खुशी (एक सत्यकथा)

Written by

©सरिता सावंत

भाग 1 (संकटाचा फेरा)

“ताई मला वाचव, मला घरी नाही जायचं परत. मला शिकायचंय  ग. मला घरी नको सोडूस.” खुशी खूप रडून लिनाला सगळं सांगत होती. लिना तिला शांत व्हायला सांगत होती. लिना समुपदेशक होती आणि खूप समाजकार्य करायची त्यामुळे बऱ्याच सामाजिक संस्थांशी तिचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. खुशीला अश्याच एक सामाजिक संस्थेच्या सहकाऱ्याने लीना कडे आणलेलं होत. खुशीचा तो आक्रोश, ती किंकाळी ऐकून लीनाच काळीज पिळवटून निघत होत. तिच्या अंगावर काटे उभे राहत होते. तरी ती तिला धीर देत होती. ती स्वतः हादरलेली असताना खुशीला आधार देत होती. कामच होत म्हणा तीच ते,पण ती एक माणूस पण होती.

खुशीसोबत जे घडलं ते ऐकून कोणाचही काळीज पिळवटूनच निघेल.

खुशी बारा वर्षांची मुलगी, खेळकर,हसरी पण जरा कुठेतरी हरवल्यासारखी असायची. समजूतदार खूप होती पण मनातून खचलेली वाटायची. एकटी बसून तिची नजर काहीतरी शोधत राहायची. तिच्या या परिस्थितीला कारणही तसच होतं.

वर्षापूर्वी अगदी सामान्यांसारखं कुटुंब होत खुशीच. आई,वडील आणि ती. आई,वडील तिचे लाड खुप करायचे. परिस्थिती बेताची असली तरी तिला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. वडील शेतकरी होते तिचे. म्हणावं तसं शेतीत पीक नाही यायचं त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात पण ते मजुरी करायला जायचे. दिवसभर थकून भागून आल्यावर खुशीचा हसरा चेहरा बघितला की त्यांचा सारा क्षीण निघून जायचा. खुशीची आईही खुशीसाठी कोणाच्या शेतात काम असलं तर जायची. त्या दोघांची खूप इच्छा होती की, खुशीला खूप शिकवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं. त्यांना ज्या परिस्थिती मध्ये जगावं लागत त्या परिस्थितीत खुशीला त्यांना पाहायचं नव्हतं.ती जन्माला आल्यावर या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता म्हणून आनंदाने तीच नाव खुशी ठेवण्यात आलं आणि तेव्हापासून ते खुशीला खुशच ठेवत आलेले.

एके दिवशी खुशीच्या आईच्या पोटात अचानक दुखू लागलं.  तस अधून मधून तिच्या पोटात दुखायच पण नेहमी डॉक्टर कडे जायला पैसे नसायचे. त्यामुळे तिने ते दुखणं अंगावर रेटलं. त्यादिवशी तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे पोटात दुखत होत म्हणून खुशी आणि खुशीचे वडील तिला डॉक्टर कडे घेऊन गेले. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या. टेस्टसाठी एवढे पैसे नव्हते आणि टेस्ट तर महत्वाच्या होत्या. खुशीच्या आईनेच तिच्याकडे लग्नातली सोन्याची अंगठी होती ती गहाण ठेवायला दिली. तिच्या माहेरची तेवढीच आठवण तिच्याजवळ राहिलेली ती पण आता गेलेली. पैसे मिळाल्यावर सगळ्या टेस्ट झाल्या. रिपोर्ट यायला बराच वेळ होता आणि खुशीला भूक पण लागलेली म्हणून ते तिघे एका साध्या हॉटेलमध्ये गेले. आधी कधी तिघे असे बाहेर नव्हते आले म्हणून खुशीला आनंदही झालेला आणि आई आजारी आहे म्हणून काळजीत पण होती. तिच्यासाठी वडापाव मागवला आणि आई वडिलांनी फक्त चहा घेतला. खुशीने तिच्या वडापावमधील एक एक घास दोघांना भरवला. दोघांचे डोळे पाण्याने भरलेले. परिस्थिती किती पण वाईट येवो पण खुशीमुळे त्याला लढण्याची ताकद मिळत होती. रिपोर्ट्स काय असतील याची काळजी खुशीच्या वडिलांना सारखी सतावत होती पण त्यांनी ते खुशीसमोर दाखवलं नाही. खाऊन झालं की ते रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांना भेटायला गेले. खुशीला बाहेरच उभं राहायला सांगितलं. दोघे आत गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की खुशीच्या आईला पोटाचा कॅन्सर झाला आहे आणि उपचार केले तर काही दिवस आयुष्याचे वाढू शकतात.

कॅन्सरचे नाव ऐकूनच ते दोघेही तिथेच रडायला लागले. खुशीचा चेहरा समोर येत होता. तिच्या आईला तर काहीच सुचत नव्हतं. पुढे सर्व अंधारच दिसत होता. खुशीच्या वडिलांनी स्वतःला आणि तिच्या आईला सावरले आणि दोघांनी बाहेर येताना ठरवले की खुशीला यातलं काही सांगायचं नाही. खुशी बाहेर वाट बघत बसलेली. दोघे बाहेर येताच काळजीने तिने विचारले की आईला काय झालंय. त्यावर दोघे हसतच बोलले,”काही नाही ग कामामुळे थोडा त्रास होतो बाकी काही नाही. डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात त्याने होईल  बरं”. खुशी म्हणाली,”आई आता तुझी सगळी काम मी करत जाईन.तू आराम कर जरा. मी शाळेत पण जाईन आणि घरचं काम व करेन”. तिचा हा समजूतदारपणा पाहून दोघांनी अश्रूंचा आवंढा गिळला आणि घरी गेले.

दिवसामागून दिवस जात होते. डॉक्टरने सांगितलं तस उपचार करायला पैसे खूप लागणार होते म्हणून खुशीची आई म्हणायची तिच्या वडिलांना की,”जेवढं आयुष्य आहे तेवढ जगेन. हे उपचार वगैरे आपल्याला झेपणार नाहीत. खुशीसाठीही पैसे साठवायचे आहेत. माझ्यावर नको खर्च करायला”. पण खुशीचे वडील ऐकायला तयार नव्हते. ते म्हणायचे की “खुशीला आणि मला तुझी खूप गरज आहे. अस सगळं संपून नाही देणार मी”. उपचार जमेल तसं चालू होते. शेतीत पीक काही येत नव्हते पण मशागतीलाच पैसे जायचे. थोडंफार दागिने उरलेले ते गहाण ठेऊन झालेले आतापर्यंत. आता राहिलेला फक्त शेतीचा एक तुकडा. पुढच्या उपचारासाठी तो तुकडा विकण्याशिवाय खुशीच्या वडिलांकडे पर्यायच नव्हता. पण त्यासाठी खुशीची आई तयार नव्हती. अगोदरच डोक्यावर एवढं कर्ज होत, त्यात खुशीच शिक्षण, तिच्या आईच आजारपण या सगळ्यांनी रात्रभर खुशीच्या वडिलांची झोप लागायची नाही. कोणाशी ते फारसे बोलतही नव्हते. खुशीसोबतही आता आधीसारखे बोलत नव्हते. खुशी आईला विचारायची,”बाबाला काय झालं ग? आजकाल तो खूप शांतच असतो” आई सांगायची ” कामाच टेन्शन असत ग पोरी. तू नको काळजी करू”. आईलाही ही अवस्था सहन होत नव्हती. तिला वाटायचं तीच जगण म्हणजे ओझं झालंय खुशीच्या वडिलांसाठी. एक दिवस खुशीच्या वडिलांनी जमिनीचा तुकडाही गहाण ठेवला आणि मिळालेल्या पैश्यात उपचारासाठी साठी डॉक्टर कडे गेले. डॉक्टर अजून पुढच्या वेळी बोलवायचे. आता पुढे कुठून पैसे आणायचे,शेती तर गहाण टाकली,डोक्यावर आभाळा एवढं कर्ज. खुशीच्या वडिलांना काहीच सुचत नव्हतं. त्या टेन्शन मध्येच ते एक दिवस दारूच्या दुकानाकडे वळले. त्यांना जाताना खुशीने पाहिलेलं. ती आईला सांगायला घरी आली. आई आणि ती दोघी वाट बघत बसलेल्या कधी येतील खुशीचे बाबा याची पण अख्खी रात्र सरली तरी आले नाहीत म्हणून दोघी शोधायला घराबाहेर पडल्या. सगळ्या गावात शोधून झालं तरी सापडले नाहीत म्हणून शेतात आल्या आणि तिथे खुशीला तिचा बाबा झाडावर लटकलेला दिसला. खुशीच्या वडिलांनी आत्महत्या केलेली.खुशीला काही समजण्याच्या पलीकडचं होत सगळं.

 

कर्जाचा डोंगर, खुशीच्या आईच आजारपण या सगळ्या संकटांचा सामना करता करता खुशीच्या वडिलांनी स्वतःच जीवन संपवलं. आता पुढे खुशी आणि तिच्या आईच काय झालं? खुशीसोबत काय घडलं? नक्की वाचा पुढील भागात.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा