खरं प्रेम असंच असतं……!!

Written by
कुंतल आणि सर्वेशचा गेले पंधरा वर्ष अगदी हसत खेळत संसार चालू आहे. दोघांचा प्रेमविवाह. अगदी कॉलेजपासूनचं प्रेम. दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला काहीच आडकाठी घेतली नाही, त्यामुळे सगळं कसं निर्विघ्न पार पडलं.
आणि बघता बघता पंधरा वर्षे पण निघून गेली.
दोघंही एकदम जिंदादिल त्यामुळे घर सतत धमाल मस्ती, खेळकर वातावरणाने भरलेलं.
त्यात सासू-सासरे पण स्वभावाने मोकळे असल्याने त्यांच्या बरोबर सगळ्यात सामील. वाढत्या वयातला मुलगाही आहे घरात, त्याचंही मित्रमंडळ आहेच जोडीला.
घर सतत आवाजाने, हास्यांच्या फवाऱ्याने दुमदुमलेलं!!
कोणाला वाटेल यांना कसलं दुःख ते नाहीच!
पण रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे जगी सर्व सुखी असं कोण तरी आहे का?? प्रत्येकाचं काही ना काही चालूच असतं!! कोणाचं दिसतं कोणाचं नाही, एवढंच.
तसंच यांचंही होतं……
सर्वेश एका चांगल्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर होता. बरेचदा त्याला कामानिमित्त कंपनीच्या बाहेरगावी असणाऱ्या ब्रॅंचमधे जावं लागे.
असंच एके दिवशी, काम निपटून घरी परतताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात त्याच्या मेंदूला जोरदार मार लागला. शुद्धीत यायलाच त्याला बरेच दिवस गेले. नंतर शुद्धीवर तर आला पण त्याच्या कंबरेखालच्या भागाची संवेदना पूर्णपणे गेलेली होती. अनेक उपचार केले, बरीच हॉस्पिटलं पालथी घातली, पण कशाने काहीच झाले नाही. कुतलंच आणि सर्वेशचं लग्न होऊन अवघी चार वर्षंच झाली होती तेव्हा. मुलगा फक्त दोन वर्षांचा होता. किती स्वप्नं बाकी होती, पूर्ण करण्यासाठी!!
या अनपेक्षित धक्क्याने कुंतल तर तेव्हा हादरूनच गेली होती. पण तिने मनाला समजावले, आता जे जसं आहे ते एक्सेप्ट करायलाच पाहिजे. खचून काही होणार नाही. आपल्या माणसाचा जीव वाचला तेच समाधान मानायचे.
सुरुवातीला प्रत्येकवेळी एकमेकांकडे बघितल्यावर दोघांचे डोळे भरून यायचे. पण हळूहळू त्यांनी जाणीवपूर्वक दुःख करत बसणं टाळलं. कारण रडत बसून काही होणार नव्हतं, मात्र पॉझिटिव्ह थिंकिंगने चित्र बदलण्याची शक्यता होती.
कुंतलने सासू सासऱ्यांनाही धीर दिला. आणि सगळ्यांनी मिळून, जे आहे त्याला हसत हसत सामोरं जायचं ठरवलं.
सर्वेश पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून होता. ऑफिसला जायच्या अगोदर कुंतल त्याची प्रत्येक गोष्ट करून जायची.
त्याला अंघोळ घालणं, त्याच खाणं-पिणं, त्याच्याकडून  व्यायाम करून घेणं, योगा करून घेणं, आणखीही बरंच काही. त्यांच्या छोट्या मुलाचं मात्र सारं सासूबाई करायच्या.
एवढं असूनही घरातल्या साऱ्यांनीच त्याला सतत ऍक्टिव्ह ठेवलं. त्याला कुठल्या समारंभाला न्या, हवापालट करण्यासाठी चार दिवस कुठे फिरायला न्या, किंवा कधी नाटकाला, चांगल्या पिक्चरला न्या. हे सगळं करायला कष्ट नक्कीच पडत होते, पण कुंतलने ठरवलेलं, तो अगदी एखाद्या नॉर्मल माणसारखीच लाईफ जगणार!
हे सगळं त्यावेळी चालू असताना, न राहून एकदा सर्वेशने तिला विचारलंच, कुंतल, तू इतकी सुंदर!! कोणी तुला एका मुलाची आई आहे असं म्हणणार सुध्दा नाही!! मग तुला माझ्यासारख्या अशा अपंग माणसाबरोबर राहण्याची, फिरण्याची लाज नाही का ग वाटत?? अगदी आताही तुला कोणीही चांगलं मिळेल.
कुंतल म्हणाली, सगळं मनापासून स्वीकारलं की लाज कसली त्यात?? आज तुझ्याबरोबर झालं म्हणून, हेच माझ्या मुलाबरोबर झालं असतं तर मी त्याला टाकून का दिलं असतं??
कोणीही चांगलं मला नक्कीच मिळेल, पण मला तूच हवायस ना, त्याचं काय?? प्रेम काय फक्त रंग रुपावरच केलं जातं का?? आणि ते गेलं की त्याला झिडकारून टाकायचं??
तुझं अस्तित्व माझ्यासाठी सर्व काही आहे. मी तुझ्यासाठी नाही, खरंतर माझ्याचसाठी हे करतीये. तू माझी गरज आहेस, मी माझी कल्पना नाही करू शकत तुझ्याशिवाय!!
कोणत्याही परिस्थितीत जोडीदाराची साथ न सोडणारं खरं प्रेम, नाहीतर काय उपयोग त्या प्रेमाचा??
कुंतल बोलत होती त्यातला एकन् एक शब्द खरा होता.
आज इतकी वर्ष त्यांचा संसार हसत खेळत चालू आहे.
अजूनही सर्वेश आहे तसाच आहे. प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. तसा तो कधीच निराशेने ग्रस्त होऊन कधीच तुटून गेला असता, पण कुंतलच्या प्रेमाने, तिच्या आणि घरच्यांच्या खंबीर आधाराने त्याला, निराशेचा वारा सुद्धा लागून दिला नाहीये.
हे कुटुंब माझ्या मैत्रिणीचा शेजार. माझी मैत्रीण म्हणते, आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत किरकिरत असतो, पण मी कुंतलाला कधीच त्रागा करताना पाहिलं नाहीये, ती नेहमी हसतमुखच असते.
ती नेहमी मला या कुटुंबाबद्दल सांगत असते, कुंतलचं अगदी तोंड भरून कौतुक करत असते. माझ्या मनात विचार येतो;  हे चित्र उलटं असतं, तर काय परिस्थिती असती??
अगदी दोन दिवसांपूर्वीच एक पोस्ट वाचली, बायकोचा चेहरा अपघातामुळे थोडा खराब झाला, तर नवऱ्याला तिला चारचौघात फिरवायची लाज वाटू लागल्याने, त्याने तिला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले!!
काय बोलणार सांगा??
जाऊ दे, आपण चांगल्याचा विचार करू!! तुमच्या माहितीत नवऱ्याने बायकोला अशा वेळी खंबीर आधार दिल्याची उदाहरणं असतील, तर कमेंट मध्ये नक्की सांगा. कोण जाणे  कोणाला यातूनही प्रेरणा मिळेल!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
Article Categories:
सामाजिक

Comments are closed.