गुज पावसाशी !!!😊

Written by

 

अरे!!! आलास तु , मला वाटलंच होतं तु आज येशील. आकाशात दाटलेल्या मेघांमुळे , आणि वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तुझ्या येण्याची चाहुल लागलीच होती.कीती रे वाट पहायला लावलीस. चातकासारखी तुझी वाट बघत होते . फक्त मीच नाही हं ” पुरी कायनात पलके बिछाए तुम्हारा इंतजार कर रही थी “आणि बघ तुझ्या येण्याने बाहेर कसा बहार आलाय. तु ही मस्त आनंदाने माझ्या अंगणात , माझ्या मनात बागडतोयस , यथेच्छ झाडा वेलींना , फुलापानांना , पशुपक्षानां न्हाऊ म्हाकू घालतोयस.
अरे!!! निसर्गाकडून मानवाला मिळालेलं सुंदर वरदान आहेस तु. वरदान हा शब्द अपुराच आहे रे तुझं कौतुक करण्यास.आनंद देणारा , मनाला प्रफुल्लीत करणारा, कधी येणार असा ध्यास लावणारा , साऱ्या पृथ्वीला उल्हासित करणारा असा हा पाऊस !!! कुठल्याच शब्दात तुझं कौतुक पूर्ण होऊ शकत नाही. तु तर समस्त जीवांचा आधार आहेस. तुझ्यामुळेच तर सगळ्या जीवाचं आणि ह्या धरणीमातेच अस्तित्व आहे ना!
कीती आतुरतेने तुझा आगमनाची वाट पाहत असतो रे आम्ही. बळीराजा तर अगदी डोळ्यात प्राण आणून तुझी वाट बघतो. त्याच भविष्य, अस्तित्व सगळंच तर अवलंबून असतं ना तुझ्यावर. ह्या सुंदर अशा माझ्या धरणीमातेची देखील वर्षभर त्या उष्ण रखरखीत भास्कराचा ताप सहन करून लाही-लाही झालेली असते रे. ती सुद्धा तुझ्या मिलनासाठी आतुर झालेली असते.
आणि तू येतोस, अगदी हळुवारपणे आणि तुझ्या येण्याने सगळंच कसं बदलून जातं. साऱ्या सृष्टीत नवचैतन्याचा बहार येतो आणि ही धारतीमाता तिच्या मन मोहणाऱ्या सुवासाने तुझं स्वागत करते जगातील कुठलाच अत्तर त्या सुगंधाची बरोबरी करू शकत नाही. पशु पक्षी ही तृप्त होऊन नाचत बागडत असतात . तू ही अगदी धुंद होऊन सगळीकडे बरसतोस. दरी-खोऱ्यातुन, राना-वणातून, शेता-मळ्यातुन, अंगणातून, आणि सगळ्यांच्या मानातसुद्धा मनसोक्त खेळतोस, बागडतोस . आणि सगळे जीव तुझ्या बरसण्याचा आनंद घेत नव्या स्वप्नांच्या, आनंदाच्या डोहात डुंबत असतात.
निसर्ग तर अगदी नव्या नवरीसारखा हिरवा शालू नेसुन आनंदाने लाजत मुरडत बहरत असतो. झाडांच्या पानावरुन हळुवार अलगद निथळणारे पाण्याचे थेंब पाहिले की जणु मोत्यांची बरसात होत असल्याचा भास होतो आणि म्हणूनच बहुतेक त्यांना पाणीदार मोत्यांची उपमा दिली गेली असेल.
पावसाची होणारी रिमझिम , हलकेसे धुके , मध्येच हळू डोकावणारा सूर्य आणि या सगळ्यांच्या मिलनाने सप्त रंगाची उधळण करणारा तो इंद्रधनुष्य. ज्याला पाहणे , अनुभवणे म्हणजे स्वर्गसुखच!!!
आणि अचानक अशा बेसावध क्षणी तुला अचानक काय होत रे? अचानक तू रागवतोस, तुझ्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता ही न लागु देता तू एकदम अक्राळ-विक्राळ रुप धारण करतोस, आणि तुझं तांडव सुरू करतोस. तु असा बेभान होऊन विजांच्या कडकडाटासह गर्जत बरसतोस की आभाळ फाटल्याचाच भास होतो . काय म्हणावं तुझ्या लहरीपणाला . आनंद देणारा आल्हाददायक , जिवाभावाचा वाटणारा तु अचानक क्रूर , जीवघेणा , वाटू लागतोस. तुझ्या सरीच्या प्रत्येक थेंबासोबत तु आमच्या आशा, स्वप्न, हसु, जगण्यांची उमेद, आनंद, सर्व वाहुन घेऊन जातोस आणि दुःखाच्या काठावर नेऊन सोडतोस आणि मागे ठेवून जातोस दुःख, निराशा, भंगलेली स्वप्न, कर्णकर्कश किंकाळ्या आणि हाडामांसाच्या खोबणीत पाषाणाचे दोन निर्जीव गोळे!
निसर्गाचं जीवनदान देणार हे वरदान कधी श्राप ठरत हे कळतच नाही.😭

©® सुनीता मधुकर पाटील.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा