गुढीपाडवा

Written by

प्रभू श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास आजच्याच दिवशी संपला. म्हणून हा आनंदाचा दिवस साजरा होतो. प्रभू राम चौदा वर्षे वनवासात राहिले, तसे महाराष्ट्राच्या, जनतेच्या अखंड आनंदासाठी आपल्याला पुढील एकवीस दिवस वनवासात राहायचे आहे. हा ‘वनवास’ नसून अज्ञातवास आहे. हे एकवीस दिवस म्हणजे पुढील अनेक वर्षं आनंदात घालवणाऱ्या सुखाची शिडी आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी आपण हा विचार पक्का करायला हवा.

ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली तो हा दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा, म्हणजे आजच्या गुढी पाडव्याचा. आजचा दिवस शत्रूचा पराभव करण्याचा. उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजचा ‘पाडवा’ घरीच साजरा करा. गुढी आनंदासाठी उभारली जाते हे एकदा मान्य केले तर उद्याच्या आनंदासाठी आज घरातच आनंद साजरा करा.

इटली, जर्मनी, चीन, अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडवला आहे. आपला देश अद्याप त्या स्थितीला पोहोचलेला नाही. तो त्या स्थितीला पोहोचू न देण्याचा निर्धार करणे याच निश्चयाची गुढी आज घरोघर उभारायला हवी. हे नव वर्षं हिंदूंचे आहे, पण त्या हिंदुत्वात उन्माद नको, धर्मांधता नको. हिंदुत्व हे मानवतेचे दुसरे रुप आहे.

आज  कोरोनामुळे जगातील सर्वधर्मीय संकटात सापडले आहेत. अनेक देशात शवपेट्या, कब्रस्ताने कमी पडत आहेत. त्या सगळ्यांसाठी सद्भावनेची गुढी हिंदू म्हणून उभारणे हीच हिंदुत्वाची ताकद ठरेल. कोरोनाशी सारे जग लढते आहे. हिंदुस्थान लढतोय. महाराष्ट्राने तर महायुद्ध पुकारले आहे. आजचा गुढी पाडवा ‘कोरोना’वरील विजयाची गुढी नक्की फडकवेल. वालीरूपी कोरोनाचा नाश होईल. घराघरात रामसैन्य आहे. त्यातील प्रत्येक जण सरकारी आदेश पाळून नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी घरात बसूनच सरकारला सहकार्य करेल. प्रभू रामाने चौदा वर्षांचा वनवास आजच्या दिवशी संपविला. जे रामास मानतात त्यांनी एकवीस दिवस घरीच थांबावे. असे घडले तरच आजची गुढी अखंड टिकेल…!

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.