गालातल्या गालात हसते आहे 😊

Written by
ले.©सौं. पूनम राजेन्द्र.

दूरस्थ कुणी

“दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता
खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता
खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली
नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली
नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली
कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली
“समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!”
कवी : कुसूमाग्रज (वि. वा शिरवाडकर)
ही कविता ज्या कुणा दुरास्थाकरवी तुझ्या हाती येईल, समज की तिच्यात त्याची वाहती जीवन सरिता आहे.
अशी जीवन सरिता जी खडकाळ प्रांतात उगम पावलीये. त्या रुक्षतेत आजूबाजूच्या खडकांना टक्कर देत देत अडखळत, आटत, फेसाळत,  आपला प्रवाह वाहता ठेवत, स्वतःला समुद्रामध्ये सामावण्यासाठी वाट शोधत निघालीये.  जीवाची काहिली करणाऱ्या रखरखत्या रणरण उन्हासाठी सावली बांधू पहातेय.  पण हाय रे!  त्या रुक्षतेत ती स्वतःच सुकत जातेय.  बस अंकुरताहेत छोट्या छोट्याश्या वेली जेव्हा की तिथे हव्या आहेत मोठ्याश्या वृक्षाली. उन्हामुळे त्या ही धड फुलू शकत नाहीयेत. फुलंच नाहीत तर मधाळ मकरंद कुठून असायला ! बस आहेत ते अंकुरही ही करपत कोरडे पडताहेत.
आता आकांक्षा एकच, की दुर्वासांसारख्या कुणा ऋषींनी या जन्मजात कोरडेपणा घेऊन असलेल्या रुक्ष वेलींना आपल्या क्रोधाग्नीने शापित करावं. त्या शापाने त्या दग्ध होत त्यांच्या समिधा व्हाव्यात..
आणि
त्या समिधां क्षणभराकरता का असेना पण  तुझ्यातला अंतराग्नी फुलवायला कारण ठराव्यात.
सह्याद्रीच्या खडकाळ कुशीतून वाहणारा  मराठीचा प्रवाह  आता इंग्लिश मिडीयममधे लोअर लेव्हल  मराठी कसं बसं शिकणाऱ्या आजच्या  पिढीकडे बघून असंच  म्हणत असेल!
की त्यांचे इंग्रजी शब्द स्वतःत सामावून घेत गालातल्या गालात हसत असेल! 😊
काही हजार वर्षांपूर्वी प्रचलित पैशाची भाषेतून मराठीचा उद्भव इतिहास सांगतो. तर जनमान्यता संस्कृतातून उद्भव मानते. ती आपली गालातल्या गालात हसते आहे.  😊
संस्कृत,  उर्दू,  फारसी,  आता इंग्लिश नवनव्या शब्दांचे वेगवेगळे प्रवाह सामावून घेत मराठीचा प्रवाह अखंड वागवते आहे. आर्या,  भारुड,  ओव्या,  अभंग, लावणीने  कौतुकते आहे.  नाटक,  संगीतातून फुलते आहे.  मुक्तछंद  जगते आहे. संवादीपण आपलं  जपते आहे. व्यक्तं होणं अनुभवते आहे अन गालातल्या गालात हसते आहे. 😊
आधी संवाद माध्यम गुरु परंपरा मौखिक,  नंतर भुर्जपत्र,  नंतर कागद पेन,  आता जोडीला कीबोर्ड (सोशल मीडिया).
बदलती माध्यमं ती पाहते आहे अन गालातल्या गालात हसते आहे. 😊
आग्नेय म्हणजे कोणती दिशा इंग्लिशमध्ये सांगाल प्लीज. हा… हा… जरूर आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट गं राणी!
ओह. ओके…. संवाद असे ऐकते आहे. पूर्णविरामाचा फुल्स्टोप झेलत मराठी भाषा डे बघते आहे अन गालातल्या गालात हसते आहे. 😊
बस, संवाद समोरच्यापर्यंत ठसठशीतपणे पोचणं महत्वाचं.
ही  यशस्वीता ती राखते आहे.  हक्काने या हृदयीचे त्या हृदयी घालते आहे. शब्दांतून ‘आंतर अग्नी फुलवते’ आहे. अन गालातल्या गालात हसते आहे. 😊
*टीप – कविता नेटवरून साभार.
Article Categories:
विनोदी

Comments are closed.