गप्पा दिवाळी फराळांच्या…..

Written by

दिवाळी फराळ …..

तुम्ही म्हणाल… दिवाळी फराळ आणि तोही आता…. !! खरे तर आता काही दिवाळी नाही हे मलादेखील ठाऊक आहे… पण काल एक गंमतच झाली.

सहज मोबाईल चाळत असताना दिवाळीतील माझी पोस्ट माझ्या नजरेस पडली… मी ती पुन्हा नव्याने वाचू लागले आणि सर्व दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले…

आता दिवाळी नसली तरी त्या दिवसांची आठवण करून दिली अन माझे मलाच खूप छान वाटू लागले…

दिवाळीच्या फराळाच्या डिशचा तो फोटो पाहून तर तोंडाला पाणीच सुटले… आणि पोस्ट मधील फराळांच्या गप्पा ऐकून तर हसूच आले…..

म्हटले चला आज हा आनंद आणि मौनसंवादाचा आणखी एक नमुना तुमच्या बरोबर शेअर करूयात…

◆ गप्पा दिवाळी फराळांच्या…..

दिवाळी संपली आणि दिवाळी फराळही संपू लागला, एक एक डबे रिकामे होऊ लागले तसतसे या फराळाची गोडी अधिक वाढू लागली…

काल एक गंमतच झाली. डबे रिकामे करत असताना उरलेला फराळ एका डिशमध्ये काढला आणि डिश डायनिंग टेबल वर ठेवली. काही कामासाठी आत गेले तर कानावर काही बोलण्याचे आवाज ऐकू आले, ते डायनिंग टेबलवरूनच येत होते. लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी आणि शेव आपापसात गप्पा मारत होते.

यावर्षी दिवाळीत “पुडाची करंजी” आणि चकलीने बाजी मारली होती. “पुडाची करंजी” माझी आजी बनवायची. माझ्या लहानपणी मिक्सर, फ्रीज असे काही नव्हते. आई, आजी पाट्यावर वाटण, पुरण वाटायच्या. आम्ही बहिणी ही मदत करायचो. करंजीची कणिक घट्ट भिजवावी लागते त्यामुळे करंज्या करण्यापूर्वी आजी ती कणिक पाट्यावर मुसळाच्या साहाय्याने चेचून घ्यायची त्यावेळी मुसळ पडू नये म्हणून आम्हा मुलांना ती एका हाताने धरायला लावायची.

आम्हालाही खूप मजा यायची. ते मुसळ वर-खाली होताना मऊ होत जाणारी कणिक पाहून खूप गंमत वाटायची. त्यावेळी केलेले निरीक्षण आता मात्र कामास येतेय याची जाणीव होते आणि खूप छान वाटले. आता मिक्सर, फूडप्रोसेसर ने काम हलके केलेय पण त्यात ती मजा नाही जी आम्ही अनुभवलीय. असो.

या करंजीला बनवायला मात्र वेळ लागतो पण सोबतीला कोणी असेल तर मात्र झटपट होते आणि क्षीणही येत नाही. तर अशी ही आजी, काकू, आई आणि माझी मोठी बहीण यांचा हातखंडा असलेली पुडाची करंजी यावर्षी कित्येक वर्षांनी बनवली आणि जमली देखील.

यावर्षी चकली सोबत तिची मावसबहीण बटर चकलीही केली होती. पहिल्यांदा प्रयत्न केला आणि खूप छान जमली होती, अगदी खुसखुशीत! त्यामुळे त्या थोड्या जास्त भाव खात होत्या.

खारीशंकरपाळीही जरा जास्तच खुश होती कारण माझ्या मुलीला ती अतिशय आवडली होती आणि विष्णू मनोहरांनी सांगितल्या प्रमाणे केल्यामुळे तर जास्त भाव खात होती.

शेवसुद्धा खुश होती बरं ! तिची जुळी बहीण लसूण शेव लवकर संपली म्हणून तिला थोडे वाईट वाटत होते पण हिचेही माझ्या घरच्यांनी खूप कौतुक केल्यामुळे हि सुद्धा आनंदी होती.

बेसन लाडू व चिवडा देखील खुश होते कारण त्यांचे म्हणणे असे होते की ही वर्षभरात बऱ्याचदा आम्हाला बनवते त्यामुळे आम्हीच सगळ्यात जास्त Favourite !

अशा फराळांच्या रंगलेल्या गप्पा ऐकून मी मात्र गालातल्या गालात हसत होते. 😊

© सौ.सुचिता वाडेकर

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.