गारा वेचू गारा……!!!

Written by

#गारा_वेचू_गारा…….!!!

लहानपणी “बर्फ'” या गोष्टीचं आम्हाला सर्वांनाच प्रचंड आकर्षण होतं!! एकतर आतासारखे त्यावेळी प्रत्येक घरात फ्रीज नव्हते. आमच्याकडे तर नव्हताच. त्यामुळे कुठलीही थंड गोष्ट फार हवीहवीशी वाटायची, आणि उन्हाळ्यात जरा जास्तच!!!

त्यावेळी आतासारखी एवढी थंड पेयही मिळत नव्हती. आणि जरी मिळत असती तरी कोणी ती देऊन असले चोचले पुरवलेही नसते. मग काय जी थंड गोष्ट मिळायची त्यावर अगदी तुटून पडायचो आम्ही सारे.

दुपारी सर्व घरादाराचा पेप्सी खायचा कार्यक्रम असायचा. किंवा मग कधी कधी कुल्फीही. पण सहभागी घरातली सर्व मंडळी. लहान पण आणि मोठी पण आणि म्हातारी पण. सर्वाना हवं असायचं थंड थंड खायला.

बाहेर फिरायला गेलं की उसाचा रस मिळायचा. आणि त्या रसवाल्याकडे, आमचा आवडता बर्फ असायचा. ग्लासमधे तर जास्त मागून घ्यायचोच, पण तिथून निघतानाही आम्ही पोरं त्या रसवाल्याला मस्का मारून बर्फाचे तुकडे मागून खात बसायचो. एवढा आवडायचा तो बर्फ.

मे महिना असाच सरत असायचा, धम्माल मस्तीत……

आणि मग कधी कधी मे महिन्याच्या सरते शेवटी भर दुपारी आकाशात काळे ढग जमा व्हायला लागायचे,वारा वाहू लागायचा, विजा चमकायला लागायच्या. लाईट छूमंतर व्हायची. आणि ढगातून पावसाचे थेंब पडू लागायचे. आम्ही त्या पावसात मस्त भिजायचो आणि अचानक ते थेंब टप टप लागायला लागायचे.

आम्ही पोरं आनंदाने उड्या मारत जोरजोरात ओरडायला लागायचो, गारा पडतायत गारा…….!!!

कित्ती मज्जा वाटायची आम्हाला!!! आम्हाला आवडणारा बर्फ साक्षात आभाळातून पडतोय म्हटल्यावर आम्ही सैरभैरच……

एकेक गारा हातात धरून आम्ही खायला बघायचो. काही पटकन वितळायच्या काही तशाच असायच्या. वरून पडताना चटाचटा किती लागायच्या त्या आम्हाला. पण आम्हा पोरांना काही फिकीर नसायची.

कोणीतरी पळत जाऊन भांड आणायचं. भांड्यात जमा करून पटपट घरी पोचवायचो. त्यांनाही खायला.

तो जो आनंद होता, गारा वेचून खाण्याचा त्याला काही तोडच नाही. एक वेगळाच उत्साह संचारलेला असायचा अंगात.

दरवेळी मे महिन्यात मला गारांची आठवण हमखास होतेच. आणि मी माझ्या मुलीला गारांची धम्माल सांगते. आणि मुलगी मात्र म्हणते, मला कधी ग बघायला मिळणार गारा???

खरंच माझ्या मुलांना गारा प्रकरण फक्त ऐकून माहीत आहे.
लहानपणी मी साताऱ्यालाच असायचे आणि नंतर देखील सुट्टी लागली की तिकडेच पळायचे, त्यामुळे मला गारांचा मारा मिळायाचाच एकदा तरी.

इकडे ठाण्याला काही गारा पडत नाहीत. पुण्या-साताऱ्याला जातो, तेव्हाही आमचा टाईम चुकतो. प्रत्येक वेळी मी मनातल्या मनात म्हणत असते, यावेळी गारांचा पाऊस पडू दे…..पण अजून तरी नाहीच मिळालाय तो. मलाही दाखवाचयं माझ्या मुलांना आकाशातून बर्फ कसा पडतो ते, मला स्वतःलाही तो हरवलेला आनंद मिळवायचाय परत!!!

आता काय प्रत्येक घरात फ्रीज आहे. थंडगार पाणी चुटकीसरशी मिळतं. थंडगार बऱ्याच गोष्टी फ्रिज मध्ये पडलेल्या असतात. आता पोरांनाही एवढं बर्फाचं आकर्षण नाही. तो असतो असाच फ्रिजमधे बारा महिने त्याच्या ट्रेमधे गपगार पडलेला, कोणी त्याच्याकडे बघून उड्या मारत नाही. कोणीही त्याला चमच्याने उकरून काढत नाही.

आता बर्फ खाणं सोडलं असलं जरी मीही, तरी मला अजूनही तो गारांचा मारा मात्र हवा हवासा वाटतो, त्या टप टप पडणाऱ्या गारा मला मुलांबरोबर वेचायच्यात, वेचता वेचता तोंडातही टाकायच्यात, त्यांना बघून अजूनही मला माझ्या मुलांबरोबर आनंदाने उड्या देखील मारायच्यात!!!

तुमच्याकडे आहेत का हो अशा आठवणी गारांच्या ??

तुम्हीही वेचून खाल्यात का कधी टप टप पडणाऱ्या गारा???

बघा जरा आठवून, सांगा बरं मला?

©️स्नेहल अखिला अन्वित

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा