गर्भाची वाट हरवलेला बालकृष्ण…

Written by

गर्भाची वाट हरवलेला बाळकृष्ण,…

©स्वप्ना मुळे(मायी)

डोळ्यातलं पाणी आज काही थांबेचना कितीही पुसलं तरी ते सतत ओघळतच होतं,… तिलाही वाटलं जाऊदे आज त्याच्याकडे बघून इतकं रडू येत आहे आपल्याला त्याला कारणही त्याच हे रुपडं आपल्या कुशीत अजूनही आलेलं नाही,……”तुझ्या स्त्रीत्वाचा सर्वोच्च आनंदी क्षण म्हणजे ह्या बाळकृष्णासारखं लेकरू तुझ्या कुशीत असेल,” असं म्हणणारी आजी माहेरी गेलं की आजही विचारते,…”पावला का ग बाळकृष्ण??” आणि आपलं उत्तर ठरलेलं,……तू लग्नात दिलेला बाळकृष्ण अंधळाच आहे,…आज 12 वर्ष झाली लग्नाला ,…म्हणजे आजे एक तप झाला पण त्याला माझ्या गर्भाशयाची वाटच सापडेना ग,…??
हताश होऊन आजी म्हणायची असं नको म्हणू ग,….अंधळा कसा असेल तो,…तुला वाट पहायला लावणारा असेल कदाचित,…ती कसनुस उदास हसायची,..कारण तिला आई होण्याची ओढ होतीच पण तो क्षण आयुष्यात येत नाही म्हणून तिला डिवचणारेच खुप होते,…काय या वेळेसही तांब्या पालथाच का,..?असं वाकडं तोंड करून सासुबाई बोलल्या की तिला खुप मोठा अपराध केल्या सारख वाटायचं,…..कुठल्या कार्यक्रमात बरोबरीच्या मैत्रीणी लेकरं घेऊन मिरवताना दिसल्या की ही उगाच आपलं तोंड लपवायची तरी गर्दीत कोणीतरी म्हणायचंच आता बस झालं की मोकळं राहणं,..जरा जबाबदाऱ्या घ्या,…सासरे बुवा मध्येच म्हणायचे आणखी किती दिवस दुसऱ्याचे नातवंड फिरवायचे आहेत काय माहीत,…?फक्त सासरचेच नाही तर शेजारी,पाजारी मैत्रिणी,बहिणी सगळ्याजणी येता जाता सल्ले देत होत्या,…आई सुध्दा माहेरी गेलं की म्हणायची,..लवकर लाव बाई नंबर ,..मी थकत चालले,..पुढं माझ्याच्यानी झालं पाहिजे बाळंतपण,…तेंव्हा एकटी आजी तिच्या बाजूने बोलायची,…तिच्या काय हातात आहे,..बालकृष्णाला जेंव्हा, जसं यायचं तसं येईल तो रूप घेऊन,…उगाच बोलू नका तिला,… मऊ लुगड्यांन आजी तिचे डोळे पुसायची,….आणि बाळकृष्णाला हात जोडून म्हणायची,..”.होऊ दे रे आई तिला,… भेटू दे आयुष्यतल्या आनंदाला,….!”
डॉक्टरांचे उंबरठे झिजवून झाले होते,…गोळ्या, औषध आणि इंजक्शननी शरिराची चाळणी करून झाली होती,…..पण आता परवा आलेले रिपोर्ट पाहून ते दोघेही उदास झाले होते,…आजपर्यंत कोणी सांगितलं नव्हतं पण या वेळी ह्या डॉकटरांनी जरा स्पष्टच सांगून दिलं,… तुम्ही व्यर्थ वेळ घालवत आहात,……
नेमका कृष्ण जन्म दिवस होता त्या दिवशी ,…ती दरवर्षी मोठया आशेने लग्नात दिलेला बाळकृष्ण सुंदर सजवून त्याचा सोहळा करायची,…आजही त्याला सजवायला तिने घेतलं,…पण दरवेळेस सारखी कदाचित त्याही पेक्षा आर्त हाक ह्या वेळी होती,…”ये ना रे माझ्या जगण्यात,…मला मातृत्व जगायचं आहे,…”असं मन प्रार्थना करत होत आणि डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं,…
तितक्यात तो आला आणि त्या अश्रूंना टिपत तो म्हणाला,…पुढच्या कृष्ण जन्माला तुझ्या कुशीत खरंच गोपाळ कृष्ण असेल,… कारण मी आताच अनाथाश्रमात जाऊन दत्तक मुल या विषयी चौकशी आणि नोंदणी करून आलो,…आपल्या मुलाचे पालक तर कोणी होत ग,…पण अनाथ मुलाचे पालक होता येणं हे खरं पालकत्व नाही का,…तिला हसावं की रडावं तेच कळेना,…पण मूर्तीतला बाळकृष्ण हसुन तिला आजीच्या वाक्याची आठवण करून देत होता,…”बाळकृष्ण आंधळा नाही तो कोणत्याही रूपाने येईल तुझ्याकडे?”…….

(बाळकृष्णाच चित्र मी रेखाटलं आहे,…आवडलं तर नक्की सांगा)
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद,…

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा