल्याने तोपर्यंत पोहोचतो असे वचन देऊन राज फ्लाईट साठी रवाना झाला.

मुहूर्ताची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तस तसे रश्मीला टेन्शन येऊ लागले. राजचा फोनही लागत नव्हता… नको नको ते विचार मनात येऊ लागले. सर्वांनाच टेन्शन आले होते. इतक्यात राजचाच फोन आला की दहा मिनिटात पोहोचतो हे ऐकून रश्मी धावतच गेट जवळ आली.

दुल्ह्याच्या वेषातील राजला गाडीतून उतरताना पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण आता पाचच मिनिटं उरले होते मुहूर्ताला. दोघेही धावतच मंडपाकडे निघाले, दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता. आज एका नव्या आयुष्याची सुरुवात ते करणार होते ज्या दिवसाची गेले कित्येक दिवस ते दोघेही डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते.

हा क्षण त्यांच्यासाठी अनमोल होता आणि म्हणूनच राज आणि रश्मी मोठ्या अधीरतेने धावत होते. हाच तो क्षण फोटोग्राफरनेही त्याच्या कँमेऱ्यात टिपला होता. हा फोटो पाहून रश्मीचे डोळे भरून वाहू लागले. तिची आई हे सारं दुरून पहात होती, तिचेही डोळे भरून आले पण यावर तिच्याकडेही उत्तर नव्हते. सारा नियतीचा खेळ होता.

राज आणि रश्मीचा संसार आनंदाने सुरू होता, रश्मीला तर जणू आकाशच ठेंगणे झाले होते. राजचेही खूप प्रेम होते रश्मीवर, लवकरच त्यांच्या संसारवेलीवर एक फुल उमलणार असल्यची चाहूल त्यांना लागली आणि राजला रश्मीला कुठे ठेऊ अन कुठे नको असे झाले होते. ते दोघेही आपल्या बाळाची चित्रे रंगवू लागले.

सातव्या महिन्यात रश्मीचे डोहाळे जेवणही आनंदाने पार पडले. राज आणि रश्मीचे आई वडील आजी आजोबा होणार म्हणून अगदी हरखून गेले होते. सर्वजण येणाऱ्या बाळाच्या स्वागताच्या तयारीत गुंतले होते. आता रश्मीचे दिवस भरत आले होते, आठवा संपून नववा लागला होता आणि अचानक टीव्ही वर एक बातमी आली… “प्लेन क्रशमध्ये वैमानिकाचा मृत्यू!” रश्मीच्या पायाखालची जमीनच सरकली, समोर मिट्ट काळोख….

तिने डोळे उघडले त्यावेळी ती हॉस्पिटल मध्ये होती. तिच्या बाजूला एक गोंडस बाळ होतं… हो छोटासा राज ! पण त्याला पहायला सोबत राज नव्हता. रश्मीचे डोळे भरून वाहू लागले. आज या घटनेलाही दोन महिने उलटले होते.

रश्मीने राजच्या फोटोवरून हात फिरवला आणि ती छोट्या राज कडे वळली. आता त्याला वाढवणं हेच तिचं धेय्य बनलं होतं आणि हा अल्बम तिच्यासाठी “क्षण एक सांगाती” झाला होता.

© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर…✍

Article Categories:
प्रेम

Comments are closed.