…. चिरायू होवो !!

Written by

” शर्टाची दुसरी गुंडी ( बटन ) बदलून देना गं आई… ”
‘ मी गावात चाललोय बाळा… येतो का सोबत ‘
” हा , नाना ( वडील ) … मला पण बाजारात काम आहे ”
इनमिन तिसरीत हा… आणि याला बाजारात काय आलंय काम…. आईबापांच्या डोक्यात विचार आला आणि ते कौतुकाने त्याकडे बघत राहिले…
” नाना , त्या झेंड्यावाल्याकडे चला ना… ”
‘ हा , चल ‘
” शर्टाला लावायला एक टाचणीवाला झेंड्याच चिन्ह द्या ना एक ”
” नाना , छोटीला पण घेऊन घेऊ…. नाहीतर ती रडत बसेल ”
तो त्याची खरेदी आवरून वडिलांबरोबर घरी आला…
आईने सांगितल्याप्रमाणे सर्व कामे करून ठेवलं होतं… याने भाषणाची प्रॅक्टिस केली… आज आईबापाला आपल्या लेकाचं वेगळंच रूप दिसत होतं…
” हे पहा , सरांनी तुम्हाला बरोबर 8 वाजता शाळेच्या मैदानात बोलावलं आहे ”
‘ काबर रे सोन्या ? ‘ आईने विचारलं…
” उद्या 15 आगस्ट आहे म्हनून ”
‘ अरे हा ,उद्या तर यायलाच लागतंय मग ‘
.
.
.
.
.
.
पहाट झाली… ही पहाट जरा लवकरच होत असते… शाळेतल्या सर्व पोरांची तयारी सुरू झाली… सरांनी , मॅडमनी त्यांना साडे सहा वाजताच बोलावलं होतं… कार्यक्रमाची फायनल रंगीत तालीम बाकी होती… पांढरा शर्ट ,खाकी पॅन्ट घालून मुलं सज्ज होती… मुलींनी लाल रंगाची रिबीन घातली होती… मॅडमांनी खास मुलींसाठी त्या स्वखर्चाने विकत आणल्या होत्या… गावातली ही प्राथमिक शाळा म्हणजे या शिक्षकांचा जीव की प्राण… त्यात 15 आगस्ट च्या कार्यक्रमाची तयारी तर महिन्यापासून सुरू होई… हळू हळू गाव जमा झाला… झेंडावंदनासाठी मान्यवर स्थानपन्न झाले… शाळेतला झेंडावंदनाचा कार्यक्रम मुख्याध्यापकांच्या हस्ते झाला… मग सुरू झाली प्रभातफेरी… आपल्या आपल्या मित्राचे हाथ धरून दोन- दोनच्या ओळीने सातवीपर्यंतचे सगळे विद्यार्थी जोशाने घोषणाबाजी करत होते… सामाजिक संदेश , देशभक्तीपर घोषणा गुरुजींनी खूप विचारपूर्वक तयार केल्या होत्या… प्रभातफेरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आली… तिथे सरपंचांच्या हस्ते झेंडावंदन झालं… छोटी भाषणे देखील झाली… पण त्याला आज राजकारणाचा रंग नव्हता…. पूर्ण गाव आणि आजूबाजूच्या वस्त्यावरील लोकं शाळेच्या प्रांगणात पुन्हा गोळा झाले… चैतन्याचं वातावरण…. सूत्रसंचालनाची सूत्रे गुरुजींनी हातात घेतली… आणि सुरू झाला सांस्कृतिक कार्यक्रम… सातवी पर्यंतच्या खेड्यातील मुलांच्या , मुलींच्या कलाविष्काराचा विलक्षण नमुना… सारा गाव कौतुकाने आपल्या भविष्याकडे बघून प्रभावित होत होता… काहींचे डोळे पाणावले होते… त्याकाळात गॅदरिंग वगैरे प्रकार माहितीच नव्हते… फक्त शाळेतला स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम… लोकं वर्षभर वाट बघायचे… आपली सगळी कामे बाजूला सोडून सारा गाव शाळेभोवती गोळा होत असे… सारा नजरा बघण्यासारखा असायचा… त्यांचं मन असं भरून यायचं जेव्हा सारा गाव भाषण , नृत्य , गाणं झाल्यावर कौतुकाने त्यांच्याकडे बघत असायचा… नृत्याचे , भाषणाचे , नाटकाचेसुद्धा क्लास असू शकतात ही कल्पनाच त्याकाळात कुणी करू शकत नव्हते… शाळेतल्या मॅडम , गुरूजी हे सगळं करत असताना त्यात आपला जीव ओतत असत… शाळेतली मुलं ही जणू त्यांचीच मुले होती…आजही ती जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आठवते…. ते स्वातंत्र्यदिन आठवतात…. तो रुबाब आठवतो….तो गाव आठवतो …. ते गुरुजी , त्या ताई ( मॅडम ) आठवतात …. आणि कार्यक्रमाच्या शेवटी हातावर पडणारे चॉकलेट आजही आठवतात…

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा