गंगाराम

Written by

*विकृत*विवेक चंद्रकांत वैद्य . माझी कंपनी बंद झाली आणि इन्कमचा मुख्य स्त्रोत बंद झाला.पंचेचाळीस या अर्धवट वयात काय करणार? पुर्वी आमच्या काकांचे किराणा दुकान होते तिथे आम्ही मुले जाऊन काम करायचो.ब-यापैकी माहिती होती धंद्याची.ठरवले,गल्लीत एक किराणा दुकान टाकायचे. जागा भाड्याने घेतली आणि चालू केले.
गंगारामची आणि माझी ओळख तिथलीच.
रात्री जेवणबिवण करून तो काही किरकोळ सामान घ्यायला यायचा. घरी जायची घाई नसायची त्याला. तो गप्पा मारायचा…थोडीफार मदत करायचा.नवीन धंद्यामुळे नोकर लावलेला नव्हता.दुकान बंद करायच्यावेळी मी हिशोब करायचो शेवटी तोपर्यंत तो बसायचा.
बर्यापैकी घसट झाली.एकेदिवशी तो बारीक आवाजात म्हणाला” दादा तुम्हाला त्या पलिकडच्या गल्लीतली सुमा माहिती आहे का?” मला माहित असण्याचा प्रश्नच नव्हता.
“एक नंबरची चवचाल बाई” मी कान टवकारले. “लग्न झालेले.मुले शाळेत जातात आणि ही शेजारच्या दोनतीन पोरांशी संबंध ठेवते. गल्लीतली अनेक पोरांना नासवले हिने.अहो तो दिवेश तर लग्न करायलाच तयार नव्हता.हिच्यापायी वेडा झाला होता.शेवटी हिनेच लग्नाला तयार केले त्याला. अजूनही संबंध आहेत म्हणे त्यांचे. तुम्ही बघीतले का त्याला.आपल्याकडे येतो बघा कधीतरी सिगारेट घ्यायला.”
“असेल बुवा.मला काही आठवत नाही.”
“आहो,तुम्हाला काय माहित असणार ह्या गोष्टी तुम्ही सरळ लोक.” दुकान बंद केले तरी ती सुमा माझ्या डोक्यातून जाईना.

एकदोन दिवसांनी पुन्हा गंगाराम आला. सामसूम झाल्यावर पुन्हा गंगाराम हळू आवाजात म्हणाला.”त्या रेवतीने नवरा सोडून समोरच्या भैय्याबरोबर नवीन संसार थाटला. अगदी त्याच गल्लीत.अगदी लाजलज्जाच सोडली आजकालच्या पोरींनी.”
“का रे गंगाराम?”
“नवरा सकाळचा जायचा आणि रात्री यायचा बिचारा थकून.भैय्याचे दुकानच आहे तिच्या घरासमोर.जातायेता ओळख झाली. भैय्या तगडा जवान गडी. नव-याकडून सुख मिळत नसेल तिला. ”
“बापरे. एवढ्यासाठी?”
*मग दादा.तुम्हाला काय माहिती.तुम्ही सरळ माणसं”
गंगाराम गेला पण माझी रेवतीला पाहण्याची इच्छा जागृत करून गेला.
आता हळूहळू मी गंगारामची वाट पहायला लागलो.त्याच्या हळू आवाजात सांगीतलेल्या गोष्टींमध्ये मला रस वाटू लागला.जर दोनतीन दिवस तो आला नाही तर मला करमेनासे झाले.
“तुम्हाला माहीत आहे का दादा त्या टॉवरजवळ राहतो ना तो ड्रायव्हर त्याची एक बाई आहे.त्याची बायको माहेरी गेली की ती खुशाल ह्याच्या घरी येऊन राहते. पंधरा पंधरा दिवस.”
“बापरे एवढ्या उघडपणे ?”
“मग काय? अगदी निर्लज्ज झालेत लोक.”
“त्याची बायको काही बोलत नाही?”
“काय माहित?”

गंगाराम असे अनेक किस्से सांगायचा.कोणाची मुलगी पळून गेली,कोणाची बायको नवरा बाहेर गेल्यावर आपल्या मित्राला बोलावते,कोणत्या माणसाला ‘बाहेर’ जाण्याचा शौक आहे. हे आणि ते.मीही त्या गोष्टी मन लाऊन ऐकायचो.खरेतर अशा गोष्टींचा मी एडीक्ट झालो.अगदी आंबटशौकीन झालो असे म्हटले तरी चालेल. कधीतरी सुमा माझ्याकडे पाहून हसली असे स्वप्न पडले, नवरा अॉफीसला गेल्यावर बाई ज्या मित्राला बोलावायची त्या मित्राच्या जागी मी स्वतःला पाहू लागलो.अशा अनेक गोष्टी . माझे वय काय? माझी मुले किती मोठी आहेत? माझी सध्याची आर्थिक ओढगस्तीची परिस्थिती या सर्वांचा मला पार विसर पडत चालला. पण हे त्यावेळी माझ्या लक्षात आले नव्हते .
एकदा गंगाराम म्हणाला “त्या रेशमाला ओळखतात.तुमच्या मागच्या बिल्डिंगमध्ये राहते?”
“काय तिचे?”
“तीचे तिच्या अॉफीसच्या साहेबांबरोबर संबंध आहेत”
मी एकदम ओरडलो “शक्यच नाही”
“तुम्हाला माहित नसणार दादा.तुम्ही सरळ माणसं”
“नाही.ती तशी नाहीचं”.रेशमाला मी चांगलाच ओळखत होतो.अगदी सरळमार्गी सोज्वळ मुलगी.नवरा अचानक एक्सीडेन्टमध्ये गेल्यावर तिला कम्पान्सेशनवर नौकरी मिळाली.बरीच वर्षे झाली ती नोकरी करतेय पण तिच्याबद्दल वावगा शब्द कोणी काढला नाही. माझे तिच्याबरोबर कौटुंबिक संबंध.ती मला काका म्हणायची. गंगाराम गेल्यावर मला काहीसा धक्का बसला. अस्वस्थ झालो.गंगारामवरचा विश्वास कमी झाला. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही.सकाळीच अॉफीसच्या दुसऱ्या डिपार्टमेंटला एक मित्र आठवला. दुपारी त्याला भेटलो.साहेबाकडे काम आहे.त्यांचा स्वभाव कसा आहे वगैरे विचारले.साहेब प्रामाणिक आणि स्वच्छ चरीत्र्याचा असल्याचे समजले.माझा जीव भांड्यात पडला.तरीही एकदा रेश्माला भेटून यावे हे ठरवले. कदाचित अॉफीसमध्ये कोणी त्रास देत असेल किंवा कोणी वरीष्ठ दबाव टाकत असेल.
दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या घरी पोहचलो.
“या काका…” तिने प्रसन्न मनाने स्वागत केले.”खूप दिवसांनी आलात?”
“हो गं.म्हटले जरा भेटून येऊ”
“थांबा.चहा ठेवते”
“चहा वगैरे राहू दे.बस इथे जरा. थोडे बोलायचे आहे तुझ्याशी.”
“बोला काका.”
“रेश्माबेटी…तुला अॉफीसमध्ये कोणी त्रास देत का?”
“नाही.पण असे अचानक का विचारतायत?”
“बेटा आजकाल खूप ऐकू येत काहीकाही.काळजी वाटते. एकटी स्त्री पाहून काहीजण मागे लागतात.”
“नाही काका.आपण चांगलो राहीलो तर बाकीचेही चांगले राहतात.आणि तसे काही कुणी त्रास दिला तर आपली अख्खी बिल्डिंग माझ्या मागे आहे”
“तरीही काही वाटले तर मला सांग. मदत मागायला संकोच करू नको”
“नक्की . खरेतर मीही मागे येऊन काकूंना भेटून गेली.तुम्हालाच काही पैशाची मदत हवीय का म्हणून?या अश्या अडनीड वयात तुमची नौकरी गेली.”
“हो.आता हळूहळू किराणा दुकान बर्यापैकी चालते.आणि मुलीकडून आर्थिक मदत घ्यावी एवढी वाईट परिस्थिती नाही झाली अजून माझी. येतो मी”
मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होते.
दुकानात आलो.आज रात्री गंगाराम आला तर त्याला चांगलाच खडसवायचा विचार केला.रात्री वाट पाहिली पण तो आला नाही. त्या रात्री सहज विचार करत बसलो.चूक कोणाची? गांगाराम बोलतांना आपण अगदी लक्ष देऊन ऐकायचो अधूनमधून त्याला विचारायचो.हे एक प्रकारे प्रोत्साहन नव्हते ? विवाहबाह्य संबध ठेवणा-या स्त्रियांच्या गोष्टी ऐकतांना आपण मनात तिच्याशी संबंध ठेवायची मनीषा बाळगुन असायचो ही विकृती नाही. गंगाराम कमी शिकलेला आणि विकृत आहेच पण आपण कोण आहे?आपल्या मनात कुठेतरी ह्या सुप्त भावना असतील तर आपल्यावर लहानपणापासून केलेल्या संस्काराचे काय? हे आपल्या घरांपर्यंत आले म्हणून आपण तपास केला.बाकीच्या स्त्रियांना तर आपण चरीत्रहीन ठरवूनचं टाकले ना? डोक्याचा भुगा झाला. पहाटे पहाटे डोळा लागला. सकाळी गंगाराम १५ दिवसांसाठी गावाला गेल्याचे कळाले. मनात एक विचार येऊन गेला.
होलसेल किराणा घ्यायला जायचो त्या निमित्ताने भरपूर ओळखी झाल्या होत्या. गंगारामने सांगितलेल्या बायांची माहिती काढायला सुरूवात केली.काम कठीण होते. जास्त चौकशी माझ्यावरच बेतली असती.पण कुठे ओळख तर कुठे सहज चौकशीचं नाटक केले.
गंगारामने सांगितलेल्या स्त्रियांपैकी निम्या बनावट निघाल्या.म्हणजे अशा स्त्रीया नव्हत्याच. बाकी ठिकाणी निव्वळ गैरसमज आणि अफवा होती.म्हणजे ज्याची बायको गावाला गेल्यावर दुसरी बाई त्याच्या घरी यायची ती त्याची वहीनीचं होती..म्हाताऱ्या आईची काळजी घेण्यासाठी ती यायची.
भैय्याबरोबर उघडपणे राहणा-या बाईचा नवरा भयंकर संशयी होता व रोज तिला मारहाण करायचा.एकदा तर रॉकेल टाकून तिला पेटवायला निघाला तेव्हा भैय्यानेच तिला वाचवले आणि आपल्या घरी नेले. सर्व गोष्टींचा तपास करणे शक्य नव्हते.तरीही गंगारामने सांगितलेल्या गोष्टीत फारतर १०%गोष्टीच ख-या होत्या . ही कीड माझ्या डोक्यातून मलाच काढायला हवी होती.

सकाळी उठून देवाची पुजा केली. गेले कित्येक दिवस ती कामाचे निमित्त करून करत नव्हतो.शांत वाटत गेले. सकाळ संध्याकाळ गावातल्या राममंदीरात जाण्याचे ठरवले.सकाळी जाऊनही आलो. छान प्रसन्न वाटले.
रात्री गंगाराम नेहमीप्रमाणे आला .त्याने बारीक आवाजात बोलायला सुरूवात करताच मी फोनवर कुणाशी तरी बोलणे चालू केले(ते लवकर संपवलेच नाही.) त्याने पुन्हा बोलायला सुरूवात करताच मी रेश्माची गोष्ट त्याला सांगीतली …सौम्य स्वरात त्याची चूकही दाखवून दिली. आणखीन बाकी गोष्टींची सत्यताही सांगितली . तो काहीसा वरमला. सावरासावर करून निघून गेला.

नंतर गंगाराम परत काही दुकानात आलाच नाही.एकदा गल्लीतले काका मला म्हणाले”अहो तुमचा गंगाराम तर पलीकडच्या गल्लीत नवीन उघडलेल्या इलेक्ट्रिकच्या दुकानात दिसतो आजकाल?”
मी म्हणालो “काका आता दुकानात गर्दी व्हायला लागलीय ना?त्याच्याशी गप्पा करायला वेळच मिळत नाही.”
मनात म्हणालो आपला आवाज बारीक करून तो त्या इलेक्ट्रिकवाल्याला कोणत्या बाईबद्दल भलतसलत सांगत असेल कोण जाणे किंवा कदाचित माझ्याबद्दलही सांगत असेल…”दादा तुम्हाला माहित आहे का तो पलीकडच्या गल्लीतला किराणावाला? बायांबाबतीत जरा ‘हा’च आहे बरका….”(समाप्त )

©विवेक चंद्रकांत वैद्य.नंदुरबार

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.