“गुपित”

Written by

“गुपित”….

आज सुधाताई खूप आनंदी आणि समाधानी दिसत होत्या, त्याला कारणही तसेच होते. सुधाताईंचा मुलगा आठवीत असताना सुधाताईंचे पती एका आजारपणात गेले. तेव्हापासून त्यांनी मोठया कष्टाने दिवस काढले. त्यावेळी त्या चाळीत रहात होत्या. मुलाचं शिक्षण, घरची जबाबदारी त्यांनी अगदी यशस्वीपणे पार पाडली.

त्या एका मराठी शाळेत शिक्षिका होत्या त्यामुळे त्यांना आर्थिक टेन्शन नव्हते. त्यांचा मुलगा आनंद हा देखील खूप हुशार होता. पदव्युत्तर शिक्षण घेऊन तो एका आय टी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत होता. सुधाताई ही आता निवृत्त झाल्या होत्या.

दोन वर्षांपूर्वी आनंदने एक 2bhk फ्लॅट घेतला होता आणि घरगुतीच गृहप्रवेश करून चाळीतून सुधाताई इकडे शिफ़्ट झाल्या होत्या. आज या गोष्टीला 2 वर्षे पूर्ण झाली होती, त्यांच्या कष्टाचे चीज झाले होते आणि म्हणूनच त्या समाधानी आणि आनंदी होत्या. चाळीतील कोणालाही त्यांनी मुद्दामच बोलावले नव्हते. पण तरीही चाळीतील वत्सलाबाईंना कुणकुण लागली आणि त्या माग काढत आल्याच.

सुधाताईंच्या मुलाने घेतलेले घर पाहून वत्सलाबाईंचा चेहरा उतरला… हि गोष्ट सुधाताईंच्यानजरेतून सुटली नाही. वत्सलाबाईंनी असे दुःखी घरी जाऊ नये असे सुधाताईंना मनापासून वाटले.

त्यांनी वत्सलबाईंना चहा दिला आणि म्हणाल्या, “अहो वत्सलाबाई, इकडे रहायला आल्यापासून रात्र-रात्र डोळ्याला डोळा लागत नाही हो माझ्या”.

“का हो, काय झालं?”, वत्सलाबाईंनी उत्सुकतेने विचारले.

“अहो, काय सांगू तुम्हाला, नवीन घर घ्यायच्या नादात मुलाने भलं मोठं कर्ज काढून ठेवलंय, आता त्याचे हप्ते फेडताना नाकीनव आलंय.”

वत्सलबाईंचे डोळे लुकलुकले… हि गोष्ट सुधाताईंच्या नजरेतून सुटली नाही. त्या पुढे म्हणाल्या, “आपलेच दात आणि आपलेच ओठ, काय करायचं… अन कोणाला सांगायचं.”

वत्सलबाईंनी कान टवकारले. सुधाताई पुढे म्हणाल्या, “तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करतेय, गप कुढत बसलेय झालं”.

हे ऐकून वत्सलाबाईंचा चेहरा खुलला, त्यांना मनातून खूप आनंद झाला होता. त्या खुशीतच सुधाताईंनी दिलेला चहा त्यांनी संपवला आणि कधी एकदा हि बातमी चाळीत जाऊन सगळ्यांना देतेय असे त्यांना झाले.

वत्सलाबाईंच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून सुधाताईंनाही हायसे वाटले. आनंद आतल्या खोलीतून हे सगळं ऐकत होता. वत्सलाबाई गेल्यावर तो बाहेर आला आणि त्याने सुधाताईंना विचारले, “आई, आपल्याला आजिबात कर्ज नाही हे तुला सगळं माहीत असताना तू खोटं का सांगितलंस?”

त्यावर सुधाताई म्हणाल्या, “अरे, माझ्या बोलण्याने त्या किती सुखवल्या हे पाहिलेस ना तू, पण जर मी खरे सांगितले असते तर त्या दुःखी मनाने घरी गेल्या असत्या आणि हे मला नको होते”.

“अगं, ते बरोबर आहे पण…” आनंद.

“अरे, दुसऱयांच्या दुःखात आनंद शोधणाऱ्या लोकांच्या आनंदासाठी कधी कधी आपण खूप दुःखात असल्याचे नाटक करावे लागते बाळा”…

“काहीवेळा काही गोष्टी गुपित ठेवणं सगळ्यांच्याच हिताचं असतं.” सुधाताई समजूतदारपणे म्हणाल्या आणि आनंदलाही हे पटले.

त्यामुळे आपल्या आजूबाजूला जेव्हा अशा व्यक्ती आपण बघतो तेव्हा माणसांच्या या स्वभावाचे कंगोरे प्रत्यक्षात दिसत नसले तरी ते असतात आणि ते जाणवतात तेव्हा अशा माणसांपासून लांब रहाणे केव्हाही योग्यं असेच वाटते.

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
इतर

Comments are closed.