खेळ कुणाला दैवाचा कळला ( भाग 6)

Written by

 

जय आता निश्चिन्त झाला होता….त्याला खूप आनंद झाला होता….

जयने मग ठरवले दिल्लीला असतानाच वृंदाला प्रपोज करायचे… जे होईल ते होईल बघता येईल हिम्मत करायची….

काही वाटलं तर अनिकेत आहेच, त्याची मदत घेता येईल…

जय आता वृंदाला कसं प्रपोज करायचं याची तालीम करत होता… त्याला वाटायचं कधी गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त करावं नाहीतर कधी एखादं पत्र लिहून…. की आताच मेसेज करून सांगून टाकू तीला?? जय नुसता सैर भैर झाला होता ….

एकीकडे जयला वाटायचं की लवकरात लवकर वृंदाजवळ आपले प्रेम व्यक्त केले पाहीजे…. पण दुसऱ्याच क्षणी वाटे की वृंदाला हे नाही आवडले तर….
अनिकेतने सांगितले आहे की ती आपला आदर करते…. प्रेम नाही…

इकडे जयला अनिकेत भेटला की विचारायचा…. काय जय सर कुठपर्यंत प्रगती??

जय हसून फक्त नकारात्मक मान डोलवायचा…..

दिवसामागून दिवस जात होते पण जय काही हिम्मत करत नव्हता…

अनिकेतची जाण्याची वेळ आली पण जय मात्र…. अजूनही विचार करत होता….

शेवटी अनिकेत म्हणाला तू जर आज तिला सांगितले नाहीस तर मी तिला सांगतो…

जय म्हणाला…. नाही, आज मी नक्की सांगतो…

जयने वृंदाला फोन केला…. फोन वर बोलतानाही जयचं हृदय खूप धडधड करत होतं….

जय :वृंदा आज आपण डिनर करायला बाहेर जाऊयात
का?

वृंदा :सर इथे आज नाहीये का डिनर??

जय : तसं नाही गं…. आपण इथे आल्यापासून बाहेर कुठे पडलोच नाही…. एकाच ठिकाणी आहोत…. थोडा बदल वाटेल….

वृंदा :ठीक आहे सर जाऊयात आपण बाहेर…. मला देखील माझ्या भावासाठी आणि आईसाठी काहीतरी घ्यायचे आहे…

जय ( मनातल्या मनात ):ते आपण उद्या घेऊ शकतो…
जय : ठरलं तर मग, कॅब ने जाऊ तू संध्याकाळी साडेसात वाजता रेडी रहा…

वृंदा :ok सर

वोर्कशॉप असल्याने ते पाच वाजताच संपले होते… वृंदाला देखील जय ची सोबत मिळणार आहे याचा खूप आनंद झाला होता… तिने आज मनापासून छान तयार व्हायचे ठरवले होते…. नेहमीच स्वतः साठी तयार होणारी वृंदा आज जयचा विचार करून तयार होत होती

वृंदाने एक फिक्कट गुलाबी रंगाचा long गाऊन घातला … केसांचा फ्रेंच रोल केलेला…. त्यावर आर्टिफिशियल फुलांचा बंच लावला…. त्या गाऊनला साजेल असा मेक अप केला…. फिक्कट गुलाबी रंगाची लिपस्टिक, काजळ, लायनर, मस्कारा….आणि चेहऱ्यावर येणारी केसांची बट…. जणू एखादी अभिनेत्रीच भासत होती…..

तिच्या गोऱ्यापान अंगावर सगळं इतकं खुललं होतं की तिच्याकडे बघणारी व्यक्ती….. तिच्याकडे बघतच राहत असे….

बरोब्बर साडेसात वाजता जयचा फोन आला…. वृंदा तयारच होती…. ती हॉटेलच्या कॉरिडोर कडून गेट मध्ये गेली… तिला पाहताच जय म्हणाला…. हाय मार डाला

वृंदा :काही म्हणालात सर??

जय :काही नाही, कुठे काय??

दोघेही कॅब ने एका गार्डन हॉटेल मध्ये आले…

तिथलं ambiance खूप छान होतं…. जागजागी कारंजे लावलेले होते लॉन देखील अतिशय सुरेख पद्धतीने टाकली होती…

जय ने तिथल्या वेटरला बोलावून आम्ही बुक केलेला टेबल कुठे आहे ते विचारलं…

वेटर त्यांना घेऊन हॉटेल च्या दुसऱ्या टोकाला गेला…. तिथे सर्व काही हार्ट shape होतं…. तिथला लॉन… तिथला टेबल… तिथे लायटिंग देखील हार्ट shape केलेली होती…सोबत सुमधुर संगीत ऐकायला येत होतं….

वेटरने त्यांना बसायला खुर्च्या देऊन तिथून निघून गेला….
त्या जागी बसल्यावर दोघांनाही एकदम प्रसन्न वाटत होतं…

जय : वृंदा तूला काही कळत आहे का आपण इथे का आलो??

वृंदा : म्हणजे सर… मला नाही कळले

जय :अगं अशी कशी गं तू… हे हॉटेल खास प्रेमासाठी प्रसिद्ध आहे… या हॉटेल मध्ये सगळे प्रेमात असलेले लोकं येतात…

वृंदा : फक्त कान देऊन ऐकत होती… हे जय सरच आहेत ना… तीने जयच्या नकळत स्वतःला चिमटा घेऊन बघितला… अरे हो.. हे सत्य आहे स्वप्न नाही (स्वगत )

जय : वृंदा माझं तूझ्यावर मनापासून प्रेम आहे…. i love you वृंदा… मला तुझ्यासोबत आजन्म राहायला आवडेल वृंदा…. तूला माझी साथ चालेल का?? तू माझी अर्धांगिनी होशील का??

वृंदा : मनातल्या मनात…. एकदम प्रपोज…. मला वाटलं नव्हतं जय सर मला प्रपोज वगैरे करतील

जय : वृंदा बोल ना… तूला आवडतो का गं मी… हे बघ अशी शांत नको राहूस
..जीव कासावीस होतोय माझा….

वृंदा विचार करत…. सर म्हणजे मी काय बोलू…. तूम्ही इतके चांगले आहात की कुणालाही तूमची सोबत हवीशीच वाटेल…. मलाही वाटते… पण खरं सांगू का सर आपल्या दोघांची परिस्थिती पाहता मी कधीच आपलं काही होऊ शकतं याचा विचार केला नाही…. पण i like you, i respect you, सर love चं म्हणाल किंवा आजन्म सोबत राहण्याचं म्हणाल तर तूमची अर्धांगिनी होणं म्हणजे एक स्वप्न वाटतं….. ते पूर्ण झालं तर आनंदाच आहे….

जय :म्हणजे मी होकार समजू….

वृंदा : माझा नकार नाहीये पण सर आपल्या परिस्थितील तफावत पाहता मला वाटतं की थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आपण एकत्र यावं… तुमच्या आणि माझ्या घरच्यांची परवानगी मिळाली तर जास्त आनंद होईल….

काय करणार सर माझे वडील गेल्यानंतर माझ्या आईने खूप हाल अपेष्टा सोसल्या आहेत… आता तिला थोडेही दुःख नको असे वाटते….

जय :बापरे किती प्रॅक्टिकल आहेस गं तू??

वृंदा :काय करणार?? परिस्थिती बनवते प्रॅक्टिकल…. वृंदाने स्मित केलं….

क्रमश :
©® डॉ सुजाता कुटे

Article Categories:
प्रेम

Comments are closed.