गावाकडच्या गोष्टी !!

Written by

” ते हिंदीवालं तथंच चेटाड….. आपलं आपलं मराठी मझारलं ‘ झिंगाट ‘ वाजाड ”
घोळक्यातुन आवाज आला…
‌काही वेळा करता बँड बंद झाला… गायकाने झिंगाट सुरू केलं… घोळक्याने पुन्हा लय पकडली… धांगडधिंगा सुरू झाला… यायला , मित्राचा हळदीचा कार्यक्रम आहे…. जल्लोष तो बनता है ना भाई…. बँड चा आवाज जरा जास्तच होता…( गायकाचा भसाडा आवाज झाकण्याचा तो प्रयत्न असतो ) असो…साईड ला जेवण्याच्या पंगती बसल्या होत्या… हळदी आधी जेवण्याची नवीन प्रथा खेड्यात पण सुरू झाली होती…. ” घुगऱ्या वाढ रे…. या पंगत ले तर्री जाऊदे ” वरबाप मोठ्या आवाजामध्ये सांगत होता… नवरदेव पोराचं काही हळदी मध्ये लक्ष नव्हतं…. सगळं लक्ष त्या आपल्या दोस्तांच्या घोळक्याकडे…. इतकी वर्षे इतरांसाठी सोबत नाचत होते… आज हा बाजुला हळदीने पिवळा होत होता…. झालं एकदाचं…. जेवणं झाली… फोटू , विडीयो बिडीयो सगळं झालं…. नाचण बंद झालं…. कुणीतरी म्हातारा डुलक्या देत देत पुढं आला…. खिश्यातून 10 ची नोट घडी करून मातीमध्ये गाडली…. ” शे का कुणी नागीन नाचाले ? ” मिश्याना ताव देत म्हणाला… घोळक्याने एकाला पुढं ढकललं… तरुण गडी एकदम…. डोळे लालेलाल झालेले…. नोटेकडे पाठ करून उभा राहिला… हळू हळू कंबरेत वाकून तोंडाने नोट पकडायचा प्रयत्न करू लागला… बँड जोरजोरात नागीनची धून वाजवत होता… सारी गर्दी त्या एकट्याकडे लक्ष देऊन होती… शेवटी गडीने बाजी मारलीच…10 ची नोट तोंडाने उचलून घेतलीच…. खेड्यामध्ये होणाऱ्या लग्नाचा हा सर्वात भारी भाग असतो…. प्रश्न 10 / 20 / 100 च्या नोटेचा कधीच नव्हता…. ती धुंदी , जल्लोष , जोश , मजा यातच सर्व आलंय…. एव्हाना गायक पुन्हा ” मैं तेरी दुश्मन , दुश्मन तु मेरा , मैं नागीन तू सपेरा ” म्हणू लागला…. घोळक्यातून अनेक ” नाग ” आणि ” सपेरे ” बाहेर आले…. मनोवेधक दृश्य…. ” देशी ” मुळे काहीजण नागाच्या भूमिका खऱ्या अर्थांने गाजवत होते…उत्तरार्धात दोघेही शांत झाले…. हळू हळू बरेच जण मदीरेने तृप्त झाले होते…. तेवढ्यात ” बाहो मे बोतल , बोतल मे दारू , दारू मे तेरा नशा ” सुरू झालं…. आणि गावामध्ये अनेकांमध्ये लपलेला ” मिथुन ” समोर आला… रात्रिची धुंदी वाढतच जात होती…. नवरदेव बिचारा खुर्चीवर बसून गंमत पहात होता….

Article Tags:
· ·
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत