‘चला घडवू नवी पिढी’

Written by

लहान मुलं म्हणजे निरागस, निष्पाप मातीचा गोळा असतो.कुंभार त्याच्या चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देत असतो, तो ज्याप्रमाणे आकार देतो त्याप्रमाणे त्या मातीतून भांडे तयार होतं. मुलं ही त्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. ती ज्या वातावरणात वाढतात तशीच घडतात .

मुलं जास्त वेळ कुटुंबियांच्या सानिध्यात असतात. अर्थातच आई, वडील, बहीण, भाऊ, आज्जी, आजोबा यांच्या वागण्याचा प्रभाव मुलांच्यावर पडत असतो. ती अनुकरण करतात. म्हणून मोठ्या माणसांची ही जबाबदारी आहे की त्यांनी घरात एकमेकांशी संवाद साधावा, वातावरण हसत खेळत चांगले ठेवावे तसेच आजुबाजुच्या समाजातील वातावरणाचाही मुलांच्यावर परिणाम होत असतो .

मुलं आजूबाजूच्या परिसराच, घरात ,शाळेत निरीक्षण करत असतात त्यातून शिकत असतात .वडील सिगारेट पीत असतील तर ती सुद्धा तशीच अॅक्टिंग करतात. आजोबांची हातावर तंबाखू चोळण्याची नक्कल करतात म्हणून त्यांच्या समोर मोठ्या माणसांचे वर्तनही चांगलेच असायला हवं .

आपण जसे बोलू तसेच ते बोलणार म्हणून बोलण्याचे ताळतंत्र असावं. घरात पती पत्नीत वाद-विवाद होत असतील तर मुलांच्या मनावर त्याचा खोल परिणाम होत असतो.

संध्याकाळी आठ वाजले की आईला आपली आवडती मालिका बघायची असते. शेजारी मुलं बसलेली असतात. आपण कोणत्या विषयावरील मालिका बघतोय, याचं भान त्यांना नसतं. अशा मालिका मुले शाळेत गेल्यावर दुपारी निवांत बघाव्यात. हॉरर शो बघण्याचा छंद असलेल्या एका स्त्रीला असा शो बघण्याचा मोठा फटका बसलाय. मुले जवळ होती आणि एवढी घाबरली की ती स्त्री आपली दोन्ही मुलं गमावून बसली.

मुलांनी शांत बसावं म्हणून सुट्टीच्या दिवशीही मुलांना कार्टून लावून दिलं जातं, गेम खेळायला हातात मोबाइल दिला जातो .कामाचं नियोजन करून मुलांना सुट्टीच्या दिवशी ,एखादया छान बागेत फिरायला न्यावं . त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळावे बॅडमिंटन खेळावं किंवा त्यांना जे खेळ खेळायचे असतील ते खेळू द्यावेत. यामुळे त्यांचा व्यायामही छान होईल, ती छान फ्रेश राहतील .

सतत टीव्हीसमोर बसणे अन् बघत बघत खाणे, कधी मँगी तर कधी बर्गर पिझ्झा यामुळे त्यांच्यात लठ्ठपणा वाढतोय. शहरी भागात मुलांच्या या समस्या प्रकर्षाने बघायला मिळतात. मुलांना एकमेकांत इतर मुलात मिसळायला शिकवावं. त्याचं महत्त्व सांगाव. त्यांचे मित्र मैत्रिणी कसे आहेत यावर लक्ष असावं .

चॉकलेट आवडतं म्हणून दरवेळी बाहेरुन येताना चाँकलेट आणलं तर मुलं ते खाणारच पण त्याच पैशाची फळे आणली तर आरोग्यही चांगले राहील, अन् पौष्टिक सकस असे खायला मिळेल. शाळेत डबा देताना पदार्थात विविधता असावी. न आवडणाऱ्या भाजीचा पराठा केला तर मुलांना कळणारही नाही की आपण ही भाजी खातोय .त्यातुन जीवनसत्त्व मिळतात हाँरलिक्स, बोर्नविटा पेक्षा खारकेची बारीक पूड करून दुधातून त्यांना दिली तर निश्चित हाडे मजबूत व्हायला मदत होईल . वाढीच्या वयात, बौद्धिक क्षमतेसाठी सकस आहार, वरण- भात भाजी-पोळी, लिंबू सलाड दिले तर निश्चितच फायदा होईल .

मॅगीचे दुष्परिणाम जाहीर झाले तरीही मुले मॅगीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडली नाहीत. आयाही म्हणतात कि “पिंटूला मॅगीच आवडते” म्हणून कौतुक करतात. थोडी मेहनत घेऊन काहीतरी पौष्टीक वेगळे बनवावे. त्यात आपले पारंपरिक पदार्थ आहेत, ते मुळातच सकस असेच आहेत .

मुले ऐकतच नाहीत अशी नुसती ओरड करून चालणार नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून प्रयत्नशील राहायला हवे. विनोबा भावे, साने गुरुजींच्या कथा सांगितल्या तर मुलं खरेच छान घडतील.
लहान मुले आपल्या उज्ज्वल भारताची जबाबदार नागरिक होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवं. ती केवळ शाळेची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
हो ना?……
बालगोपालळांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा .
मित्र मैत्रिणींनो लेख आवडला ना? शेअर करा व मला फॉलो करायला विसरू नका .या विषयावर अजून लेख घेऊन येईल .🙏

 

सौ सुप्रिया रामचंद्र जाधव

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा