घरबसल्या कमवा ५०,०००/- (🙏😠😠😠येडा समझा है क्या)

Written by

फेसबुक वर सध्या एका गोष्टीने थैमान घातले आहे…

“काहीही न करता मिळवा 5०००० ते 1 लाख…घरबसल्या कमवा लाखो….”

“तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे? आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत?? मग दिवसातला फक्त 1 तास देऊन मिळवा महिना लाखो रुपये…”

खूप वेळा या पोस्ट जेव्हा वाचल्या तेव्हा खरोखर संताप झाला माझा…

लोकं रिकामी आहेत तुम्हाला घरबसल्या पैसे द्यायला?? काहीही न करता पैसे मिळाले असते तर कशाला लोकांनी 8-8 तास नोकरीवर घालवले असते??

विशेष म्हणजे अश्या पोस्ट वर 300 हुन अधिक महिलांनी आपले नम्बर कंमेंट केलेले, डिटेल्स द्या डिटेल्स द्या म्हणून तगादा लावलेला…

दिबसभर मोबाईल वर टाईमपास करणाऱ्या महिला हे असलं काही वाचून स्वप्न रंगवायला लागतात, भुरळ पडते त्यांना…

आणि एकदा तर “आपल्या नवऱ्याहून जास्त कमवा” अशा एका पोस्ट वर तर असा काही महिलावर्ग तुटून पडलेला की विचारू नका..

माझ्या लक्षात आले की हा चेन मार्केटिंग चा प्रकार आहे…

म्हणजे कंपनी काय करते, की अमुक काही मुलींना त्यांचे प्रोडक्ट विकायला सांगते, त्यांनी किती लोकांना विकले आणि अजून किती महिलांना ह्या बिझनेस मध्ये add केले यावर त्यांचे कमिशन अवलंबून असते…मग प्रत्येक महिला अधिकाधिक महिलांना हा बिझनेस करायला सांगते, या ना त्या प्रकारे या महिला फेसबुक वर, व्हाट्सअप्प वर अश्या लालूच दाखवणाऱ्या पोस्ट टाकून महिला गोळा करायचं काम करतात…

काही ठिकाणी रिसेलिंग च काम चालतं… एक विशिष्ट कमिशन त्यांना ठरवून दिलेलं असतं…

मूळात यात वाईट काहीच नाही…ज्यांना मार्केटिंग स्किल आहे त्यांना हे करायला काहीही हरकत नाही..

ज्यांनी हे करून चांगली कमाई केली आहे त्यांचे स्वागतच आहे…

पण ह्या गोष्टी करतात कोण??

भरमसाठ पैशांची अपेक्षा ठेवलेल्या, अवाजवी स्वप्न रंगावणाऱ्या आणि आपल्या नवऱ्याच्या कमाईवर समाधानी नसलेल्या महिला..

ज्यांना अगदी शॉर्टकट ने, आरामात बसून आणि दे रे हरी खाटल्यावरी असा पैसा पाहिजे त्यांना..

अश्या महिला कारण नसताना बळी पडतात…

माझी शाळेतली एक मैत्रीण, तसं तर मैत्रीण नाहीच…ओळख फक्त…अचानक एक दिवस तिचा मेसेज आला, विचारपूस करू लागली, अगदी गोड गोड बोलू लागली…मला कळेना हे काय चाललंय…एक दिवस मला म्हणे तुला भेटायचं आहे…मला काहीच कळेना..शाळेतही कधी बोललो नाही मग आता या वयात काय बोलायचं असेल तिला??

आम्ही भेटलो, गप्पा झाल्या…बरं वाटलं…मग हळूच तिने बॅगेतून तिचे प्रोडक्टस काढले…हे बघ, माझ्याकडे हे आहे विकायला…याचा इफेक्ट खूप छान आहे, मी डिस्काउंट ने देते वगैरे बोलली…मला कळेना काय बोलावं… एक तर किंमत जास्त होती…त्यात चेहऱ्याला पावडरही न लावणारी मी काय करणार ते घेउन?? बरं तिला नाही म्हणायला गेली असती तर तिला वाईट वाटलं असतं….पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्व देतो आपण मराठी माणसं…

शेवटी “मिस्टरांना विचारून सांगते” असं म्हणत वेळ मारून नेली मी…

अर्थात आजवर कोणती गोष्ट मी मिस्टरांना विचारून केलीये…माझं मलाच हसू आलं…

नंतर असंच एकदा माझ्या एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून एका कार्यक्रमात गेलेले..व्याख्यान आहे असं खोटं सांगून त्यांनी पब्लिक जमा केली…त्यांनी काही प्रोडक्ट विकायला आणलेले…त्यांनी इतकं पटवून दिलं की तुम्ही हे घेतलं नाही तर फार कमी दिवस जगाल… सोबत त्यांनी काही महिला आणलेल्या…मेकअप करून आणि सूट बुटात त्या होत्या…त्यांचं वय 40 च्या पुढें होतं… अर्थात मेकअप आणि पोशाखामुळे ते दिसतही नव्हतं…पण आलेल्या महिलांना भुरळ पडली…की इतकं वय असूनही यांच्या चेहऱ्यावर ते दिसत नाही….सुंदर दिसू पाहणाऱ्या महिलांनी नवऱ्या जवळ हट्ट करून करून ते विकत घेतले..3 ते 4000 ला…काटकसरी स्त्रियांना ते आपल्या सौंदर्या पुढे काहीच वाटले नाही…पुढे त्याचा इफेक्ट काय आणि किती झाला हे त्यांचे त्यांनाच ठाऊक…

एकदा एका जॉब पोर्टल वरून मला कॉल आलेला…इंटरव्ह्यू आहे असं सांगितलं…तिकडे गेल्यावर एका कॉन्फरस रुम मध्ये काही माणसं जमा दिसली आणि एक माणूस प्रेझेन्टेशन देत होता…सारखं सारखं महिना 50000 मिळतील असं म्हणत होता…थोडक्यात मार्केटिंग करा, लोकं जमा करा आणि कमिशम मिळवा असा त्यांचा हेतू होता…मी ताडकन उठले आणि म्हटलं मला दुसरा इंटरव्ह्यू आहे मला निघायचं आहे…प्रेझेन्टेशन देणारा म्हटला की कशाला देताय इंटरव्ह्यू, हे काम करा की…त्यांना हात जोडून मी रागारागात तिथून सटकले…माझा वेळ आणि प्रवास फुकट गेला होता…

तुम्हाला जर विश्वास आहे की तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे तर मग दुसरे पर्याय निवडा ना…लोकं स्वतःहून तुमच्या जवळ येतील…हे काय…”4 लोकं जमा करा आणि कमिशम मिळवा”

आपल्याला साधा क्रेडिट कार्ड चा, मोबाईल स्कीम सांगणाऱ्याचा कॉल आला तरी आपलं डोकं फिरतं… मग हा प्रकार सुद्धा त्याच वर्गवारीत मोडतो.

एक तर शंभरातला एखादा माणूस या गोष्टीला भुलतो… त्या एका माणसापासून किती कमिशन मिळवणार आहात??

लोकं रिकामी नाहीत आणि असल्या गोष्टींनी भुलतही नाहीत, कशाला कोणाच्या सांगण्यावरून ती जोडली जातील?

या चेन मार्केटिंग ला भुललेली एखादी महिला हिशोब करते, एकाला विकलं तर 200 रुपये कमिशन आहे, मग 100 लोकांना विकलं तर 20,000…वा वा वा…मी 200 लोकांना विकून दाखवते… मग याला पकड त्याला पकड, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी पाजारी…सगळे शिकार होतात…महिलेला ते 20000 दिसतात पण समोरच्याला इंटरेस्ट नाही, तो आपल्याला टाळतोय हे सगळं त्या 20000 ची पट्टी बांधलेल्या महिलेला दिसत नाही…

नकळत आपण समोरच्या व्यक्तीला पेचात पाडत असतो, नाही म्हणणे समोरच्याला जड जाऊ शकते, त्यातच जर समजा नाही म्हटले तर आपणही निराश होतो हे त्या महिलेला पैशांच्या हव्यासापुढे कळत नाही…

मग फार कमी लोकं विकत घेतात, मुश्किलीने 1-2 हजार मिळतात…मग वाटायला लागतं की आपण फसले गेलो आहोत…पण तोवर लोकं आपल्याला टाळायला लागली असतात आणि मग समाजात वावरणं थोडं कठीण बनतं…

पैसा हवा, पण म्हणून बिझनेस माइंडेड लोकांच्या आमिषाला बळी पडायचं??

असंच एका शेजारच्या महिलेने एक स्कीम आणली…महिना 1500 भरा आणि 3 वर्षांनी 1 लाख मिळवा..त्यात तिला भरघोस कमिशन मिळणार होतं…

लोकांच्या मागे लागून लागून आणि “पैसे बुडाले तर मी स्वतः तुम्हाला भरून देईल” इतका विश्वास देऊन तिने लोकांकडून पैसे जमा केले..कंपनीने असाच खोटा विश्वास देऊन तिला भुलवले होते…तिच्या वर अजून बऱ्याच महिला जोडल्या गेल्या होत्या..

3 वर्षांनी त्या कंपनीचा मालक पैसे घेऊन फरार झाला..आता लोकांनी त्या महिलेला पकडलं…काहीही करून आमचे पैसे द्या म्हणून धमकवायला लागले…परिसरात हसऱ्या चेहऱ्याने वावरणाऱ्या त्या स्त्रीला आता बाहेर पडणं मुश्किल झालं आणि मिळाला तो आयुष्य भराचा मनस्ताप…

अगदी साधी सुधी बाई, घरकाम आणि संसारात रमणारी…पैशांच्या आमिषाला बळी पडली होती…

बिझनेस खास या महिला वर्गाला टार्गेट करतात, घरकामात अडकून पडलेल्या आणि जबाबदर्यांच्या ओझ्यात या महिलांची पैसे कमावण्याची सुप्त इच्छा या टार्गेट ला बळी पडते…

म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे…पैसे कमवायचे तर अमिषांना बळी पडू नका, शिकवणी घ्या, कोर्सेस करा, शिवणकाम करा, खानावळ उघडा, डबे पुरवा, केक, चॉकोलेट बनवून विका…कारण तिथे सर्व व्यवहार पारदर्शी असतो…वेळ लागतो, कष्ट लागतात, पण जिद्द ठेवली तर 50000 काय, लाखो कमवू शकाल..

तुम्हालाही असतील ना काही अनुभव?? ऐकायला आवडतील, कंमेंट मध्ये जरूर सांगा…

Article Tags:
·
Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत