गोष्ट एका बाळाची!

Written by

लहानपणी अनेक गोष्टी मी ऐकल्यात, अकबर -बिलबर, राजा -राणी, इसाप नीती, वाघा -कोल्ह्याच्या, परीच्या, राक्षसाच्या, रामायणातल्या, महाभारतातल्या वगैरे. त्याच काळात, एक सर्वात निराळी कथा माझ्या आई कडून मी ऐकलीयय. 

एका भरल्या घरात – तेव्हाची एकत्र कुटुंब पद्धती मुळे सगळीच घर ‘भरली’असत म्हणा – एक लहान म्हणजे चार -सहा महिन्याचं दुर्लक्षित बाळ होत. भावंडात चौथ्या नंबरच, घराचं प्रेम, पहिल्या  कुलदीपकातून पाझरून त्याचा पर्यंत पोहचत नसावं. जन्मजात अशक्त, रडकं, किरकिर. फारस कोणी लक्ष देत नसे. त्याची आई सासुरवाशीण. घरकामाचा रगाड्यात अडकलेली. पोटच्या गोळ्या साठी जीव तुटायचा. पण कामाचा रेटा आणि जावा,सासूचा तोंडाचा पट्टा! असह्य होती! ( हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पातल्या व्यथा सुद्धा सौम्य वाटाव्यात, अश्या काही गोष्टी ‘सासुरवासात ‘ घडत! चार चौघात ‘सासुरवाशणी ‘ ला कोरडी सहानभूती मिळे, पण अशी सहानभूती दाखवणाऱ्या, चार भिंतीत आपल्या सुनेचा छळच करत! ) पहिला महिना -दोन महिने ती बाळा कडे देऊ शकली, पुन्हा जमेना. 
” लहान लेकरं रडायचीत,  काही होत नाही!”
” जन्मल्या पासून किरकीरच कार्ट! सदा भोकाड पसरलेलेच! “
“घटकाभर रडल्यान, काही टाळू पडत नाही! नको लक्ष देऊ! तू आपलं सयपाकाचं बग! “
” काही नाय, तुलाच काम टाळायचं असत, म्हणून लेकराचं निमित्य करून आराम करतीस! तुझी सगळी थेर आमाला, काय नवी आहेत?”
“आग, त्या रड्क्याच्या काय नादी लागतेस?, रडलं -रडलं अन गप पडलं! तू आपलं भांडी घासून घे! “
” काय करायचंय असलं किडक कार्ट! मेलल  बर! सगळ्यांची तरी सुटका होईल!”
असले जावा, सासूचे सल्ले नेहमीचेच होते. 

झालं. व्हायचे तेच झाले. तापीचं निमित्य झालं, लेकराच्या अंगावर पुरळ उठले! अंगाची आग होत असावी, ते जिवाच्या आकांतानं रडू लागलं! 
” आत्ये, बाळ खूप रडतेय हो! अंगभर पुरळ अन फोड आलेत! दवाखान्यात नेवूत का?” बाळाच्या आईनं काकुळतीने सासूला विचारलं. 
दवाखाना -डॉक्टर -औषध -पैसे, बापरे, नकोच! 
“एव्हड्या तेव्हड्याला डॉक्टर काय करायचंय? मी विठामावशील विचारून येते.” सासूने मोडता घातला. विठामावशी, म्हणजे घरगुती उपचार ठाऊक असणारी एक म्हातारी होती. ‘ लिंबाच्या पाण्यात कपूर घालून, लेकराला नाहू घाला, म्हणजे पुरळ कमी होतील.’ हा विठामावशीचा सल्ला अमलात आणला. पण झालं भलतंच. त्या लहानग्या जीवाची अवस्था भयानक झाली. भाजल्या सारखे फोड अंगभर पसरले! अगदी डोळ्याच्या पापण्यांवर सुद्धा! त्याला रडताही येईना, कस रडेल? दोन्ही ओठावर फोड! अंगावर तीळ ठेवायला जागा उरली नव्हती! आईने धीर सोडला! सासू तावातावाने विठामावशीला भांडायला गेली!

विठामावशीचा सल्ला खरे तर योग्यच होता. पण सासूने घाईत नीट ऐकून घेतलाच नव्हता. कडू लिंबाच्या पाल्या ऐवजी, खाण्याच्या लिंबाच्या रसाचा अन कापराचा वापर झाला होता! पण चूक मान्य करण्या ऐवजी, सासूने सारे खापर सुने वर फोडून, हि बया मोकळी झाली! ‘ मी लिंबाचा पालाच म्हणाले पण हि हेन्द्री, चार लिंब अंगुळीच्या पाण्यात पिळून टाकली! मनाचं कारभार केला!’ सासूने कांगावा केला. सून मुळूमुळू रडत राहिली. तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. तिला काही ऐकू येत नव्हते. तिला फक्त मरणाच्या दारातले आपले बाळ दिसत होते!

त्या लेकराचे हाल सुरूच होते. संध्याकाळ पर्यंत फोडातून पाणी झिरपू  लागले! पुरुष मंडळी कामावरून परत आली. पुन्हा सगळ्यांनी मिळून बाळाच्या आईचा ‘उद्धार ‘ केला. वैद्य आले, पण नाडी  कशी पहाणार? हात भर फोड! नाकाजवळ सूत धरले! 
” थोडी धाक- धुकी आहे, पण खरे नाही! ” वैद्यांनी निर्णय दिला. 
तोवर त्याच्या देहाला मुंग्या लागूंलागल्या! दुपट्या वरून काढून,  लेकरू पोत्यावर ठेवले! दारा आड! 

निसर्गाचा एक नियम असतो, – सरवायवल  ऑफ फिटेस्ट – म्हणजे, सशक्तालाच जगण्याचा अधिकार देणे! त्या प्रमाणेच घडत होते! अशक्ताला  निसर्ग हि नाकारतो! 
पण नियती? तिच्या मनात काय होते? दुसरे दिवशी त्या बाळाने डोळे उघडले! अस्पष्ट हुंदकार दिला! रात्र भर जवळ बसलेल्या, आईच्या बोटाला हलकासा स्पर्श केला! दोन दिवस घिरट्या घालणाऱ्या मृत्यूला – जा, मी येत नाही, मला अजून जगायचे आहे, असे ठणकावून सांगितले असावे!

दोन महिन्यांनी सासू नातवाला घेऊन विठामावशीच्या ढाळंजत बसून सांगत होती. 
“आमची थोरली सून, रमा, ह्या लेकराची आई, एकदम येडपट आहे! एक काम धड करत नाही! ऐकलं  एक, अन केलं भलतंच! लेकरू मरू धातलं तरी बघितलं नाही! दोन दिवस हे बोचक, मी मांडीवर घेऊन बसले होते! म्हणून तर जगलं! बघा, बघा कसा लब्बाडावानी  हसतोय! ” खरच,  ते छोटं मुलं आजी कडे  ‘काय खोटारडी म्हातारी आहे ?’ असल्या नजरेनं पहात होते!

हे सारे खरे असावे असे, आता मला वाटतंय! कारण —— आजीने माझ्या चुलत भावांचे, जसे लाड केले, मांडीवर घेऊन मुके घेतले, तसे  मला कधीच जवळ घेतले नाही. खरे तर मला पण, तिच्या सश्या सारख्या मऊसूत गोधडीत झोपायचे होते! 

सगळ्यांना सगळे मिळत नाही असे म्हणतात. पण हे खरे नाही! काहींना सारे काही मिळते, न मागता  आणि काहींना काहीच मिळत नाही, अगदी मागून सुद्धा! —–सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.