गृहिणी ते करोडपती

Written by

©सरिता सावंत भोसले

       गृहिणी म्हंटल की सगळ्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव सारखेच असतात. अच्छा गृहिणी का….मग काय ती घरीच असते… काय काम असेल तिला…घर आवरा…. जेवण करा….मुलांना सांभाळा….बस्स या पलीकडे काय? 

     या पलीकडे तर सर्व काही असत तीच. घर सांभाळून ती अपडेट असते. नोकरी करणाऱ्या बायकांनाही ज्या गोष्टी माहीत असतात,जे ज्ञान अवगत असत ते तिलाही असत. तिची ड्युटी 8 तासाची नसून चोवीस तासाची असते आणि तीही विनामोबदला…विनासुट्टी…त्यातही सणवार,पाहुण्यांचा पाहुणचार, घरची आजारपण,सगळ्यांच्या आवडी निवडी सगळं काही समाविष्ट असत. आपलं कुटुंब सावरायला स्वतःच्या बऱ्याच गोष्टींना, स्वप्नांना तिने तिलांजली दिलेली असते तरीही ती इतरांसाठी फक्त गृहिणी असते.

     अशीच एक गृहिणी…चांगली शिकलेली…सरकारी नोकरी साठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी.. पण पुढे घर,नवरा,मुलं यापुढे स्वतःच स्वप्न मागे सारल. नवऱ्याच्या आतापर्यंतच्या संघर्षाची जाणीव ठेवून त्याला हातभार लावण्यासाठी… मुलांच्या शिक्षणासाठी शाळेत पोषक आहार देण्याच काम निष्ठेने करते.ना त्यात कोणता स्वार्थ साधला कधी ना भेसळ करून निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळ केला. या निष्ठेच, प्रामाणिक पणाच मोल केवळ १५००रुपये महिना. 

    दुसरीकडे जे भ्रष्टाचारी सामान्यांच्या जीवाशी खेळ खेळतात अशा राजकारणात अग्रेसर असलेल्यांना सरकार लाखाहून जास्त पगार म्हणून मिळकत देत. (धन्य ते सरकार…असो) 

   याच गृहिणीने स्वतःच्या हिमतीवर,स्वतःच्या कष्टावर,स्वतःच्या बुद्धी वर, आतापर्यंत जे वाचलं,जे जिवंत अनुभव आले त्या अनुभवांवर एका स्पर्धेत सहभागी होऊन एक करोड रुपये जिंकून दाखवून दिलं की गृहिणी घरात असल्या तरी कोणत्याच बाबतीत कमी नसतात. त्याही जेव्हा बाहेर पडतात तेव्हा जिंकतातच. त्यांना कमी लेखण्याच धाडस नक्कीच कोणी करू नये.

      बबिता ताडे आज स्वबळावर करोडपती झाल्या. त्यांचा गृहिणी ते करोडपती प्रवास खरंच कौतुकास्पद आणि डोळ्यांना सुखावणारा होता. इतकं साधेपण… इतकी विनम्रता… कुठेही अहंभाव नाही…कोणताही गर्व नाही.

त्या चेहऱ्यातून आणि हास्यातून प्रामाणिकपणा आणि  सच्चेपणा झळकत होता. पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत स्वतःला इतकं शांत ठेवण, शांत डोक्याने पूर्ण विचार करून त्या हॉट सीट वर बसून उत्तरे देणं आतापर्यंत उच्चशिक्षित लोकांनाही इतक्या सहजतेने जमल नाही ते त्यांना जमलं. The great अमिताभ बच्चनजी समोर असतानाही भारावून न जाता, भांबावून न जाता,कुठेही न डगमगता खेळ खेळणं खरच महाकठीण होत पण त्या गृहिणीने ते साध्य केलं. 

     आपल्या कामावरची निष्ठा तर आहेच पण स्वप्नही फक्त एका मोबाईलचच….स्वप्न शिवालय उभारायच आणि मग मुलांसाठी त्या पैश्याचा योग्य वापर करायचा. इतकी उदारता,अशी सामाजिक सेवेची तळमळ फारच दुर्मिळ झालीये सध्या. नवऱ्यासाठी झटणारी बायको आणि मुलांसाठी तळमळणारी आईही तितक्याच ताकदीने खेळली आणि जिंकली.

तो एक क्षण जेव्हा त्या एक करोड जिंकतात तो क्षण अविस्मरणीय, अविश्वसनीय आणि अवर्णनियच. खुद्द अमिताभ बच्चनजींच्या डोळ्यात आंनदाश्रू येतात….बबिता ताडे मात्र तितक्याच शांत…तितक्याच नम्र…कुठेही अतिउत्साह नाही…अतिरेक नाही. तो आंनद खर तर त्यांच्या सोंबत पूर्ण जगाने, महाराष्ट्राने जगला. आंनदाश्रू सगळ्यांच्याच डोळ्यात आले. अस वाटलं फक्त त्या गृहिणीच स्वप्न पूर्ण नाही झालं तर जगातल्या प्रत्येक गृहिणीच,प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रीच,इथे संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच स्वप्न पूर्ण झालं.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच उत्तम उदाहरण म्हणजे बबिता ताडे. 

     खर आहे स्वप्न सर्वांनी बघावी. बघितल्याशिवाय आणि झटल्याशिवाय ती पूर्णत्वाला जात नाहीत.  कोणाच्या साधी राहणीमानावरून, कोणी गृहिणीच आहे म्हणून किंवा कोण गरीब आहे म्हणून त्याच मूल्यमापन नक्कीच करू नये. प्रत्येकजण इथे आपापल्या क्षेत्रात करोडपती असतो.

गृहिणीही करोडपतीच असते तिच्या घरासाठी,तिच्या मुलांसाठी आणि जगासाठी पण. वेळ आली तर ती जागा जिंकू शकते हे सगळ्यानी पाहिलंच.

                                      ©सरिता सावंत भोसले

 

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा