घरातली खिडकी बोलू लागते तेव्हा…..

Written by

कोपर्‍यातली एक खिडकी एकदा म्हणाली, हल्ली घरातली माणसं घराबाहेर कामासाठी निघून गेली की,शांत झालेल्या घरात मी एकटक उभी राहून छताकडे पाहत असते…….. कुणी माझ्याजवळ येण्याची वाट पाहत उभी असते. पूर्वी घरातली गृहिणी तान्ह्या बाळाला ‘माझ्यातूनच’ बाहेरचं जग दाखवायची. जाणार्‍या येणार्‍यांना टाटा करणारे ते चिमण्या बाळाचे हात आणी गोंडस हास्य पाहून मीही हरखून जायचे. एखादी कॉलेजला जाणारी तरूणी एक गोड हुरहुर घेउन तिच्या स्वप्नात रमायची तीदेखील माझ्याच शेजारी बसून. तिची ती स्वप्नाळू निरागस दुनिया मीच तर सर्वात आधी पहायचे. घरातली दिवस- रात्र खपणारी एखादी ताई,वहिनी माझ्याजवळ घडीभर बसून डोळे ओले करायची. अन् लागायची नव्या उर्मीनं पुन्हा राबायला….. सगळ्यांच्या मनात डोकावून पाहायचे मी.
दुपारच्या वेळी असायचचं कुणी ना कुणी माझी सोबत करायला.आठवतात मला माझ्यातून दिसणारं निळं आकाश पाहणारे डोळे, त्या चिट्ट्याचपाट्या, खाणाखुणांची मीच तर असायचे साक्षीदार……… पावसाचे तुषार टिपणारे लोकांचे हात…………माझ्या खांद्यावर चढून बसणार्‍या फुलवेली,तो फुलांचा मंद सुवास……..एखादी झाडाची कुंडी असायचीच सोबतीला. पण आता कसं सगळं हरवलंय. धावपळीच्या आयुष्यात जगण्याची दिशाच बदलून गेली. बाहेरच्या गर्दीत घरातली माणसंही हरवून गेली. माझ्यापाशी येऊन बाहेरच्या जगाकडे पाहणारी माणसंच आता दुर्मिळ झाली. माझी मीच एकटी बसलेली असते घराकडे पाहत तटस्थपणे. आता माणसांनी घराची अन् मनाची दारं बंद करून घेतली मग मला जागा कुठे असणार? पण मी आहे अजूनही तशीच उभी…………. कुणीतरी माझ्यापाशी येईल याची वाट पाहत. तुमच्या घरातही आहे मी……..कधीतरी पाहा माझ्याकडे, घडीभर बसा येऊन ‘माझ्यातुन’ बाहेरचं जग पाहत…….दुनिया वेगळी भासेल तुम्हाला कदाचित. कुणास ठाऊक तुमच्या मनाची दारं उघडतीलही……..मग येताय ना!😊😊

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.