गुलाबी सहवास ( लग्नाआधीच्या सोनेरी प्रवासाची प्रेमकथा )

Written by

      मधुराच्या हातावर आज संदेशच्या नावाची मेहंदी काढली जात होती.गुलाबी रंगाचा स्लीवलेस ड्रेस घालून हलकासा मेकअप करून ती तयार झाली आणि सगळ्यांची नजर चुकवत स्वतः चा एक सेल्फी काढून लगेच तिने संदेशला तो फोटो पाठवला, सोबतच मेसेज सुद्धा केला “रेडी फॉर मेहंदी..”
तिकडून लगेच संदेशचा रिप्लाय आला, ” लूकींग ब्युटीफूल 😘…तुला भेटायला आतुर झालोय…मिस यू सो मच…लव यू..”
त्याचा रिप्लाय वाचून मधूरा लाजून चूर होत मेहंदी काढायला बसली आणि हातावर काढल्या जाणाऱ्या मेहंदीला न्याहाळत संसाराच्या गोड, गुलाबी स्वप्नात रंगली. मेहंदी काढणे सुरू असताना लग्न ठरल्या पासूनचा सोनेरी प्रवास तिच्या डोळ्यासमोरून तरळून जात होता. एंगेजमेंट पासून लग्नापर्यंत असलेला मधला काळ गोल्डन पिरेड म्हणतात ना तसाच हा काही काळ दोघांच्या आयुष्यातला अतिशय गुलाबी, रोमॅंटिक, स्पेशल असाच काहीसा होता.

    मधुरा आणि संदेश यांचं तीन महिन्यांपूर्वी लग्न ठरलं, दोघांचं अरेंज मॅरेज. दोघेही एकाच शहरात नोकरीला. मधुरा म्हणजे प्रसन्न चेहऱ्याची, सालस मुलगी, गव्हाळ वर्ण, नाकी डोळी तरतरीत, सडपातळ बांधा, मध्यम उंची, रेशमी केस. बघता क्षणी कुणाच्याही नजरेत भरेल अशीच गोड.

संदेश तिला अगदी साजेसा, आकर्षक व्यक्तिमत्त्व,
उंच बांधा, पिळदार शरीरयष्टी, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज.
मधुरा त्याला फोटो बघूनच खूप आवडली. नंतर घरच्यांसोबत तिला बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा तिला प्रत्यक्षात बघून भेटून तर तो नकळत तिच्या प्रेमातच पडला.

    नंतर एकमेकांची पसंती झाली आणि लग्न ठरले. दोघेही खूप आनंदात होते. लग्न ठरविताना झालेल्या बैठकीत मधुरा लपून छपून सगळ्यांची नजर चुकवत त्याला बघत होती. त्याच्या व्यक्तीमत्वाला बघून तिलाही तो अगदी स्वप्नातला राजकुमार भासला. त्याच्याशी बोलताना त्याचा आत्मविश्वास, त्याच्या बोलण्यातला एक प्रकारचा आदरयुक्त भाव तिला अजूनच आकर्षित करत होता.
लवकरच दोघांचा फोन नंबर एकमेकांशी शेअर झाला त्या दिवशी मधुरा उत्सुकतेने त्याच्या मेसेजची वाट बघत होती. सायंकाळी त्याचा मेसेज आला, ” हाय मधुरा, मी संदेश..”

त्याचा मेसेज बघून मधुरा खूश. कुणीतरी खास व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे ही भावनाच तिला खूप आनंद देत होती. त्यालाही असंच काहीसं वाटत असेल का असंही तिच्या मनात आलं.

तिने लगेच त्याला रिप्लाय केला, ” हाय☺️..”
इथूनच दोघांच्यात संवाद सुरू झाला.

मधला तीन महीन्यांचा काळ म्हणजे काही विचारायलाच नको.
लग्न ठरल्यावर संदेशला ती पहिल्यांदा भेटणार होती तो‌ दिवस म्हणजे न विसरण्या सारखा‌. सकाळीच भेटायचं ठरलं होतं आणि मॅडमला रात्रभर काही झोपच लागली नव्हती. कधी एकदा त्याला भेटते याची आतुरता आणि पहिल्यांदाच असं लग्न ठरल्यावर भेटणार तेव्हा एक वेगळीच धडधड सुद्धा मनात सुरू होती. 
सकाळी मस्त तयार होऊन ती त्याला भेटायला गेली तर तो आधीच येऊन हजर. लाल रंगाची टि शर्ट, काळी जिन्स घालून, मोकळ्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
तिला बघताच परत एकदा संदेशची विकेट उडाली. तो एकटक तिला बघतच राहिला. तिने लाजून हाय संदेश म्हणताच तो भानावर आला.
” हाय मधू.. खूप सुंदर दिसते आहेस.. सॉरी, तुला जरा अवघडल्यासारखं वाटलं असेल पण तुझ्या चेहऱ्यावरून माझी नजरच हटत नव्हती, काय करू😉”

ते ऐकताच मधू परत लाजली. उगाच विषय बदलत ती म्हणाली, “मला जरा उशीर झाला ना यायला.. तुम्हाला खूप वाट बघावी लागली ना..”

त्यावर तो उत्तरला, “असं काही नाही गं, तुझ्यासाठी तर आता कितीही वाट बघायला तयार आहे मी.. आणि हो तुम्ही आम्ही नको म्हणू..तू म्हण मला.. तू मी म्हंटलं की कसं मित्र असल्यासारखं वाटतं. आपण एकमेकांचे चांगले मित्र व्हायला हवे ना या काही दिवसांत…आपण चांगले मित्र झालो तर एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल. तुलाही अवघडल्यासारखं वाटणार नाही. तुला काय वाटतं याविषयी..”

त्याचे बोलणे तिला खरंच पटले होते, मन अगदी हलके वाटले होते. त्यावर ती उत्तरली, “खरंच आहे हे…मलाही आवडेल आपलं हे नातं हळूहळू बहरत जाताना बघून.. त्यासाठी आपण चांगले मित्र बनलो तर खरंच समजून घेणे सोपे जाईल..”

तिचे बोलणे ऐकून त्याने एक गोड स्माइल दिली आणि दोघेही क्षणभर एकमेकांच्या डोळ्यांत बघत हरवले. तो तिच्या डोळ्यात बघतच म्हणाला, “मधू, हा लग्नापर्यंतचा काळ गोल्डन पिरेड म्हणतात ना..हा आपण दोघे अगदी आठवणीत राहण्यासारखा खास बनवूया.. खूप छान वाटतंय तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे..” त्यावर तिने लाजून होकारार्थी मान हलवली ‌

नंतर रात्री उशिरापर्यंत फोन वर बोलणे, प्रत्यक्षात भेटणे, गप्पा मारणे, एकमेकांविषयी जाणून घेणे असं बरंच काही सुरू झालं.

सोबतच लग्नाची तयारी, शॉपिंग सुरू होती.

एक एक दिवस दोघांसाठी खास होता. प्रत्येक दिवस त्यांना एकमेकांची एक नवीन ओळख करून देत होता, मनात आनंदाचे फवारे उडत होते. मनात वेगळीच भावना होती, एकमेकांच्या भेटीची ओढ अनावर होत होती. नक्की काय होतंय कळत नसलं तरी संदेश आपल्या आयुष्यात आल्याने खूप छान वाटतंय हे तिला कळत होतं.

तो क्षण आठवून तिच्या अंगावर अजूनही रोमांचक शहारा येत होता ज्या क्षणी संदेश ने पहिल्यांदाच तिचा हात हातात घेतला. ती त्याला भेटून जायला निघाली तसंच त्याने पटकन तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, “तुला भेटलं की वेळ कसा जातो कळतंच नाही…ही वेळ इथेच जरा वेळ थांबावी असं वाटतं मधू… खूप गोड आहेस तू…आय लव्ह यू…” त्याने असं पहिल्यांदाच हातात हात घेऊन आय लव्ह यू म्हंटल्यावर ती वेगळ्याच विश्वात रमली.  गुलाबी हवा चलने लगी, दिल मे कुछ कुछ होने लगा… असंच काहीसं झालं होतं तिचं…त्याच्या हाताचा स्पर्श होताच अंगावर रोमांच उभे राहिले, क्षणभर आजूबाजूचे वातावरण अगदी वेगळेच भासले. तो क्षण हवाहवासा वाटला, तो काय बोलतोय यापेक्षा त्याचा स्पर्श खुप खास वाटला तिला, एक विश्वासाची, जबाबदारीची, सुरक्षित अशी खास प्रेमळ भावना त्याच्या स्पर्शात तिला जाणवली. हा क्षण कधी संपूच नये असं त्याला सुद्धा वाटलं. असाच हातात हात घेऊन दोघे उभे होते. त्याने पहिल्यांदा आय लव्ह यू म्हंटल्यावर त्याला त्यावर रिप्लाय द्यावा याचा सुद्धा तिला विसर पडला. काही वेळाने ती तिच्या रूमवर परतली पण मन मात्र त्या क्षणांतच हरवलेले होते. त्याला परत कधी एकदा भेटते अशी तिची अवस्था झाली. तितक्यात फोनवर त्याचा मेसेज आला, “मधू… अजूनही हरवली आहेस का वेगळ्या विश्वात..मला उत्तर नाही दिलेस..”

त्यावर ती हसली आणि रिप्लाय केला, “तुला कसं कळलं मी तुझ्याच विचारांत हरवली आहे ते…आणि उत्तर कशाच..मला नाही कळालं…”

त्यावर त्याचा मेसेज आला, “तुझा हात हातात घेतला तेव्हा तुझे भाव कळले मला.. कुठेतरी हरवली होतीस..मी आय लव्ह यू म्हंटल्यावर मला उत्तर नाही दिलेस… आणि हो लाजली की अजूनच छान दिसतेस..”

ती त्याचा मेसेज वाचून स्वतःशीच हसली आणि त्याला रिप्लाय दिला, “आय लव्ह यू टू…”

त्यावर त्याचा परत मेसेज आला,”मेसेज वर नको, तुझ्या तोंडून ऐकायचं आहे..कॉल करतो तुला…”

दुसऱ्या क्षणी त्याचा फोन आला तशीच तिची धडधड वाढली.
फोन उचलून हळूच ” हॅलो..” म्हणताच तो म्हणाला, “मला उत्तर देणार ना मग आता..मी वाट बघतोय..”
कितीतरी वेळ त्याला वाट बघायला लावून तिने आय लव्ह यू टू म्हंटले आणि दुसर्‍या क्षणीच लाजून फोन कट केला.

त्याच्या परत मेसेज आला, ” मधू, आय लव्ह यू म्हणायला इतकी लाजलीस… लग्नानंतर कसं व्हायचं गं मग…”

त्यावर तिला जाम हसू आले. तिनेही खोडकरपणे रिप्लाय दिला, “नक्की कशाबद्दल म्हणतोय तू…”

असंच खोडकर, रोमॅंटिक संभाषण नंतर सुरू झालं…ती लाजली की तिची मज्जा घ्यायला त्याला जाम आवडायचं. हे सगळे क्षण दोघेही खूप एन्जोय करत होते.

नंतर त्याने तिला जेव्हा सांगितले की, “जसं तुला वाटतंय ना तशीच माझी अवस्था आहे..मलाही खूप वेगळं वाटतंय सगळं… खूप छान वाटतंय..फरक‌ इतकाच आहे मी लाजत नाहीये..ते काय ना आपण दोघेही लाजलो तर पुढे काय व्हायचं ना… आणि हो त्या दिवशी तुझा हात हातात घेतला ना तेव्हा मलाही घाम फुटला, एक वेगळाच अनुभव होता तो… अजूनही आठवतोय तो क्षण…”  ते ऐकून तिला अजूनच छान वाटलं.

त्या क्षणी मनात एकच गाणे गुणगुणत होते,

” पहला पहला प्यार है…
पहली पहली बार है…
जानके भी अंजाना ऐसा मेरा यार है….”

बघता बघता हे गोड,गुलाबी दिवस संपत येत होते. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी तिची धडधड वाढत होती.  या तीन महीन्यात संदेश विषयी एक प्रकारचा आदर तिच्या मनात निर्माण झाला, एक मर्यादा ठेवून प्रेम व्यक्त करणारा संदेश तिला अजूनच आवडला.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. अख्खं आयुष्य आपल्याला एकमेकांसोबत घालवायचे आहे ही भावनाच खूप सुंदर होती. त्याने म्हंटल्याप्रमाणे हा तीन महीन्यांचा काळ खरंच खूप खास आहे याची तिला खात्री झाली. आयुष्यभर आठवणीत राहतील असे बरेच क्षण त्यांनी अनुभवले होते.
लग्नासाठी सुट्टी घेऊन घरी जायला निघाले तेव्हा त्यांची लग्नापूर्वीची शेवटची भेट होती. आठवडाभराने आता थेट लग्नात भेट होणार आणि दोघे कायमचे एकत्र येणार याची पुरेपूर जाणीव असली तरी आठवडाभराचा हा दुरावा जरा त्रासदायक भासत होता.

    संदेश मधुराला स्टेशनवर सोडायला आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच भावना होती. लग्नाची तारीख जवळ आल्याने उत्साह होताच पण आठवडाभर मधूला भेटू शकणार नाही म्हणून तो‌ जरा उदास होता. आज ती बोलत होती आणि तो ऐकत होता, अचानक त्याने तिला मिठी मारली आणि म्हणाला, “मधू, आय लव्ह यू…आता हा दुरावा नको वाटतोय गं…लवकर ये आता माझ्या जवळ कायमची..वाट बघतोय मी..☺️”
त्याचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात अलगद पाणी आले.
अश्रू आवरत ती म्हणाली, “फक्त एक आठवडा..मग आयुष्यभर आपण एकत्र…☺️ आय लव्ह यू टू…काळजी घे..”

दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. आता लग्नाच्या मंडपात एकमेकांना कधी एकदा बघतोय याची उत्सुकता दोघांनाही लागली होती. तीन महिने भेटीगाठी, बोलणं, गप्पा गोष्टी यामुळे दोघेही एकमेकांना बर्‍यापैकी ओळखायला लागले होते. प्रेमही चांगले बहरले होते. आता दोन्ही मनांना ओढ लागली होती एकमेकांच्या भेटीची.

बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. लग्नमंडपात नववधूच्या रूपात मधूला बघताच संदेश तिच्या सौंदर्यावर अजूनच घायाळ झाला. तिनेही अंतरपाटाच्या वरून चोरून त्याला बघितले आणि स्वतःशीच लाजून हसली. नेहमीपेक्षा अजूनच आकर्षक दिसत होता तो. असंच चोरून एकमेकांना बघताना दोघांची नजरानजर झाली आणि आठवडाभराने असं एकमेकांना बघत एक वेगळाच आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर अलगद पसरला.

संदेशची सहचारिणी बनून मधूने त्याच्या आयुष्यात पाऊल टाकले. दोघांच्या प्रेमाला , संसाराला आज खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

संसार म्हंटलं की जबाबदारी, रूसवा फुगवा हा आलाच पण यातून योग्य मार्ग काढत एकमेकांची साथ दिली तर प्रेम हे बहरतच जाते.

जबाबदारी सांभाळताना कधी थकवा आला की लग्न ठरल्या पासून लग्न होईपर्यंतचा गोल्डन पिरेड आठवून बघा, त्या गोड आठवणीत काही क्षण रमल्यावर हा थकवा क्षणात दूर जातो.

अशीच ही मधुरा आणि संदेशच्या प्रेमाची गोड कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा 😊
तुमचेही असेच काही अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा ☺️

मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Article Categories:
प्रेम

Comments are closed.