गुढीपाडवा व आपण

Written by

गुढीपाडवा व आपण

उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदा,गुढीपाडवा. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त. गुढीपाडव्यादिवशी दरवर्षी शुभचे काकाकाकू त्याच्या घरी यायचे. शुभम त्याच्या आजीआजोबा,आईवडिलांसोबत गुढी उभारायचा. सगळीजणं सकाळी लवकर उठून आन्हिकं उरकून घ्यायचे. काका बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र बांधायचे. आदल्यादिवशी शुभम व आजोबांनी बाजारात जाऊन आंब्याचे टाळ,देवचाफ्याची फुलं,साखरेची गाठली आणून ठेवलेली असायची. शुभम व काकाची शुभदा दोघं मिळून काकाला गुढी सजवायला मदत करायचे.

आजीने लख्ख केलेला गडू काका गुडीवर चढवायचा. मग ही गुढी ग्रीलला बांधली जायची. सारी जणं नवीन कपडे घालून गुढीची पूजा करायचे. दुपारी गोडाधोडाचा नैवेद्य असायचा. दरवर्षी शुभम गुढीपाडव्यावर निबंध लिहायचा. यावेळी मात्र शाळेला आधीच सुट्टी मिळाली होती. सुट्टी मिळाल्याने त्याला थोडे दिवस बरं वाटलं पण बाहेर खेळायला जायचं नाही..घरातच काय ते करायचं याने शुभम चिडचिडा झाला होता.

आजीची किचनजवळ काहीतरी खुडबुड चालू होती. शुभम म्हणाला,”आजी मी तुला मदत करु?” आजीने होकार दिला. शुभमने आजीच्या सांगण्यानुसार पातेल्यात एक वाटी साखर व एक वाटी पाणी घालून ते उकळायला ठेवलं. त्यात आजीने खाऊचे रंगही घातले. मग एका ताटावर हाराचा दोरा ठेवून त्यावर चमच्याने तो पाक पसरवला. काही वेळातचं तो पाक सुकला व छान गाठल्यांच्या माळा तयार झाल्या. मग आजीने पितांबरी काढली. शुभमने आजीला गडूअगदी लख्ख घासून दिला. मग शुभम आजोबांकडे गेला,”आजोबा,आंब्याची डहाळी,ती पांढरी देवचाफ्याची फुलं,आम्रखंड,काजूकतली किती कायकाय आणायचय आपल्याला.”

आजोबा म्हणाले,”शुभम बाळा,तू म्हणतोस ते खरंय रे राजा पण तू टिव्हिवर बघतोस नं आपल्या आजुबाजूच्या देशांत माणसं कशी पटापट मरत आहेत. कोरोना विषाणूने त्याचे हातपाय सगळ्या मानवजातीवर पसरवलैत. काही पर्यटकांसोबत कोरोना विषाणूने आपल्या देशात प्रवेश केला आहे हे तर तुला माहितीच आहे.”

शुभम म्हणाला,” हो तर,म्हणून तर बाबा सध्या हॉस्पिटलमध्येच असतो. कित्ती दिवस मला दिसला नाहीए तो!” त्या शांभवीचे बाबापण पोलिस आहेत नं तीसुद्धा म्हणत होती तिचे पप्पा रात्री कधीतरी ती झोपल्यावर येतात व ती उठायच्या आधी परत कामावर जातात.”

आजोबा म्हणाले,”शुभम बाळा तू तर शहाणा आहेस. तुझ्या बाबांसारखे कितीतरी डॉक्टरबाबा हॉस्पिटलमध्ये दिवसरात्र कोरोनाच्या पेशंटना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. त्यांना तर बचावासाठीच्या पुरेशा सुविधाही उपलब्ध नाहीत. कितीतरी नर्सेस आपल्या छोट्याछोट्या बाळांना कोणाच्या तरी जीवावर सोडून दिवसरात्र या पेशंटची शुश्रुषा करत आहेत. आपले सरकारी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. सफाई कामगार आपला कचरा उचलून न्हेत आहेत.”

शुभम म्हणाला,”पण आजोबा आपण बाजारात का नाही जायचं?”

आजी म्हणाली.”शुभम बाळा,हा व्हायरस फार झपाट्याने पसरतो रे. जेवढं आपण एकमेकांच्या लांब राहू,जेवढी कमी गर्दी करु तेवढं आपण त्या कोरोनाला आटोक्यात आणू शकू.आत्ता बघ आंब्याची डहाळी,फुलं आणण्यासाठी आपण बाजारात गेलो तरच हे विक्रेते फुलं,पानं विकणार. जर आपण बाजारात गर्दी केली नाही तर विक्रेते विकणार नाहीत. गर्दी केली तर मात्र गिराईकाच्या व विक्रेत्याच्या पर्यायाने पोलिसांच्या,डॉक्टरांच्याही जीवाला धोका होऊ शकतो.”

शुभम म्हणाला,”अगं पण आजी बाप्पासाठी आम्रखंड, हापूस आंबे,काजूकतली..”

आजोबा म्हणाले,”शुभम बाळा,आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यात आपण पूजा करायची. देवबाप्पा आपला आहे. तो नाही रागवत आपल्यावर. त्याला फक्त साखर जरी ठेवली तरी तो मान्य करून घेईल. देवाची लाखो लेकरं मरत आहेत. देवाला अन्न कुठे गोड लागणार आहे सध्या!”

शुभम म्हणाला,”खरंय आजोबा. पुर्ण जग संकटात आहे. आपण उद्या देवबाप्पाकडे आपल्या सर्व जगातल्या माणसांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करुया.”

आजीने शुभमला कवेत घेतलं व म्हणाली,”शहाणं माझं लेकरु.”

तेवढ्यात शेजारचा संजूदादा म्हणाला,”काकू,तुमचा किराणा आणायचा असेल तर लिस्ट द्या माझ्याकडे. उद्यापासून लॉक डाऊन आहे.”

काकूंनी लिस्ट करून दिली. संजू गेला तसं आजी आजोबांना म्हणाली,”आपलं एक ठीक आहे,हाताशी पैसे होते म्हणून किराणा,जरुरीचं सामान मागवू शकतो. हातावर पोट असणाऱ्यांच काय? परत सिलेंडर संपत आलाय त्याचं काय?नुसता डोक्याचा भुगा झालाय ओ.”

आजोबा म्हणाले,”नको इतका विचार करुस. तो आहे ना त्याच्यावर सोडायचं. आपलं सरकार दीनदुबळ्यांची काळजी घेईलच. शिवाय आपणही आपल्यापरीने खारीचा वाटा उचलूच की. सेवाभावी संस्था,दानशूर हात पुढे येतील. सगळं चांगल होईल.”

आजोबा,आजी व शुभम एका सुरात म्हणाले,”देवा सर्वांना सुखात ठेव. आलेल्या आपत्तीला पायदळी तुडवं. साऱ्याचं भलं कर.”
🙏🙏

——सौ.गीता गजानन गरुड.
—–छायाचित्र सौजन्य–परेश आचरेकर.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.