चहा पुराण !!! सुफळ संपूर्ण !!

Written by

किचनमधली सगळ्यात पहिली गोष्ट जी मम्मी ने शिकवली होती, ती म्हणजे, “चहा”…. साधारण मी सहावी सातवी ला असताना…. आज वयाची तिशी आली…. पण अजूनही माझा चहा प्रत्येक वेळी वेग-वेगळा बनतो!!!! 😀 पण कधी कधी मी असाच विचार करते की, चहाचं काय नातं आहे आपल्या सगळ्यांशी?

पूर्वी खेळायला जायच्या आधी सगळ्यांसाठी चहा बनवण्याचं काम माझ्याकडे असायचं.. कधी एकदाचा चहा उकळतो असं व्हायचं मला तेव्हा!!!.. तो उकळला की लगेच कपात घालायचा अणि सगळ्यांना देऊन खेळायला धूम ठोकायची…. तेव्हा पप्पा हमखास बोलायचे… “किती पांचट झालाय चहा!!!!”… मग दुसर्‍या दिवशी जरा लक्ष देऊन नीट बनवायचे मी… अणि “बरा झालाय आज चहा” हे ऐकून छान वाटायचं…

इतके लोक.. त्यांच्या इतक्या तर्‍हा… मग आपोआपच चहा देखील प्रत्येकाला एका विशिष्ट पद्धतीचाच आवडतो… मला स्वतःला लहानपणापासुन आलं घातलेला चहा आवडतो…. कारण तसाच चहा मम्मी बनवायची नेहमी… त्यामुळे की काय.. पण आलं नसलेला चहा मला तरी अगदी केमिकल असल्यासारखंच वाटतो!!!.. पण काहीना तसाच स्ट्रॉंग आवडतो…. काही जण वेलची सढळ हस्ते वापरतात.. तर काहीजण गवती चहा… वेलची किंवा गवती चहा भन्नाटच लागतो म्हणा… पण मी एकजण पुदिना चहात वापरताना पाहिलं आहे… म्हणजे पहिला घोट बरा वाटला .. पण नंतर तो घशाखाली उतरेना माझ्या!!! पुदिना = पाणीपुरी हे समीकरण घट्ट बसलाय माझ्या डोक्यात!!! म्हणून असेल कदाचित…

काहीजण तुळस घालतात चहात.. तेव्हा चहा नाही.. काढा घेतोय असा वाटून जातं!! नाही म्हणायला सर्दी असताना तोच काढा चहा लाखमोलाचा वाटतो…

काहीजण अगदी असतील नसतील तेवढी सगळी साय चहात घालतात.. मलाई दार चहा!!! माझं आणि सायीचे खूप आधीपासूनच वाकडं असल्याने अशा चहा पासून मी चार हात लांबच!!

काहीजण चहाला इतकं उकळतात की जणू काही कंडेन्स मिल्क सारखा चहा बनवत आहेत!!..

हेल्थ कॉन्शियस असलेले आज कालचे लोक ग्रीन टी अगदी घटाघटा पितात!!! कसे कोण जाणे!!! आपण गरीब बिचारे पामर…. इतकं आरोग्यदायी पेय पीऊच शकत नाही!!!

पण खरच, काही जण इतका फक्कड चहा बनवतात की तो चहा घेतल्यावर अगदी रिफ्रेशिंग वाटतं..

गुळाचा चहा, दुधाचा चहा, बिन साखरेचा चहा, काळा चहा, हिरवा चहा.. मसाला चहा… फक्त चहाचे प्रकार.. . या विषयावरच पानच्या पान भरून लिहिता येईल….

त्यात मग.. सकाळचा चहा, दुपारचा चहा, संध्याकाळचा चहा, कांदेपोह्यांचा नाजूक चहा, टपरीवरचा चहा, कटिंग वाला चहा , नुसतच काही काम नाही म्हणून घेतलेला चहा, ऑफिसमधला मीटिंग वाला चहा… असे कितीतरी चहा आपल्या आयुष्यात असतात. खरंच भारतातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ह्या चहाचे एक वेगळे स्थान आहे. एक वेगळीच गंमत आहे. मग तो उत्तर भारतीय असो, दक्षिण भारतीय , महाराष्ट्रातला असो किंवा आसाम बंगालमधला असो.. आणि हो , सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनिमूनला गेल्यावर, चहाच्या बागेत एक जोडप्याने काढलेला फोटो!!! तोदेखील बहुतेकांच्या घरी फृेम करून ठेवलेला असतो..

तर असं हे भारतीयांच चहा प्रेम… अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी आपल्याला हवी तशी चहापावडर शोधून, आलं ठेचून मस्तपैकी चहा करून खिडकीपाशी पाऊस बघत बसणं.. अ हा हा!!! स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.. असं वाटल्याशिवाय राहणार नाही…

तुर्तास, प्रत्येक वेळी अगदी तसाच फक्कड चहा करता येण्याची कला, मला अजून तरी अवगत करायची आहे !! चला तर मग .. इतकं चहा पुराण वाचल्यानंतर तरतरी येण्यासाठी अजून एक चहाचा कप.. होऊनच जाऊ द्या…!!!

समाप्त

©सावली
१५ डिसेंबर २०१९

Article Categories:
विनोदी

प्रतिक्रिया व्यक्त करा