गोष्ट छोटीशी सकारत्मकता अंगिकारण्यासाठी

Written by

अरे बापरे!!नऊ वाजत आले..हा अजून कसा येत नाही? फोनही लागत नाहीये याचा. कुठे राहिला असेल? एवढा उशीर कधी होत नाही आणि होणार असेल तर कळवतो तो फोन करून.आज तर ऑफिसमधून निघाल्याचाही मेसेज नाही की फोन नाही.काय करू काहीच सुचत नाहीये.ऑफिसला फोन करू का पण उगीच इशू होईल..मागच्यावेळी असच उशीर झाला म्हणून मी घाबरून किती फोन केले आणि अक्षयला निरोप मिळाला तर तो धावतपळतच घरी आला…

नको करतेच फोन जे व्हायचं ते होईल… पण नको उद्या त्यालाच उत्तर द्यावं लागेल परत सगळ्यांना.. मित्रांना फोन करावा का त्याच्या?? नको नको अजून थोडी वाट बघते पण सगळं ठीक असेल ना? काही वाईट तर नसेल घडलं ना??😢 अरे मी काय विचार करतेय..देवा मला माफ कर..सगळं नीट असू दे!!

इकडून तिकडे येरझाऱ्या मारत,सारखी घड्याळाच्या काट्याकडे बघत असलेल्या सुमित्राच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं..तिची सासू तिला समजावत होती की नको काळजी करू, येईल तो इतक्यात.. कुठे कामात किंवा ट्रॅफिक मध्ये अडकला असेल पण सुमित्रा काही ऐकायला तयार नव्हती..

सुमित्रा आणि अक्षय दोघे नोकरी करणारे..दोघांचा प्रेमविवाह.. अगदी साजेशी जोडी!! ती स्वभावाने तापट तर तो शांत, ती रोमँटिक पण तो थोडा लाजराबुजरा कमी व्यक्त होणार, ती बडबडी तो मितभाषी, ती खूप टेंशन घेणारी तर तो एकदम रिलॅक्स..म्हणतात ना ‘opposite attracts’😉😉 तसंच काहीसं यांचं झालेलं.. सुमित्रा खूप लहानसहान गोष्टींचं टेंशन घेत असे..त्यामागे तिची अक्षयसाठी काळजी आणि प्रेमही होतं पण कधीकधी तर ती हद्दच करत असे..

अक्षय तसा जबाबदार..तो तिला ऑफिस मधून निघाल्याचं नक्की कळवत असे पण आज त्याचा फोन बंद झाला होता. एव्हाना साडेनऊ वाजत आले होते आता सुमित्राच्या संयमाचा बांध फुटला तिने पटापट ऑफिस, अक्षयचे मित्र, सहकारी एवढंच काय तर त्याच्या बॉसलाही फोन लावले. त्यात तिला समजलं की अक्षय तर सात वाजेला ऑफिस मधून निघून गेलाय. आता तर सुमित्रा पूर्ण रडवेली झाली होती.. तिने तडक बॅग उचलली फोन घेतला आणि सासूबाईंना म्हणे मी जाऊन बघते..

सासूबाई आपल्या निवांत माळ जपत देवासमोर बसल्या होत्या.. सुमित्राला सांगत होत्या की उगीच काळजी करू नको, घाईघाईत तू आता गाडी चालवशील, डोकं शांत कर पण ऐकल ती सुमित्रा कशी?? ती चप्पल पायात सरकवातच होती तेवढयात अक्षय समोरून येताना दिसला तसा सुमित्राच्या जिवंत जीव आला.. त्याला बघताच सुमित्राने त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.. आईने दोघांचाआवाज ऐकला,देवाला नमस्कार करून बाहेर आल्या..

मग अक्षयने सांगितलं की रस्त्यात एक अपघात झाला होता, त्या जखमी लोकांना दवाखान्यात पोहोचवायला गेल्यामुळे त्याला उशीर झाला आणि त्या गडबडीत फोन पडल्यामुळे फुटला.. खूप प्रयत्न केला पण फोन काही चालू होईना.. धावपळीत घरी फोन करायलाही वेळ मिळाला नाही.घड्याळाकडे लक्ष गेलं तोवर नऊ वाजून गेले होते कसातरी धावतच घरी आलो..मला माहीत होतं तू चिंता करून सगळं घर डोक्यावर घेतलं असशील पण खरंच खूप गंभीर परिस्थिती होती तिथे..ज्या दाम्पत्याचा अपघात झाला त्यांची मुलं अगदी लहान आहेत,ते हॉस्पिटलचे काम त्यांना कसे जमणार म्हणून थांबलो मी. तू सगळीकडे फोन नाही केलेस ना??

सुमित्राने जीभ तिच्या दाताखाली चावूनच होकारार्थी मान डोलवली. अक्षयने डोक्यावर हात मारून घेतला. तो म्हणाला “आता आधी सगळ्यांना फोन करून कळवावे लागेल की मी सुखरूप घरी पोहोचलोय आणि आई तू जर समजावं ना ग हिला.. खूप टेंशन घेते ही.” आणि तो फोन करायला निघून गेला.

सासूबाईंनी सुमित्राला हात धरून बाजूला बसवले आणि म्हणाल्या ,” बेटा खूप चिंता करतेस तू.. मान्य आहे प्रेम आहे तुझं त्याच्यावर खूप पण इतकी चिंता करणं योग्य नाही”.

सुमित्रा: मी खूप प्रयत्न करते ओ आई पण मनात भलतेसलते विचार येतात आणि माझं कशातच मन लागत नाही. तुम्ही खूप रिलॅक्स आहेत मला जमतच नाही ते.. कसं तूम्ही एवढं निश्चिन्त राहू शकता मला तर खूप नवल वाटतं तुमचं..

सासूबाई: बेटा, मी ही आई आहे ग, काळजी मलाही वाटते पण स्वतःला शांत ठेवलं तरच डोकं काम करते ग..रिलॅक्स राहायचं म्हणशील तर माझ्या लहानपणीची गोष्ट सांगते.. माझी आई नेहमी म्हणायची देविमाता चोवीस तासात एकदा तथास्तु म्हणत असते आणि त्यावेळी आपण जे बोलत असतो , चिंतीत असतो ते खरं होतं.. मग आपण नेहमी सकारात्मक बोलावं, आणि विचारही सकारात्मक करावे..कोण जाणे आपल्या कोणत्या बोलण्यानंतर देवी तथास्तु म्हणेल..आधी मीही खूप ताण घ्यायचे..नको ते विचारही येतात मनात मनात… मन आहे ते स्वच्छंदी असणारच.. पण आधी भीतीपोटी मी सकारात्मक विचार करायचा प्रयत्न केला मग हळूहळू सकारात्मक विचार करायची सवय लागली आणि काही असा प्रसंग आला तरी मी शांत राहते आणि देवीची उपासना करत राहते..         ती कहाणी कितपत खरी आहे मला माहित नाही पण त्यामुळे मी सकारात्मक विचार करायला शिकले.. तुही प्रयत्न करुन बघ!!☺️

सुमित्राला सासूबाईंचे म्हणणे पटलं आणि इथून पुढे सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करण्याचं तिने त्यांना आश्वासन दिलं..

खरं आहे ना मित्रमैत्रिणींनो, सकारात्मक आचरण करण्यासाठी सुमित्राच्या सासूबाईंनी सांगीतलेली गोष्ट किती छोटी आहे पण किती बळ देणारी आहे.. नक्की या गोष्टींमुळे आपणही सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करूच शकतो..मी तरी करतेय तुम्हीही करून बघा.

लेख आवडल्यास लाइक आणि कंमेंट जरूर करा.

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा