खंत….

Written by

खंत..

© सौ योगिता विजय टवलारे ✍️

आज वर्ष झालं लग्नाला..लग्नाचा पहिला वाढदिवस म्हणून निमिशच्या आवडीचे पदार्थ बनऊन त्याला surprise द्यायचं हे मिनुचे आधीच ठरलेले..त्याला फारसे गोड पदार्थ आवडत नाही.. स्पाईसी आणि चमचमीत पदार्थ त्याला फार आवडतात..?

गरमा गरम पोह्यांचे वडे तो आल्यावर तळायचे म्हणून सारण तयार करून ठेवले,मसाला वांगी ,व्हेज बिर्याणी आणि सोबत मुगाचे पापड तळून घेतले..अगदी त्याला आवडतात तसेच जेवण बनले, अगदी तिखट !!!?

त्याला यायला फक्त अर्धा तास उरलेला..किचन पटापट आवरून ती हॉल मध्ये आली.. तिने सजवलेल्या हॉल वर एक नजर टाकली..आणि स्वतः च कौतुक करत अगदी खुष होऊन , गालातल्या गालात हसत ती तयार व्हायला बेड रूम मध्ये शिरली…?

थोड्या वेळातच गाडीचा हॉर्न वाजला तशीच साडी सावरत ती गेट वर आली..मोरपंखी साळी नी त्यावर हलकासा मेकअप , गळ्यात चमचमणारे डायमंड चे नाजूक डोरले आणि कानात त्यावर साजेसे डायमंडचेचं नाजूक खडे..हातात लग्ना आधी निमिष ने दिलेली सुंदर घड्याळ…?

अप्रतिम सौंदर्य लाभलेली मिनू म्हणजेच मीनाक्षी .. लग्नाच्या वाढदिवशी आणखी सुंदर दिसत होती..तिच्या सौंदर्यावर भाळूनच कॉलेजला असतांना निमिष ने लग्नाची मागणी घातली होती..स्वभाव सुध्दा तिच्या इतकाच गोड..?

पण गेट उघडताच समोर टिनाला बघताच तिच्या आनंदावर पाणी पडले..तसे न दाखवता तिने निमिष सोबतच त्याच्या पर्सनल सेक्रेटरीचे हसून स्वागत केले..निमिष तिच्याकडे विस्फारल्या नजरेने बघत राहिला पण तेही अगदी काही सेकंद …?

त्याने भानावर येऊन तिला पुन्हा anniversary wish करून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले..तिने वळून टिनाकडे बघितले.. नेहमीप्रमाणेच आज सुद्धा रडून तिचे डोळे सुजलेले आणि नाक सुद्धा लाल झालेले.. त्यातही ती सुंदर दिसत होती..

परमेश्वर, एखाद्याला इतकं सौंदर्य बहाल करतो की तिच्या किवा त्याच्याकडे पाहताना जगाचा विसर पडतो..त्यातलीच ही एक टिना..एका क्षणात तिच्या मनात सूक्ष्म असुयेने घर केले..पण एका झटक्यात ती सावध झाली..आपण चुकतोय हे तिच्या लागलीच लक्षात आले..

कपाळावरची बट सावरत टिना आत आली.. निमिषने मिनुला पाणी आणायला सांगितले..टिनाला पाणी प्यायलावर बरे वाटले असावे, तिच्या चेहऱ्यावरून ते लक्षात आले..तिने आवंढा गिळला आणि हळूच बोलू लागली..

मला आता सहन होत नाहीये..सासू सासर्यांचा जाचं नी नवऱ्याची संशय घेण्याची वृत्ती !! अगदी जीव नकोसा करून टाकलाय घरच्यांनी..? कमवणारी मी एकटी नी घरात आयात खाणारे पाच तोंड..

नवऱ्याचा अपघात झालाय तेव्हापासून तोही खाटेला खीळलेला म्हणूनच मी ऑफिस जॉईन झाले..हे तुम्हाला माहितीये..आधी तो असा नव्हता पण…हल्ली खूप possesive व्हायला लागलाय..त्याला वाटतं तुमचे नी माझे..शीsss कल्पना सुद्धा करवत नाही..हुंदका देऊन ती परत रडायला लागली..

तिला रडतांना बघून निमिष पुन्हा हळवा झाला..तिचा हात हातात घेऊन म्हणाला, टिना तू त्याला सोडून का देत नाहीस?? का सहन करतेस घरच्यांचा त्रास?? तुलाही जगण्याचा अधिकार आहेच की?? सुशिक्षित आणि इंडिपेंडंट आहेस..मला वाटतं तू दुसरं लग्न करावसं..निमिष एवढं बोलून शांत झाला..

टिना म्हणाली, मी तसा विचारही करू शकत नाही..त्याचे माझ्यावर प्रेम म्हणून मला गमवण्याची भीती वाटते त्याला..निदान सासू सासऱ्यानी तरी समजून घ्यायला हवे होते..जाऊ देत.. नवऱ्याची सोबत नाही तर इतरांकडून तरी का अपेक्षा करावी!?

असो, माझे जाऊ द्यात.. happy wedding anniversary both of you..? चला मी निघते, खूप उशीर झालाय..एका क्षणात ती नजरे आड झाली..निमिष तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाला, किती सहन करते टिना..?

आणि आतापर्यंत शांत वाटणारी मीनाक्षी निमिषला ऊसळून म्हणाली, किती सहन करते टिना?? आणि मी?? माझे काय?? माझ्याबद्दलचे तुझे मत तरी कळू देत?? कॉलेज ला असताना तू माझ्या मागे मागे फिरायचा..माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करायचा …

तेव्हा आपण दोघांनी ठरवले होते की संसार दोघांचा तर , नोकरी करून दोघांनी जबाबदारी पेलायची..मी B .E घरात बसून राहण्यासाठी नव्हते केले निमिष!! पण तुझ्या घरच्यांच्या बोलण्यात येऊन तू मला नोकरी करू दिली नाहीस..

माझ्या इच्छा , आकांक्षा एका क्षणात विरल्या..केवळ तुझ्यासाठी मी तेही स्वीकारले पण जॉइंट फॅमिली मध्ये राहताना माझा किती छळ व्हायचा हे तुलाही माहित आहे..पण तू एका शब्दाने माझ्या बाजूने बोलला नाही..

रोज वाद नकोत म्हणून आपण सहा महिन्यात घर सोडून दोघे वेगळे राहायला लागलो..टिनाला तू आणि तुझ्या घरच्यांनी नेहमी सपोर्ट केला ह्याचा मला राग नाही पण जसे तुम्हाला वाटते टिना वर अन्याय होतो आहे तोच अन्याय तुम्ही लोक माझ्यावर करताय, ते तुम्हाला का दिसत नाही ??

दुसऱ्यांचे दुःख तुम्हाला सहन होत नाहीत पण घरातल्या सूनेला तुम्ही छळता , हे तुमच्या लक्षात येत नाहीये का?? म्हणजे घरातले नियम वेगळे आणि बाहेरचे नियम वेगळे ?? असेच नाही का??

मी तुझ्या फॅमिलीला दोष देत नाही, पण तू माझ्या बाजूने कधी उभा राहिला नाही ह्याचं दुःख जास्त आहे मला..तू माझे कधी ऐकून घेतले नाही ..ह्याची खंत आहे मला..जाऊ देत निमिष!! तू माझा निमिष नाहीच..ज्याच्यावर मी प्रेम केले, तो दुसराच कुणीतरी निमिष होता..पण आता बाsss झाले..

आज लग्नाचा पहिला वाढदिवस..ह्या नंतर हा दिवस परत आपल्या आयुष्यात येणार नाही..इतकं बोलून त्याच्या बोलण्याची वाट न बघता ती त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली …तो मात्र हतबल होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला..

कधी कधी होत असं , आपण कुणावर अन्याय करतो पण ते आपल्या लक्षात येत नाही..अगदी निमिष सारखं..

तुमच्याही आजूबाजूला घडलयं का हो असं ?? कीवा तुमच्याही आयुष्यात आलाय का असा अनुभव?? नक्की शेअर करा , मी वाट पाहील..

कथा आवडल्यास शेअर करा पण माझ्या नवसहित!! नम्र विनंती..

?योगिता विजय ?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत