‘गुरुपौर्णिमा’

Written by

भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा’ होय. महाभारतकार व्यास मुनींचा या दिवशी जन्म झाला म्हणून या पौर्णिमेस ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात .
ते आपल्या सर्वांचे आद्य गुरू आहेत ; कारण त्यांनी भारतीय संस्कृतीला मानसशास्त्र , व्यवहार शास्त्र, धर्मशास्त्र , नीतिशास्त्र अशा अनमोल ग्रंथांची भेट दिली आहे .

गुरुब्रह्मा,गुरुर्विष्णू:                                          गुरुर्देवो महेश्वरा                                   गुरु साक्षात ,परब्रह्म                              तस्मै श्री गुरुवे नम:

म्हणजे गुरू हा देवासमान असतो. देवतांचे सर्व सद्गुण गुरूमध्ये एकवटलेले असतात.
आपली आई, शिक्षक व मार्गदर्शक  हे आपले गुरू असतात ; यांची प्रतिमा नेहमी आपल्या हृदयात आदरणीय अशीच असते, म्हणून त्यांना प्रणाम .
‘  गुरुविण कोण दाखविल वाट ‘
प्रत्येक लहान मुलांची प्रथम गुरू असते त्याची आई . कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो ; त्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलांना चांगले वाईट काय ते सांगत असते . ती आपल्या वागण्या बोलण्यातून मुलांवर योग्य संस्कार करत असते. मुलांच्या जडणघडणीत आईला मार्गदर्शक गुरू म्हणून अत्यंत महत्त्व आहे .
शाळेतील शिक्षक हे सुद्धा मुलांना घडविण्याचे महत्त्वाचे काम करतात .सर्व विषयांचे ज्ञान शाळेतील शिक्षक-शिक्षिका मुलांना देतात , नैतिक मूल्यांचे संस्कार करतात , त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवतात .’गुरू’ या शब्दाचा अर्थ व्यापक आहे ‘गु’म्हणजे अंधकार ‘रू’ म्हणजे नाहीसा होणे .गुरूंच्या उपदेशाने, शिकवणीने आपल्या मनातील अंधकार नाहीसा होतो .समस्यांतून मार्ग काढत आपले ध्येय गाठता येते . सकारात्मक विचार करता येतो व स्वतःची प्रगती करता येते . आध्यात्मिक गुरूच्या सानिध्यात राहून आध्यात्मिक ज्ञान मिळवता येते . व जीवन जगण्याची कला आत्मसात करता येते .

आपल्या संस्कृतीत गुरुशिष्य परंपरेला मोठे स्थान आहे .व्यास व गणेश , वशिष्ठ आणि राम, कृष्ण व सांदीपनी, निवृत्ती व ज्ञानदेव ,अर्जुन व द्रोणाचार्य ,मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ .या गुरुशिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. ज्ञानदेव महाराजांचे ज्येष्ठ बंधू

निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरू होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे लेखन  त्यांच्याकडून  पूर्ण झाले . स्वराज्य संस्थापक ,शिवाजी महाराजांची पहिली गुरू ही त्यांची मातोश्री होती . तसेच रामदास स्वामी हे त्यांचे मुख्य गुरू होत.

‘गुरू गोविंद दोनाे  खडे,

काके लागू पाव ,

बलिहारी गुरु आपने ,

गोविंद दियाे दिखाय ।

याचा अर्थ असा गुरू आणि गोविंद म्हणजे ईश्वर दोघेही माझ्यासमोर उभे आहेत. प्रथम कोणाला नमस्कार करावा? प्रथम मी माझ्या गुरूंना नमस्कार करतो. कारण त्यांच्यामुळेच मला ईश्वराचे दर्शन झाले आहे .अर्थात योग्य मार्गदर्शनाचे, ध्येयप्राप्तीसाठी,  प्रयत्नांचे व सकारात्मक दृष्टी  देण्याचे  शिष्याचे कल्याण करण्याचे महान कार्य गुरू करत असतात.

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंचा सन्मान करण्याची संधी, चांगली शिकवण दिल्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणून गुरुपौर्णिमा साजरी करू या .

तस्मै श्री गुरवे नम:

सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत