जणु काही ठेकाच घेतलाय या कामांचा बायकांनी…

Written by

जणु काही ठेकाच घेतलाय या कामाचा बायकांनी,..?

©स्वप्ना मुळे(मायी)

रविवारची सकाळ कसली धावपळीची आणि त्यात ह्या समिधाचा डान्स प्रोग्रॅम,…जमेल तशी नीताने रात्रीच तयारी केली आणि सकाळी तरी धावपळ झालीच,…

धावत पळत नाट्यगृह गाठलं,…पण कार्यक्रमाला तसा वेळ होता,…पोरी स्टेज कडे पाठवून नीता आणि चार पाच आया ग्रुप करून उभ्या राहिल्या,….तेवढ्यात समोरच्या टेबलावर एका माणसाने गरम समोसे विक्रीला ठेवले,…शुभांगीच लक्ष गेलं आणि ती म्हणाली आलेच मी,.. आणि लगेच गरम पाच सामोसे घेउन अली नीता म्हणाली ,”अग नको मला नाश्ता झाला आहे माझा,……”बाकीच्या म्हणाल्या आम्हाला चालेल ग बाई,…घोटभर चहा नाही मिळालाय सकाळपासुन,… त्यांच वाक्य ऐकून नीताला सकाळपासुन आपल्या भोवती पळणारा आणि गरम गरम डोसे करणारा अभि आठवला,..समिधाची हेअर स्टाईल करताना तर बाजूला प्लेट घेऊन उभा होता दोघींना एकेक घास भरवत,…

समोर घाई घाईने समोसा खाणारी शुभांगी म्हणाली,”बाई कुत्र्याला तरी जरा निवांतपणा मिळत असेल खाताना,…माझी तर इतकी धावपळ झाली,…दोन भाज्या,भात, पोळ्या आणि निघताना नवरा म्हणतो चहा, पोहे करून दे,…त्यावेळी तर अस्सा राग आला पण काय करता आमच्या घरी बायकोला मदत करायची पद्धत नाही,…नीता म्हणाली अग एरवी नसतील करत पण असं घाई असल्यावर तर करावी,…आणि त्यांनी नाही केली तर तू म्हणायच ,”अहो जरा मदत करा,..”

ह्यावर शुभांगी म्हणाली,”मग तर मी थोबाडीतच खाईल बरं का,…आमच्याकडे पुरुषांना काम सांगीतलेलं चालत नाही बाई,…ते लगेच म्हणतात ही काम तुमचीच आहेत,…”

बाकीच्यांच्या प्रतिक्रिया बऱ्यापैकी अश्याच होत्या,…एकतर म्हणाली हे तरी पुरुष म्हणून आपण म्हणतो,..माझ्या तर सासुबाई माझी गम्मत बघत होत्या एखादं काम राहू दे राहील तर असे देखील म्हणाल्या नाही त्या असं म्हणताना तिने डोळ्याच्या कडेला आलेलं पाणी अलगद ओढणीने टिपलं,…जसं काही ठेकाच घेतलाय आपण ह्या कामाचा असं रागातच ती म्हंटली,…

नवरे, सासू ,सासरे कोणी घरात असू दे ग बाई आपली काम ती काही आपल्याला चुकत नाही घाई असो नाहीतर नसो,.. आपण गरोदर असू दे नाहीतर आपली पाळी असुदे नाही तर आजारी असू दे आपणच करायचं सगळं ,…त्या कामाचं पेटंट घेतलंय ना आपण चला हे नेहमीचंच असं एकाच सुरात म्हणत सगळ्या पाणी प्यायला वळाल्या आणि नीताने लगेच फोन काढून अभिला फोन लावून फक्त थँक्स म्हणत फोन ठेवला,…आणि मनोमन आभार मानले,…घरातली काम फक्त स्त्रीचाच ठेका हे पेटंट त्याने कधीच झुगारले होते आणि म्हणून हा संसार इतका छान चालला होता,….?

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद….

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा