छडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …

Written by

जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये ४ थी पास झालो आणि ५ वी साठी हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला…गावाकडची शाळा असल्यामुळे शाळेचं मोठं असं खेळायचं मैदान, कौलारू छत आणि आजू बाजू ला मोठी मोठी झाडे, गावात एकाच शाळा असल्यामुळे सर्व गावाची मुलं आणि मुली एकाच शाळेत आणि शिकवणारे सर पण सगळे अगदी जवळच राहणारे आणि गावाकडची लोक आणि सर यांच्यात ओळख तर हमखास असायची…
गावाकडच्या शाळेमध्ये ३ विषयाचे मास्तर अगदी खूप फेमस असायचे , ते ३ विषय म्हणजे “गणित”, “इंग्लिश” आणि “विज्ञान” आणि कशासाठी फेमस तर विद्यार्थ्यांची बेदम मारहाण करण्यासाठी, या सरांचा तास चुकून बुडवला किंवा गृहपाठ पूर्ण नाही केला तर त्यांच्या तासाला बसने म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालण्या सारखं …
ज्या वेळेस हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला अगदी पहिल्याच दिवशी आमच्या जवळच्या ८ वी ९ वी मध्ये असलेल्या मुलांनी सांगितलं होत कि काही हि कर पण या ३ विषयांच्या मास्तरांच्या नादाला लागू नकोस, हे सर बोलतात कमी आणि मारतात जास्त आणि बाहेर पण कुठं दिसले तर त्यांच्या थोडं लांबूनच जायचं बरं का ….आम्ही पण अगदी थोडं घाबरूनच होतो, शाळेला जाताना आम्ही सगळे मित्र पायीच जायचो आणि आणि त्यावेळेस हे सर स्कूटर वर यायचे, आम्हाला त्यांची अगदी स्कूटर पण दिसली लांबून तर आम्ही लगेच आमचा रास्ता बदलायचो, एक गल्लीतून दुसऱ्या गल्लीत ….
पहिलीच आपली अभ्यासाची बोंबाबोंब, कधीही कुठला गृहपाठ कधी पूर्ण नाही , पहिल्या दिवशी कधी शाळेत जायचंच नाही कारण आमचं ठरलेलं कि शेवटचाच बाकावरच बसायचं… आणि खिडकी जवळ , खिडकी जवळ बसायचं कारण असं कि आतमध्ये आणि वर्ग बाहेर दोन्ही कडे लक्ष अगदी व्यवस्थित ठेवता येत…
असाच एकदा गणिताचा तास होता आणि गणिताच्या सरांची गाडी दिसली नाही म्हणून आज आमच्या साठी जणू काही दिवाळीच ..आज गणिताचे सर नाही म्हणून गणिताच्या तासाला आम्ही अगदी पूर्ण वर्ग डोक्यावर घेतलेला, अगदी मोठ्या मोठ्या ने धिंगाणा चालू होता ..आमच्या वर्गात एक “मॉनिटर” नावाचा प्राणी होता, मॉनिटर नावाचे हे प्राणी नेहमी पहिल्या बाकावर हमखास बसणारे आणि हुशार विध्यार्थी… त्याच काम म्हणजे जो कुणी वर्गामध्ये धिंगाणा घालत आहेत त्या मुलांची नाव टिपणे आणि सर आले कि ती लिस्ट त्यांच्या जवळ सोपवणे ….
पण मागच्या बाकावर बसणारे आम्ही , आमच्यात पण काही कमी किडे नव्हते, जेव्हडी नाव टिपण्याची ती टीप असं अगदी मोठ्यानं ओरडून त्याला सांगायचो …
शाळेत आल्यावर आमचं पाहिलं काम म्हणजे कोण कोणत्या सरांची स्कूटर दिसते ते पाहायचं आणि आज च दिवस कसा जाणार या बद्दल आम्हला लगेच कल्पना यायची …

दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत येताच गणिताच्या सरांची गाडी पार्किंग मध्ये दिसली आणि आम्ही ४-५ मित्रांनी एक मेकांच्या तोंडाकडे पाहून विचार केला कि आज काही खरं नाही आपलं ….

गणिताचा तास सुरु झाला आणि सर वर्गात आले आणि येताच पाहिलं वाक्य ” काल वर्गामध्ये कोणी कोणी धिंगाणा केला ते उभे राहा ” …साहजिकच मागच्या बाकावर नजर टाकून बोललेलं हे वाक्य जणू काही आमच्या साठीच होत ..पण तरीही जस काही झालंच नाही, आम्ही तसे विध्यार्थी नाहीच, असा चेहऱ्यावर भाव आणून अगदी निरागस चेहरे करून बसलेलो, पूर्ण वर्गात एव्हडी शांतता पसरली होती कि आम्ही स्वास सुद्धा थोडा हळूच घेत होतो कारण आम्ही तसं काय केलंच नव्हतं ….

आणि तेव्हड्यात शांतता भंग झाली , मॉनिटर नावाचा प्राणी उठला आणि त्याने सरांकडे कालच्या तासामध्ये ज्यांनी ज्यांनी धिंगाणा घातला त्यांच्या नावाची लिस्ट दिली आणि आम्ही मागच्या बाकावरचे ४-५ मुलं फक्त एक मेकांच्या तोंडाकडे पाहत राहिलो …आता काय होईल हे माहीतच होते , फक्त कमी मार कसा काय मिळेल असाच विचार आमच्या मनात चालू झाला …

सरांनी ५ जणांची नावे वाचली आणि सगळ्यांना उभं राहायला सांगितलं ..त्यामध्ये अपेक्षे नुसार माझं नाव पाहिलंच होत…आता मात्र आपल्याला फक्त देवच वाचवू शकतो अशे विचार घाबरलेल्या मनातून आले …मुलां समोर कितीही मारा हो काय वाटत नाय.. पण मुलीनं समोर मार खायचा म्हणजे खूप मोठा अपमान वाटतो हो ..सगळ्या मुलीसुद्धा आमच्याकडेच बघतायत हे पाहून तर अजून वाईट वाटलं ..
तेव्हड्यात “छडी कुठे आहे?” म्हणून सरांनी मॉनिटर ला विचारले आणि त्याने पूर्ण वर्गात सगळ्या कोपऱ्यात छडी शोधली ..पण छडी काय मिळाली नाही ..आम्हाला थोडा धीर आला, आम्ही मित्र एक दुसर्याकडे पाहून थोडं relax झालो …पण ते सर पण गणिताचे होते …इतक्या लवकर माघार घेणं म्हणजे हे त्याच्या विषयालाच शोभण्यासारखं नव्हतं ..
आणि त्यात आगीमध्ये तेल ओतणारा हा मॉनिटर नावाचा प्राणी , त्याने लगेच आपल्या हुशार डोक्यातून एक आयडिया सुचवली ” सर मी बाहेरून घेऊन येतो कि छडी …बाहेर निर्गुडीची झाड पण आहेत त्याची छडी अगदी मस्त होते आणि पुढेही लागेलच कि कधी” हे ऐकून आम्ही कोणत्या नजरेने त्या मॉनिटर कडे पाहत होतो ते सरांच्या लक्षात आहे आणि सरांनी त्याला एक चांगली मोठी आणि निबार अशी छडी घेऊनच ये लवकर असं सांगितलं…

आमच्या मनातले विचार पण लगेच बदलले ..आता आम्ही मार खाताना शरीराचा कोणता भाग पुढे करायचा आणि कमी लागलं तरी किती मोठ्याने ओरडायचं …रडल्या सारखं तोंड कास लवकर करायचं याचा विचार करायला लागलो …हा मॉनिटर नावाचा प्राणी नक्की मोठी छडी घेऊन येणार असा आमचा ठाम विश्वास झाला, कारण काल धिंगाणा करताना आम्ही त्याला अगदी मोठ्याने जेव्हडी नाव टिपण्याची ती टीप असं ओरडून सांगितलं होत …

पूर्वी शाळेचा युनिफॉर्म म्हणजे शर्ट आणि हॉफ प्यांट ..हाफ प्यांट मुळे उघडे दिसणारे पाय म्हणजे म्हणजे छडी ने मारण्यासाठी मिळणारी एक मेजवानीच होती …त्यात शाळेचा गणवेश २ वर्षे तरी टिकायला हवा असा घरच्यांचा नियम ..आणि त्यात आमच्या सारख्या खोडकर मुलांचे कपडे तर लवकर फाटणारच आणि त्यामुळे प्यांट च्या मागून दोन्ही बाजूला लावलेले ” patch ” …कारण सकाळी ११ पर्यंत प्रार्थना वगैरे होई पर्यंत वाळूवरच बसायचो..वाळू म्हणजे मोठे मोठे दगडच म्हणा कि …त्यात उन्हाळ्यात वाळूवर बसणं… मग तर “patch ” असून पण काही फायदा नाही असाच वाटायचं …

असो , शेवटी अगदी गणिताच्या तासाला सुरुवात झाल्या पासून ज्या गोष्टीची सगळे आतुरतेने वाट पाहत होते ती ” छडी ” घेऊन मॉनिटर आलाच..एव्हडी मोठी आणि लांबच लांब छडी पाहून कुणाच्याही अंगाला अगदी काटा येईल अशी …शेवटी आम्ही पुढ जे काही होईल त्याला सामोरं जायचं ठरवलं ..काही पर्याय पण नव्हताच म्हणा …आणि शेवटी चालू झालं ते एक तर्फी युद्ध, आम्ही फक्त काहीतरी करून कमी मार कसा मिळेल याचा प्रयत्न करत होतो ..पण शेवटी ते गणिताचे मास्तर , हिशेब बरोबर करूनच शेवटी युद्ध संपलं…आमच्या मऊ मऊ पायांवर मार झाल्याचे ठसे चांगलेच दिसत होते आता …आम्ही बाकावर खाली बसलो आणि एक मेकांना धीर देत अगदी बाकाच्या आतमध्ये खाली वाकून बसलो ..कारण सगळ्यांच्या नजरा आमच्याकडेच होत्या….कसाबसा तो तास आणि दिवस गेला …
घरी गेल्यावर घरच्यांनी “अजून जास्त मारायला पाहिजे होत” म्हणून लगेच मास्तरांची बाजू घेतली ..

दुसऱ्या दिवशी आम्ही मित्र थोडं लवकर वर्गात येऊन पहिली त्या “छडीची” वहिल्लेवाट लावली ….

मित्रांनो सांगायचं एवढाच कि आपण शाळेत असताना किती तरी वेळा सरांनी आम्हाला शिक्षा केली असेल पण त्याचा कुठे ना कुठे आम्हाला फायदा नक्कीच झाला …अगदी आयुष्यात ज्या वेळेस कठीण प्रसंग आले असतील तरीही आपण ठाम पणे त्याचा सामना केला आणि जरीही आम्ही हुशार विध्यार्थी नव्हतो तरीही आमच्या शिक्षकांच्या नेहमी लक्षात असतो आणि एक शाळेची आठवण कशा ना कशा स्वरूपात नेहमीच राहिली …
आणि ती “छडी ” आठवल्यावर अजूनही अंगावर काटा येतो ….

Article Categories:
विनोदी

प्रतिक्रिया व्यक्त करा