क्षत्रियकुलावतंस

Written by

मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त पुणे शहरात होतो. सहसा पाच किमीच्या आत चे अंतर असेल तर मी मुद्दाम चालत फिरणे पसंत करतो. जेणेकरून त्यामुळे आसपासचा परिसर अनुभवणे व माहीत करून घेणे सोपं जाते. शिवाय खिशालाही कात्री बसत नाही. असेच पुण्याच्या पिंपरी परिसरातील एका रस्त्यावरून मी फिरत होतो.
आकाशातून रिमझिम बरसणारा पाउस. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द हिरवाई ने नटलेला निसर्ग. रात्रभर बरसलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी असे काहीसे मधुर आणि अदभुतरम्य वातावरण होते.
मी आपल्या धुंदीत वातावरणाचा आनंद लुटत रस्त्याच्या एका बाजूने चालत होतो. माझ्या पासून पुढे काही अंतरावर एक जोडपं एकमेकांच्या हातात हात देऊन चालत होते. बहुतेक तरी नविन लग्न झालेले व बोट क्लबकडे थोडासा निवांत वेळ व्यतीत करण्याच्या उद्देशाने ते जात असावेत.(खादीम सय्यद ©)
ते दोघेही निसर्गाचा आनंद घेत एकमेकांना बोलत बोलत चालत होते. तितक्यात एक चारचाकी माझ्या मागून हाॅर्न वाजवत आली. मी रस्त्याच्या बाजूनेच चालत होतो. तरी चारचाकी हॉर्न जोरजोरात वाजवत मला मागे टाकत पुढे सरसावली. आता पर्यंत नियंत्रणात चालत असलेल्या चारचाकीने अचानक वेग पकडला आणि रस्त्यावरील पाणी त्यांच्या अंगावर उडवत पुढे निघून गेली. अचानक घडलेल्या प्रकाराने त्या दोघांनाही धक्का बसला. मुलगी पूर्णपणे चिखलाने माखली. हा सर्व प्रकार घडत असताना एका गोष्टीने मात्र माझे लक्ष वेधून घेतले. चारचाकीच्या पाठिमागे काचेवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं… ‘ क्षत्रियकुलावतंस ‘ हा सर्व प्रकार पाहून खुप राग आला. डोक्यात क्षत्रियकुलावतंस या शब्दाचा खरा अर्थ फिरू लागला. एका क्षणासाठी वाटले त्या महाभागाला गाडीमधून खेचतच बाहेर काढावे व त्याला शब्दाचा अर्थ समजावून त्या जोडप्याच्या स्वाधीन करावे. पण चारचाकी वेगाने पुढे निघून गेल्याने मी काहीही करण्यास असमर्थ होतो.
खरंच काय होणार या पिढीच ? जी पिढी शिवाजी महाराजांचे फोटो, क्षत्रियकुलावतंस सारखे शब्द थाटात गाड्यांवर मिरवते. पण महाराजांचे विचार आणि गुण मिरवण्यास कमी पडते. (खादीम सय्यद ©)
महाराजांचे विचार आणि गुण जे या पिढीच्या मनावर कोरले गेले पाहिजे ते का कोरले जात नसावे ?
त्यांच्या वर्तनातुन महाराजांची झलक दिसली पाहिजे, ती का दिसत नसावी…? ( हे मत फक्त काही अपवाद लोकांबद्दल आहे. महाराज ज्याच समर्थन कधीच करणार नाहीत असे वर्तन जी लोक करतात.)
क्षत्रियकुलावतंस या शब्दाचा अर्थ क्षत्रिय कुळास शोभेसे वर्तन करणारा असा होतो. महाराजांचे मावळे म्हणून अशोभनीय वर्तन करत मिरवणार्याचे असे वर्तन कितपत योग्य…?
(खादीम सय्यद ©)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा