छोटीशी युक्ती वाईट सवय मोडी

Written by

 

“आई ही गाडी मला माझ्या घरी खेळायला घेऊन जायची” छोटा चिंटू हट्ट करत होता.
चिंटूची आई ,चिंटू ला घेऊन तिच्या बहिणीकडे आलेली होती .ताईची मेघा आता मोठी झालेली होती. त्यामुळे तिची जुनी खेळणी ,तिथे गेला की चिंटू खेळायचा ,आणि प्रत्येक वेळी हट्ट करून एखादं खेळणं स्वतःच्या घरी घेऊन यायचा .
आई तिथेच त्याला अडवण्याचा प्रयत्न करायची, पण खूप हट्टीपणा करायचा आणि मग दुसऱ्याकडचे खेळणं आपल्या घरी घेऊन यायचा .
इतक्यात तर हे नेहमीचेच झाले होते .आत्ता मावशीकडची एक गाडी त्याला आपल्याकडे घेऊन यायची होती. दोनच दिवसापूर्वी शेजारच्या बबलू ची बंदूक तो घरी घेऊन आला होता .
दुसऱ्यांकडे गेल्यावर तेथील खेळण्यांशी खेळावं, पण आपल्याकडे घेऊन येऊ नये, हे चिंटूला बऱ्याचदा समजावून सांगूनही कळतच नव्हतं.
लहान मुलगा आहे ,असू दे ,असा हट्ट करणारच, असं म्हणून कोणी चिंटूला अडवायचे नाही, पण चिंटूच्या आईला हे अजिबात आवडत नव्हतं.
ही सवय शक्य तितक्या लवकर मोडून टाकायची, असं चिंटूच्या आईने ठरवलं आणि यासाठी कोणाची तरी मदत लागणार, हे चिंटूच्या आईला माहीत होतं.
मेघा,चिटूंची मावसबहिण ही बारा वर्षाची होती .आईने तिची मदत घ्यायची ठरवली आणि त्या दोघींनी गंमत करायची ठरवली.
दुसऱ्या दिवशी मेघा चिंटूच्या घरी खेळायला आली ,थोडावेळ त्याच्या खेळण्यास सोबत खेळली निघतांना म्हणाली, “मावशी हा टेडी बियर किती छान आहे ,माझ्याकडे तर असा नाहीच आहे, मी घेऊन जाते माझ्या घरी.”
“चालेल मेघा घेऊन जा. काहीच हरकत नाही” आई म्हणाली.
“आई टेडीबियर मला रोज खेळायला हवा असतो ,कशाला ताईला देत आहे.”चिंटू रडकुंडीला आला.
“अरे काल तू ताईकडून गाडी आणली, तर ताई काही म्हणाली का? दिली की नाही ताईने ,आता तिला हवे तर नाही कसं म्हणणार. घेऊन जा, मेघा टेडीबिअर.”
आईने असे म्हटल्यामुळे चिंटूचा नाईलाज झाला ,आणि त्याला तो टेडीबियर मेघाताईला नेऊ द्यावा लागला.
रात्री मात्र त्याला बिलकुल करमत नव्हतं, कारण त्याचा लाडका टेडीबियर त्याच्यासोबत नव्हता, पण तो काही आईला बोलूही शकत नव्हता .
पुन्हा दोन-चार दिवसांनी मेघा आली. चिंटू कडे एक छान बटण दाबले की वेगवेगळे कप्पे उघडणारा कंपास होता, तो त्याला शाळेत न्यायला त्याला खूप आवडायचा .
“मावशी माझा कंपास मोडलाय ग, मी चिंटूच्या घेऊन जाऊ का?” मेघाने विचारले .
“अगं हो बिनधास्त ने. चिंटू कडे अजून दुसरा आहे कंपास तो वापरेल . घेऊन जा.”
यावेळी तर चिंटूला आईचा खूप राग आला. असं कोणी दुसऱ्यांच्या घरी जाऊन काही मागतं का सारखं! मेघाताई झाली ,म्हणून काय झालं, माझ्या सगळ्याच वस्तू हळूहळू ही घेऊन जाईल काय करावं बरं! चिंटू विचार करायला लागला.
“आई बटनाचा कंपास मला राहूदे .ताईला साधावाला नेऊ दे.”चिंटूनेआईला पटवण्याचा प्रयत्न केला.
“अरे ताईला जो आवडलाय, तोच नेऊदे .तू आपला साधा वापर. तू नाही का, ताईकडून घेऊन येत, तुला हवं ते. ताई म्हणते का तुला नेऊ नको म्हणून काही.”आईने समजावले.
चिंटू तसा हुशार आणि शहाणा मुलगा होता. चिंटूला, आईने फार काही न बोलताच कळले ,की आपण दुसर्‍यांकडुन सारख्या अशा वस्तू मागत असतो ,त्यामुळेच लोकांनी आपल्याला मागितल्या, तर त्या द्याव्या लागतात. त्यामुळे आपण सुधारलेलं बरं.
नंतर जवळपास महिनाभर चिंटूने ,कोणाकडेही गेल्यावर, काहीही आपल्या घरी न्यायचा हट्ट केला नाही.
आईची युक्ती सफल झाली होती. एक वाईट सवय ,लागता लागता मोडली होती.
अर्थातच मेघातानेही, महिनाभराने टेडिबेअर आणि तो कंपास चिंटूला परत केला ,हे सांगायलाच नको.

भाग्यश्री मुधोळकर

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा