गोष्ट…प्रत्येक लग्नाची आणि लग्नघराची…

Written by

प्रत्येक मराठी माणसाच्या जीवनातला एक अविभाज्य घटक म्हणजे लग्न. कदाचित जीवनातला एक चतुर्थांश भाग या लग्नकार्यातच जात असेल असं म्हणायला हरकत नाही.मधमाशीने फुलाभोवती पिंगा घालावा तशी काही माणसं तरुण तरुणींच्या आई वडीलांभोवती पिंगा घालत असतात. लग्न किती गरजेचं आहे, वयात केलं नाही तर कशी वेळ येते, या संदर्भासहित स्पष्टीकरणाचा गृहपाठ ते करूनच आलेले असतात. जणू ब्रह्मदेव काही काळ रजेवर गेल्याने स्वर्गात बांधायच्या लग्नगाठीचे कॉन्ट्रॅक्ट या माणसांवर सोपवले की काय असे वाटू लागते. 100 जिबी च्या मेमरी कार्ड ला मागे टाकावं अशी यांची मेमरी उत्तम असते, शाळेतल्या प्रश्नपत्रिकेतील “जोड्या लावा, जोड्या जुळवा” हा प्रश्न प्रचंड आवडणारी आणि त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवणारी ही माणसं…  अमुक एका घरातली मुलगी तमुक एका मुलांसाठी योग्य…एखाद्या रडक्या मुलाला कडेवर सोबत घेऊनच फिरावं तसं त्या मुलांचा बायोडाटा ही लोकं अपल्यासोबतच मिरवत असतात.

नंतर मग लग्न ठरतं… चौथ्या महायुद्धात समेट घडवून आणून आम्ही ते थांबवलं अश्या विजयी जोशाप्रमाणे “आम्ही जमवलं” म्हणून ही लोकं सातव्या आसमान वर असतात.

मग एखाद्या व्हायरस सारखी ही बातमी पसरत जाते…मुला मुलीचा आणि त्यांच्या खानदानाचा प्रत्येक घरी पंचनामा केला जातो. घरातली तरणी पोरं फेसबुक वर त्यांचे तपशील पाहून घेतात, घरातलं शेमडं पोरसुद्धा “नाय शोभत”…असं न्यायाधीशासारखा कौल देत आपलं नाक सुस्कारा टाकल्यासारखं पुसतं.

मुला मुलींच्या नंबरांची देवाण घेवाण होते…फायनल झाल्या शिवाय नम्बर द्यायचे नाही असा नियम…मग पोरं पोरी कुठल्यातरी कोपऱ्यात घुसून गुलू गुलू बोलतात, 2 तास, 3 तास, 4 तास…. असं वाटतं की यांचा विडिओ काढून ठेवावा आणि ज्या वेळी एकमेकांचं तोंड पहायचीही इच्छा नसते अश्या 5 वर्षांनी यांना परत दाखवावा…भलं मोठं मंडप बांधून पंगतीच्या पंगती उठवतात ते फक्त यासाठी की लोकांना ओरडून सांगायचं की या “दोघांचं लग्न झालय, त्यामुळे बाहेर हिंडतांना दिसले तर तर त्याची कायदेशीर प्रक्रिया इथे येऊन स्वतःच्या डोळ्यांनी पहा..” मुळात लग्न व्हाट्सअप्प वर कधीच पार पडलेलं असतं.

मग लग्न घरात उगवतात लग्नात phd केलेल्या आत्या, माम्या आणि मावश्या…शिऱ्यावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय त्याचा प्रसाद बनुच शकत नाही तसा आपल्याशिवाय लग्न उरकूच शकत नाही या भावनेने अलगद टपकतात… तिकडे मुलीच्या आईची लगबग सुरू होते, देण्या घेण्याच्या साड्या घेतल्या जातात. अमुक एकाने मला लग्नात अशी साडी नेसवली, 100 रुपयाचं फडकं नुसतं…अशी भूतकाळाची पाने उघडून पाहिली जातात. बऱ्याच खानदानांचा उद्धार केला जातो, विशेषतः आत्या आणि जावा जावांच्या.. मामी आणि मावशींच्या देण्यावर गरिबीची आणि मोठ्या मनाची झालर पांघरवली जाते.

ताट, वाट्या, उपरणं, सुपारी, पाट, चौरंग अश्या सामानामुळे घरात जागा उरत नाही. मुलीच्या पार्लर वाऱ्या सुरू होतात, लग्न असल्यामुळे आता आपण स्वतःचं एकदम कायापालट करून मिस युनिव्हर्स च्या रांगेत बसावं म्हणून सगळ्या प्रकारचे फेशियल, बॉडी स्क्रब, बॉडी शाईन, पेडिक्युर, मेनिक्युयर, हेअर स्पा…कधीही न ऐकलेली प्रक्रियाही निमूटपणे करायला पोरगी तयार होते.  तिकडे मुलगा मात्र फक्त 5 रुपये जास्त किमतीचं शेविंग क्रीम आणून फावडं तेवढं फिरवत असतो.  लग्न घरात ज्येष्ठ मंडळी पटकन आपली झोपायची जागा बुक करून टाकतात, घरातल्या माणसांना मग शेजारी पाजारी “कुणी घर देतं का घरं” असं म्हणत फिरावं लागतं.  केसांना खोबरेल तेल थापून भांग पाडलेली म्हातारीही मेहेंदी काढायला सगळ्यात पुढे येऊन बसते, एव्हाना सगळ्या महाताऱ्यांनी आपले केस काळे केलेले असतात, हातावर तेवढी बाकी असते…समोरचा माणूसही ओळखू येणार नाही अश्या दृष्टिहीन झालेल्या म्हातारीला मेहेंदी ची डीसाईन कुठे चुकतेय, कुठे कमी दिसतेय, कुठे फुल लहान काढले, कुठे बोटांवर कमी झाली हे कसं लक्षात येतं कळत नाही… हळदीचा दिवस तळीरामांसाठी एक उत्सव असतो. तर्रर्र होऊन नाचणाऱ्या मंडळींकडे पाहून हसावं की रडावं कळत नाही. त्या अवस्थेत तो एखाद्या कोपऱ्यात स्वतःसोबतच नाचत बसतो तर कधी नागीण बनून आता कोणालाही डसेल इतक्या जोशात फणा काढत असतो.  हळद अंगाला सोडून सर्वत्र लावली जाते, फोटो पुरता हळदीचे हात साडीवरून फिरवून वर न्यायचे आणि हात तोंडाजवळ जाताच अधाशासारखे कॅमेऱ्याकडे पहायचे यासाठी हा खटाटोप.  लग्नाचा दिवस उजाडतो, लग्नाच्या टेंशन ने नवरा नवरी रात्रभर झोपलेली नसतात. लग्न घरात अंघोळीसाठी नंबर लागतात, एकच धावपळ, एकच धांदल…नवरी आपल्या मैत्रिणीसोबत पार्लर मध्ये आरामशीर तयार होत असते. इकडे लग्न घरात एकमेकांची लिपस्टिक, नेलपेंट, कंगवा, रबर, पिन, टाचण्या यांची आदला बदल सुरू होते… मुलीची आई टेन्शन मध्ये तयार व्हायचं विसरते मग दोन तरण्या पोरी बळेच बसवून मेकअप करून देतात. आपल्याकडे देशाचं गृहखाते सांभाळायला दिले या तोऱ्यात आहेर टिपणाऱ्याचा एक वेगळाच थाट असतो. मुळात बऱ्यापैकी शिक्षण झालेल्या आणि लग्नात काहीही कामाचा नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडे ही जबाबदारी दिली जाते.  स्टेज वर नवरा नवरी एकदम सेलिब्रिटी बनलेले असतात. पण त्यांनी त्या दिवसापूरत आपलं तन मन धन लोकांवर सोपवलेलं असतं… त्यांना म्हटलं बसा की बसायचं, त्यांना म्हटलं उठा की उठायचं, पाणी सोडा…फुल घ्या…परत ओता.. आता उठा…आता म्हणा….एवढंच त्यांचं लग्नाच्या दिवशी काम…बाकी त्यांची काहीही गरज नसते… मुला मुलीमागे उभं राहायला तरण्यांची चढाओढ चालते… मैत्रिणी आपण नवरीच्या जवळचे आहोत आणि उगाच फोकस मध्ये यावं म्हणून विनाकारण नवरीचा गजरा सरळ कर, हाराला बळेच हात लाव, घाम नसतांना रुमाल लावून कपाळ टीप…असले उद्योग करत असतात…. मुलीच्या बहिणी आणि मुलाचे भाऊ…आपल्यातही एखादं “हम आपके है कौन..” घडतं का याचा अंदाज घेत असतात.  “आम्ही लग्नात हजर होतो” ही गोष्ट पुराव्यानिशी सादर करण्यासाठी स्टेज वर फोटो काढायला रांग लागते.. तिकडे जेवणाच्या पंगतीत फक्त जेवणासाठी आलेली मंडळी पहिल्या पंगतीतच बसतात…आणि लग्न कोणाचे आहे, आपलं नातं काय..अशी किरकोळ माहितीही न घेता ढेकर देत पसार होतात….गर्दी झाली की खुर्ची मागे उभं राहून आपली सीट बुक केली जाते… जेवण संपतं की काय असा धाक सगक्यांना….मुळात 90% लोकं ही फक्त जेवणासाठी आलेली असतात…बाकी 10% ते केवळ घरातली माणसं…. जेवणं उरकतात, आता बिदाई करून लवकर मोकळं करा असं 8 दिवस आधी येऊन थांबलेल्या नातेवाईकांचं म्हणणं पडतं… मग सुस्तावलेली आणि दमलेली ही माणसं कोपऱ्यात बसून एक वामकुक्षी घेत असतात… बिदाई होते, लग्नाच्या खुशीत उडणारी नवरी धाय मोकलून रडायला लागते…आईची मिठी सोडत नाही…

“असलं बोंबलायचंच असतं मग लग्न कशाला करावं” या मताची मी (माझ्या लग्नात रडले नव्हते मी) तिथून पुढे सुरू होते संसाराची गंमत… ही गोष्ट प्रत्येक लग्नघरची…प्रत्येक लग्नाची…

तुमच्याही डोळ्यासमोर आला ना हा लग्नसोहळा???

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा