गौराईच माहेरपण

Written by

©सरिता सावंत
गौरी आज खूप दिवसांनी माहेरी आलेली. मुलाची शाळा,सासू सासरे,नवरा, तीन नंदांचं माहेरपण यातून कशीतरी तिला सुट्टी मिळाली आणि आली आईकडे. लग्नांनंतर सात वर्षांनी पहिल्यांदा गणपती आणि गौरीच्या सणाला तिला माहेरी यायला मिळालेलं. मायलेकींचा आनंद गगनात मावेनासा होताच. तिची मावशीही चार दिवस यावेळी आलेली. नन्दबाई येणार म्हणून गौरीच्या भावजयीने ऑफिस मधून चार दिवस सुट्टीचा घेतलेली.
गौरीची आई लेकीला काय हवं नको ते सारख बघायची.
सकाळ संध्याकाळ तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत होती.
पुरणपोळ्यांचा बेत होता आज. पण गौरीला मस्त आराम होता. गौरीची आई मावशीला सांगत होती,”अग गौरीला इथे येईल तेव्हाच आराम मिळतो. नाहीतर सासरी घाण्याला जुंपलेली असते नेहमी. जरा म्हणून तिला आराम नसतो. तीन तीन नंदा आहेत. एकवार एक प्रत्येकीच येण जण चालूच असत. त्यांची पोर असतात. नंदा आल्या की कोणत्या कामाला हात लावणार नाहीत. हिने जेवण करायचं सगळ्यांच आणि सासू आयत केलेलं ताट पण लेकींना हातात नेऊन देते.
माझ्या लेकीचा विचार करावा म्हणते मी थोडातरी. तिचाही जीव आहे, थकत असेल ती सगळ्यांचा पाहुणचार करता करता. म्हणून यावेळी मी मुद्दामच हिला बोलवून घेतलं चार दिवस. जाईल इथून आराम करून जरा”
मावशी थोडं हसतच म्हणाल्या, “तू गौरीची आई म्हणून काळजी करतेस ते कळलं पण हीच काळजी तिची सासू तिच्या लेकींसाठी करते. तिच्या लेकींनाही सासरी राब राब राबाव लागत असेल,त्यांना त्यांच्या सासरच्या माणसांचा पाहुणचार करावा लागत असेल म्हणून माहेरी आल्या की हक्काने आराम करत असतील. प्रत्येक सासुरवाशिणीच असच असत ग.
सासर कितीही चांगलं असलं तरी तिला तिच्या जबाबदाऱ्या शांत पडू देत नाहीत. आजारी असो,काही दुखत खुपत असो पण तिला उभं राहावंच लागत. तिच घर,तिची माणस तिच्यावर विसंबून आहेत हे तिला चांगलं माहीत असत म्हणून तिला आराम करायला सांगितला तरी ती करू शकत नाही. तुझं माझंच घे,आपणही थकलो की संसार सांभाळता सांभाळता. नंदांचं माहेरपण जपता जपता. पण ते माहेरपण जपण्यात वेगळा आनंद असतो. माहीत असत माहेरवाशीण आहे, तिच्या विसाव्याच हक्काच स्थान म्हणजे माहेरचं. म्हणून तिला हवं ते,आवडेल ते खाऊ पिऊ घालतो. साडी आवडती घेतो. लाड, कौतुक पोट भरून करतो आणि सुखाने नांदायला सासरी पाठवतो.
प्रत्येक गौराईची हीच कथा आहे आणि प्रत्येक गौराईच्या आईची अवस्था तुझ्यासारखी आहे. त्यात त्या सासुचाही दोष नसतो ना त्या नंदांचा. त्या तर माहेरी चार क्षण सुखाचे अनुभवायला आलेल्या असतात. पुन्हा एकदा माहेरपण जगायला आलेल्या असतात.जगू द्यावं त्यांचं त्यांना. गौरीच माहेरपण जपायला तुझ्या सुनेने घेतली ना सुट्टी ऑफिस मधून. तिलाही कळत ग नंदेचं माहेरपण सुखात जावं आणि ते आपणच करू शकतो. आई म्हणून तुझी व्यथा समजू शकते मी पण आपणच नाण्याची दुसरी बाजूही बघावी नात्यात कटुता आणि गैरसमज शिरकाव करणार न्हाईत आणि कोणत्याच गौराईला सासू,नंद वाईट वाटणार नाही. सगळ्याच जणी आपआपल्या गौराईच माहेरपण आनंदाने जपतील”.
गौरीच्या आईलाही मावशीचा म्हणणं पटलं आणि तिने लगेच सुनेला आदेश दिला की तुही उद्या तुझ्या माहेरी जायचं,तुझ माहेरपण जगायला?.

प्रत्येक माहेरवाशिणीसाठी जन्मलेल्या या ओळी :-

 • माहेर जस की स्वर्गच जणू
  मायेने कुरवळलेला हात तिथे आहे
  जीवापाड असणाऱ्या प्रेमाचा स्पर्श तिथे आहे
  लाडात पडलेला धपाटा तिथे आहे
  दुडू दुडू पडलेली पाऊले तिथे आहेत
  बाबासवे बोललेली बडबडगीते तिथे आहेत
  मी आणि माझचं करणारा हट्ट तिथे आहे
  तू मी तू मी करणारा भाऊ तिथे आहे
  कधी रूसणारी कधी हसणारी बहीण तिथे आहे
  सुखात दुःखात साथ देणारी मैत्रीण तिथे आहे
  तिथे आहे प्रेम,जिव्हाळा
  सख्यांच्या प्रीतीचा लळा
  तिथे आहेत कडू गोड आठवणी
  तिथे आहे साठवणीतली गाणी
  तिथे आहे अल्लडपण
  तिथे आहे उमगलेले शहाणपण
  तिथे आहे नाळेचं नात
  तिथे आहे अस्तित्व अजूनही माझं
  माहेर जस की स्वर्गच जणू

  लेख लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही.
  ©सरिता सावंत

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा