गुढी तिच्या विजयाची…

Written by

“ते काही बाईचं काम नाही, तिला यात ओढवू नकोस”

मानस चा मित्र त्याला सांगत होता.

कंपनी बंद पडल्यामुळे मानस 2 वर्षांपासून घरीच होता…

तेव्हा रेखा ने छोटी मोठी कामं करून घर चालवायला घेतले होते…

मानस च्या नाकर्तेपणाला रेखा कंटाळली होती, या ना त्या मार्गाने ती मानस ला काहीतरी उद्योग सुरू करायला सांगे, नोकरी करून दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार नाही असा attitude मानस चा होता…त्यामुळे निदान व्यवसाय तरी करावा असं रेखाने सुचवलं ..

पण तिथेही त्याचं डोकं चालेना…

मग रेखानेच मार्ग सुचवला.. आपली जमीन आहे, तिथे एखादं हॉटेल उभं करा, जागा मोक्याची आहे आणि जवळपास पर्यटन स्थळही आहेत, पर्यटकांना तिथे चांगलं हॉटेल नाही…

मानस फार मुश्किलीने तयार झाला…

मानस तसा फक्त नावाला मालक होता, पण रेखाने आपल्या बुद्धीच्या जोरावर हॉटेल च इंटेरियर, खाण्याचे पदार्थ, तिथली स्वच्छता, ग्राहकाला सेवा या गोष्टीत जातीने लक्ष घातले होते…

मानस फक्त पैसे जमा करायला काउंटर वर बसे…

हॉटेल दिवसेंदिवस प्रगती करू लागले, व्याप खूप वाढला आणि घसघशीत कमाई होऊ लागली…

एकदा मानस ला त्याचा जुना मित्र भेटला…आशिष…

आशिष अगदी लबाड माणूस होता, त्याला मित्राचं यश डोळ्यात खुपत होतं… गोड बोलून त्याने मानस ला स्वतःला पार्टनर बनवून घेण्याची विनंती केली…स्वतःच डोकं कधीही न चालवणारा मानस आशिष च्या लबाडीला बळी पडला..

रेखा ने त्याला साफ विरोध केला..

“तू नको सांगू मी काय करायचं ते, मी मालक आहे…माझ्या धंद्यात नाक खुपसवायच नाही…”

रेखा ला धक्का बसला.. नावाला मानस जरी मालक असला तरी हॉटेल च्या उभारणीत पूर्ण वाटा रेखा चा होता…असं असून रेखा ने कधी मालकी हक्क दाखवला नाही…पण इतक्या पोटतिडकीने शून्यातून उभ्या केलेल्या व्यवसायाला नजर लागायला लागली हे तरी रेखा ला कसं सहन होणार?? 

मानस ला तिने खूप समजावले, पण सगळं व्यर्थ…

तिकडे आशिष ने मानस ला सांगितले, आपण हॉटेल मध्ये बार सुरू करूया… पैसे दुप्पट वाढतील…मानस ने त्याचे ऐकले…

पण आशिष ला माहीत होतं की रेखा याला विरोध करेल…म्हणून त्याने मानस ला सांगितलं की “तिला यातलं काहीही सांगू नकोस…”

रेखा ला मानस हॉटेल मध्ये न येऊ देण्यासाठी कारणं शोधी..रेखा ला घरातच अडकवून कसे ठेवायचे हे आशिष मानस ला शिकवत होता..

सोबतच हॉटेल मध्ये बार ची सुरवात झाली…पण ग्राहक वाढायच्या ऐवजी निम्मी झाली…पिऊन तर्रर्र झालेल्या माणसांना बघून मुलांवर वाईट परिणाम होतील म्हणून लोकं हॉटेल मध्ये यायला टाळायचे…आशिष ने मानस लाही पिण्याचं व्यसन लावून दिलं, मानस आता कायम दारूत बुडालेला असे…आशिष ने लबाडी करून हॉटेल आपल्या नावावर करून घेतले…

तिकडे रेखा ला याबद्दल काहीही माहिती नव्हती..

एक दिवस रेखा च्या घरी एक बाई भांडायलाच आली…

“तुमच्या नवऱ्याला तो दारूचा कोठा बंद करायला सांगा, स्वतः प्यायचं आणि दुसर्याचेही संसार उद्ध्वस्त करायचे…”

रेखा ला पूर्ण हकीकत समजली…रेखा खूप रडली…इतक्या पोटतिडकीने उभ्या केलेल्या व्यवसायाला मानस मुळे गालबोट लागलं होतं…पोटचं पोर दूर जातांना जशी अवस्था होते तशीच रेखा ची झालेली..

रेखा ने डोळे पुसले, 

नाकर्त्या नवऱ्याला सांभाळून घेतलं, नवऱ्यासाठी समर्पण केलं, माझी हुशारी त्याचा भल्यासाठी वापरली…पण त्याने त्याचीही कदर केली नाही…उलट इतरांची आयुष्य बरबाद करायला तो निघाला..

आता बस्स…

आता स्वतःची हुशारी स्वतासाठीच वापरायची,आता जे काही असेल ते मी असेल, जे काही असेल ते माझं असेल, मी सर्वेसर्वा असेल…

ठरलं, 

रेखा ने आता स्वतःचं हॉटेल टाकलं…त्यासाठी स्वतःचे दागिने विकले…

तिकडे मानस ला काहीही करू देत, आपण इकडे फक्त आपला व्यवसाय सांभाळायचा…

मानस त्याचा हॉटेल मध्ये पिऊन तर्रर्र असे…रेखा आता इकडे येत नाही म्हणून तो खुश असे..त्याला वाटायचं की ती घरातच बसली असेल…

पण रेखा दिवसभर घराबाहेर असे, 

हॉटेल साठी माल आणण्यापासून ते हॉटेल मध्ये कामाला माणसं ठेवायची कामं तिने करायला घेतली…

एक बाई इतकं सगळं आणि इतकं चांगलं कसं करतेय हे पाहून लोकं चाट पडत…

तिच्या व्यवसायाला हातभार लावणाऱ्या आणि तिच्या कडे काम करणाऱ्या लोकांना रेखा चा खूप आदर वाटे..

रेखा व्यवसायासाठी हुशारी तर वापरायचीच पण सोबत आपल्या कामगारांना वेळोवेळी पागर, त्यांना योग्य तो आदर आणि गरजेला मदत करत असे…

गाडीतून आलेला माल उतरवायला एकदा काही माणसं कमी पडत होती…रेखा ने पदर खोचला, आणि स्वतःच्या पाठीवर ओझं उतरवायला लागली…

रात्री अपरात्री न घाबरता हॉटेल वर थांबायची, कारण मानस घरी आल्यावर त्याला भानच राहत नसे इतका तो पिलेला असे, सकाळ होईपर्यंत रेखा घरी पोहोचे.  

हॉटेल चे काम, दस्तावेज, वकिली बाजू, टॅक्स, कामगारांचे पगार, हॉटेल ची बांधणी जे सर्व एकहाती रेखा बघे.. 

पदार्थ बनवण्यात कमालीची स्वछता, कमालीची शिस्त आणि आपल्या कामाशी प्रामाणिकपणा तिने आपल्या कामगारांना शिकवला होता..

आपण चांगलं काम केलं तर हॉटेल चाच नाही तर स्वताचाही वैयक्तिक फायदा होणार, जसजसे हॉटेल चा व्याप वाढेल तसा पगारही वाढवला जाईल असा नियम होता, त्यामुळे प्रतयेक जण आपलं हॉटेल म्हणून काम करे..

हॉटेल मधलं वातावरण, पदार्थाची सुरेख चव, योग्य ती सेवा यामुळे ग्राहक आकर्षित होऊ लागले, दिवसेंदिवस ते वाढतच राहिले..

बघता बघता रेखा च्या हॉटेल ने इतकी उंची गाठली की आता पेपरवाले, बातम्या देणारे त्याची दखल घेऊ लागले…

जवळपास 14 वर्ष तिने हा व्यवसाय चालवला, एव्हाना बऱ्याच शहरात त्याच्या शाखा सुरू झाल्या…

तिकडे मानस ला आशिष च्या लबाडीची कल्पना आली, त्याने आशिष ला त्याबद्दल बोलले तेव्हा आशिष म्हटला की हे माझं हॉटेल आहे, माझ्या नावावर आहे, वाटेल तेव्हा मी तुला हुसकावून लावू शकतो…

मानस ला त्याची चूक कळली…

रेखा चा व्यवसाय पाहून त्याला खरं तर खूप कौतुक वाटायचं, पण आशिष म्हणायचा ..”बाईची जात, काय जमणार आहे…करेल थोडे दिवस…दणके बसले मग बसेल गपचूप घरी…” मानस त्याचंच ऐकून ते खरं समजायचा…

आपल्याला दारूच्या व्यसनी लावून आशिष ने लबाडी केली हे मानस ने ओळखले…

तो रेखा कडे गेला..तिची माफी मागितली…

तुझ्या कष्टाने उभं केलेलं हॉटेल मी माझ्या मूर्खपणामुळे घालवल.असं म्हणत मानस ऑक्साबोक्सि रडू लागला…

“हॉटेल ला काहीही झालेलं नाही, ते अजूनही तुमच्याच ताब्यात आहे…”

म्हणजे? कसकाय??

तूम्हाला मी खोटी कागदपत्र दिली होती, कारण आशिष ला मी ओळखले होते…तो हॉटेल घशात घालणार हे माझ्या लक्षात आलं होतं…

“मग तेव्हाच सांगायचं ना…तुला इतकी मेहनत करून दुसरं हॉटेल काढायचे कष्ट पडले नसते…”

“तुम्हाला काय वाटतं? हॉटेल माझं राहील नाही म्हणून मी दुसरं सुरू केलं?? नाही…त्यादिवशी तुमचं बोलणं झालं ते मी ऐकलं..

की बाईची जात आहे, काय येणार आहे, काय जमणार आहे वगैरे…

मग मी स्वतःचा व्यवसाय केला तो माझा आत्मसन्मान जपण्यासाठी, स्वतःचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी…एक स्त्री काय करू शकते याचं उदाहरण पुढे आणण्यासाठी…”

मानस ला त्याचे हॉटेल परत मिळाले, आशिष ची हकालपट्टी झाली, बार बंद करण्यात आला…दोघेही एकत्र होते मात्र आपापल्या व्यवसायात वेगळी चुणूक दाखवत होते, मानस रेखा कडून आता बिझनेस चे धडे घेऊ लागलेला…

गुढीपाडव्याला मानस ने गुढी उभारताना रेखाला ला जवळ बोलावले,

“ही गुढी तुझ्या विजयाची…

14 वर्ष तू जो संघर्ष केलास त्याचा अभिनंदनाची…

राम परत आलेले तेव्हा अयोध्येत हा गुढ्या उभारल्या होत्या, 

आज तू परत मला मिळलीस, एक नव्याने…एक विजयी धुरंधर… एक स्वयंसिद्धा… एक प्रेरणा….”

रेखा ला आपल्या 14 वर्षाच्या वनवसाचं फलित मिळालं…तिचे डोळे पाण्याने डबडबले….

त्या दिवसाची गुढी ही तिच्या विजयाची होती…

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत