गोष्ट तिच्या स्वप्नांची bhag 2

Written by

रविवार उजाडला…..  समीर आणि अबोलीला घरातील भेटीची अनामिक भीती वाटत होती…काय होईल आज?? आई आणि पप्पांना आवडेल का तो? असं विचार करत ती तयार होत होती.
दारावरची बेल वाजली. अबोलीने पटकन जाऊन दरवाजा उघडला.समोर समीर होता… एकदम नीट नेटका तयार होऊन आला होता. त्याने अबोलीच्या आई वडिलांना नमस्कार केला आणि हॉलमधील सोफ्यावर बसला.
समोरच अबोलीचे आई आणि पप्पा बसले होते.अबोलीने पिण्यासाठी पाणी आणले…. समीर ते गटागटा प्याला… काय बोलतील याची त्याला भीती आणि उत्सुकता होती.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अबोलीचे पप्पा बोलायला लागले. तू म्हणे आमच्या राजकन्येवर प्रेम करतोस?
समीरने होकारार्थी मान डोलावली.
देसलेला हे माहिती आहे का?
समीरने पुन्हा नकारार्थी मान डोलावली.
बरं आता पुढे काय करणार? अबोलीचे तर आताच बारावी झालेय….
समीर :काका आता आम्ही दोघेही खूप अभ्यास करणार…. शिक्षण पूर्ण होऊन सेटल झालो की लग्नाचा विचार करू तशी माझी बऱ्यापैकी तयारी झाली आहे दोन वर्षात मी सेटल होईल आणि तीन वर्षात अबोलीचे graduation पूर्ण होईल…..आणि मला अबोलीचे सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तेही तिच्या सोबत.
स्वप्न कुठले स्वप्न? असा अबोलीच्या पप्पानी समीर ला प्रश्न केला.
समीर ने अबोलीच्या स्वप्नाविषयी सांगितले.
अबोलीच्या पप्पाना अबोलीचा अभिमान तर होताच पण ती आपला विचार करते हे कळाल्यावर त्यांना खूप गलबलून आलं.
अबोलीचे पप्पा एकदम फिदा झाले समीरच्या उत्तरावर. आणि म्हणाले देसलेला तू सांगतो की मी सांगू?

समीर :थोडासा confuse होऊन… मी सांगतो काका आजच बोलतो पप्पांशी. पण तुमचा आमच्या या नात्याला होकार आहे ना?

अबोलीचे पप्पा :हो….. पण कुठल्याही प्रकारचा विश्वासघात तुमच्याकडून होऊ देऊ नका… अशी जवळ जवळ प्रेमाने तंबीच दिली.
समीरने त्याच रात्री त्याच्या पप्पाना सगळे काही सांगितले. अबोलीचं कौतुक त्यांना होतंच आणि आता सख्खा मित्र त्यांचा व्याही होणार होता… ते ही खूप खूष झाले.
दिवसामागून दिवस गेले… समीरला CA परीक्षेमध्ये सुवर्ण पदक मिळाले.. तो CA झाला आणि त्याचे स्वतःचे ऑफिस उघडले. तर अबोलीने नुकतेच बीकॉम पूर्ण केले होते.तिला बँकेत नौकरी करायची होती त्यासाठी ती अभ्यास करत होती.
मनाप्रमाणे सगळे काही घडत होते.ठरल्या प्रमाणे दोघांचे लग्न थाटामाटात आणि निर्विघ्नपने पार पडले. तिच्या स्वप्नातील राजकुमार आता तिचा झाला होता.
आता खऱ्या अर्थाने अबोलीच्या स्वप्नांचा प्रवास सुरु झाला होता. आणि तिचे पहिले स्वप्न पूर्ण झाले होते.आता तिला नौकरी लागली होती त्यातून ती स्वतःचा खर्च काढून बाकी पगार आईला देत असे.दर दोन ते तीन दिवसांना घरी जाऊन त्यांची विचारपूस करत असे. सुरुवातीला समीरच्या आईला या गोष्टी पटल्या नाही. पण अबोली तितकीच आत्मीयतेने त्यांचीही काळजी घ्यायची.तिने कधी कुठल्याही कामात कसूर केला नाही.
अबोली आणि समीरचा संसार आता सुखाचा चालला होता. असं जवळ जवळ वर्षभर चाललं… आता मात्र घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की अबोलीला एक मूल व्हावं…. अबोलीला देखील मनापासून वाटायचं की आपल्याला एक मूल व्हावं पण तिला दिवस राहतंच नव्हते…. आणि येता जाता कुणीही नातेवाईक तिला छेडायचे… any good news? आणि तिने नाही म्हटलं की तिला नानाविध सल्ले द्यायचे.
अबोलीने आता डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला सुरु केली. वंध्यत्व निवारण केंद्रामध्ये तिने आपले नाव नोंदवले. तिथे दोघांच्याही विविध चाचण्या झाल्या.दोघांचेही रिपोर्ट्स तसे 75%नॉर्मल होते. बाकी 25%साठी त्यांना नियमित ट्रीटमेंट घ्यावी लागणार होती. दोघांनी नियमित ट्रीटमेंट घ्यायला सुरु केली. जवळ जवळ दोन वर्ष त्यानी वंध्यत्व निवारण तज्ञाकडे चकरा मारल्या. पण शेवटी यश आले नाही. या गोष्टीचा अबोलीच्या मनावर परिणाम व्हायला लागला होता.

लोकांनी any good news हा प्रश्न विचारायचं सोडून आता अबोली वांझ आहे आणि समीरचे दुसरे लग्न करा असं समीरच्या घरच्यांना सुचवायला सुरु केलं होतं.

नातेवाईकांच्या अश्या बोलण्याला अबोली आणि तिच्या घरचे कंटाळले होते.नातेवाईक आले की समीर घरातून बाहेर जात असे.घरामध्ये आता हसते खेळते वातावरण नव्हते….. होते ते तणावपूर्ण वातावरण.समीर च्या आई वर हॅमरिंग इफेक्ट झाला होता.त्यामुळे तिने तर समीर अबोलीच्या नकळत वधू संशोधन सुरु ही केले होते.

समीर आणि अबोली खूप डिस्टर्ब झालेले दिसत होते. त्या दोघांचे मन कुठेही लागत नव्हते.समीरला त्याची आई पुन्हा लग्नासाठी तगादा लावत होती.त्याला सारखं म्हणायची आपल्याला वारस हवा ना.

समीरला हे काही पटत नव्हतं… तो सतत तणावाखाली असायचा.
अबोली तर त्याला एकदा म्हणाली देखील… करून टाक एकदाचे दुसरे लग्न…. मग समीर म्हणाला अगं कुणी काही म्हणालं तरी 25% दोष माझ्यातही आहे ना.होईल सर्व ठीक…. खरं तर समीर मनातून हताश व्हायचा…. पण अबोली समोर तसे दाखवत नसे.
अबोली हळू हळू अबोल बनायला लागली होती.कुणातही मिसळत नसे. नियमित आईवडिलांना भेटणारी अबोली आता क्वचितच भेटायला लागली.नौकरीच्या ठिकाणी कामाव्यतिरिक्त ती काहीच बोलत नव्हती…. पूर्णपणे डिप्रेशन मध्ये चालली होती.
अबोली ऑफिस सुटल्यावर एका ऑटोरिक्षा मध्ये घरी जायला निघाली कारण बससाठी तिला थांबावे वाटले नाही….. ऑटो वाल्याने गाणे लावले….. गाणं लागलं… हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया. जिसने तुझको जनम दिया के जिसने तुझको पाला.
गाणं ऐकून एकदम अबोलीचे डोळे चमकले. आपण असा विचार आधी का नाही केला? … आजच समीरशी बोलू… तिने ऑटोतूनच समीरला फोन लावला. कुठे आहेस तू?

समीर :निघत आहे ऑफिसमधून थोडया वेळात पोहोचेल.

अबोली आता बेचैन झाली होती. समीरला कधी भेटू आणि कधी सांगू असे झाले होते.

समीर घरी आला…. आज खूप दिवसांनी अबोलीने समीरचे हसून स्वागत केले. समीरला अबोलीमध्ये सकारात्मक बदल जाणवला.
समीर फ्रेश झाल्यावर अबोलीने विषय छेडला….. आपण एक मूल दत्तक घेऊया का?
समीर ने थोडासा विचार केला माझी हरकत नाही पण आई बाबा चा विचार घ्यायला हवा मी बोलतो आई बाबाशी.
समीरने त्याचे आईबाबा हॉल मध्ये बसलेले असताना मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव त्याने त्यांच्या जवळ मांडला.
हे ऐकून जवळ जवळ समीरची आई खूप चिडली.. म्हणाली कसं शक्य आहे त्या परक्या मुलाची जात माहिती नसणार आणि कुळ माहिती नसणार असं मूल आपल्या घरात येणार…. मला ते बिलकुल चालणार नाही.
पण आई मी आणि अबोली पण वेगळ्या जातीचे ना लग्नाच्या वेळेस तू ना जात बघितली ना कुळ… असं समीर म्हणाला.
त्यावर त्याची आई म्हणाली अरे तिच्यावर संस्कार चांगले झालेले होते.
आता समीरला काय बोलावे हे सुचेनासे झाले…. ठीक आहे आई झोपायला जातो मी असे म्हणत समीर बेडरूमकडे वळाला. अबोलीचा रडवेला चेहरा पाहून त्याने ओळखून घेतले की तिने त्याचे आणि आईचे बोलने ऐकले होते.
काय करावे समीर एकदम हतबल झाला होता.कारण मूल दत्तक घेणे हे त्यालाही पटलेले होते.
दुसरा दिवस उजाडला समीर आणि अबोली रात्रभर एकेकटे विचार करत होते म्हणून दोघांनाही अगदीच पहाटे झोप लागली. थोडया वेळाने समीर उठला पण अबोली मात्र उठली नाही. तिला उठावेच वाटत नव्हते…. जणू काही तिच्या जगण्याची उमेद संपली होती….. आता अबोलीला जगावेसे वाटत नव्हते. ती होती नव्हती तेव्हडी डिप्रेशनमध्ये गेली होती.
पहिल्या दिवशी समीरला वाटले कामाचा कंटाळा आला असेल…. म्हणून ती उठली नसेल…. पण आता हे रोजचेच झाले होते. अबोली पूर्ण आजारी असल्यासारखी दिसत होती. तिला कसलाच उत्साह राहीला नव्हता.सगळ्या तज्ञ डॉक्टरांना दाखवून झाले….. रिपोर्ट्स नेहमीच नॉर्मल येत.

शेवटी समीरने अबोलीला मानसोपचार तज्ञाकडे नेले.तिथे मानसोपचारतज्ञाने देखील मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला. आता समीर ने त्याच्या आईला ठणकावून सांगितले…. एक तर मी दुसरे लग्न करणार नाही आणि आम्हाला दोघांनाही मूल दत्तक घ्यायचं आहे… अबोलीचे झालेले हाल पाहून आणि समीरचे रौद्र रूप पाहून समीरच्या आईने मूल दत्तक घेण्यासाठी होकार दिला…. बाबा आधीही विरोधात नव्हते पण त्याच्या आईने काही बोलूच दिले नव्हते.

मग समीर आणि अबोली पुढील procedure करण्यासाठी एका अनाथ आश्रमात गेले. दोघेही ऑफिस मध्ये बसले असता काही मुलांचा घोळका तिथून जात होता. अबोली त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्याशी बोलायला लागली दहा मिनिटातच तेथील मुले तिला ताई, ताई करायला लागले.
इकडे समीर ने अर्ज करण्यासाठी माहिती काढली……..  तेव्हा कळाले अर्ज ऑनलाईन करावा लागतो आणि तो केल्यावर मूल मिळण्यासाठी वर्ष दीड वर्ष लागू शकते कारण आता मूल दत्तक घेण्याची संख्या वाढली आहे.

अबोली मुलांना भेटून एकदम फ्रेश झाली होती. जणू काही तिला कुठलाच मानसिक आजारही झाला नव्हता.
अबोलीने ठरवले आपलं मूल घरी येईपर्यंत आपण आठवड्यातून एकदा तरी इथे यायचं…. खरं तर ती ट्रीटमेंट होती अबोलीच्या मानसिक आजारावर…
मुलांना नेहमी नेहमी भेटून अबोलीने पुन्हा विचार केला आपण अनाथ आश्रम काढले तर आपल्याला किती तरी मुले भेटतील…. आई बाबा मान्यता देतील का? अबोलीने हा विषय समीर समोरही मांडला.
समीर :त्यांना अभिमान वाटेल….. पण अगं पण त्यासाठी जागा लागेल ना
अबोली :आई पप्पा कडे बाजूलाच दोन पडीक रूम आहेत तिथे डागडुजी करून सुरु करू….. तू कृपा करून या आश्रमातून कागदपत्रांची पूर्तता कशी करायची ते बघ ना.
लवकरच दोघांनी मिळून आई नावाचा अनाथ आश्रम सुरु केला आता ती एक नाही तब्बल बारा मुलांची आई झाली होती आणि तिचे तिसरे स्वप्नही(समाजासाठी काहीतरी करण्याचे ) दोघांनी मिळून पूर्ण केले.

कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा.
©®डॉ.सुजाता कुटे

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा